योशुआ बेंजुओ हे कॅनडातील संगणक शास्त्रज्ञ असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कृत्रिम चेतना जाल (आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क ) या विषयातले तज्ज्ञ मानले जातात..
त्यांचा जन्म ५ मार्च १९६४ रोजी फ्रान्स येथे झाला. त्यांनी बी.एस्सी. (विद्याुत अभियांत्रिकी) एम.एस्सी. आणि पीएचडी (संगणक विज्ञान) मॅकगील विद्यापीठातून केले. मग त्यांनी एम.आय.टी.मधून पोस्ट डॉक्टरेट मिळवली. १९९३ पासून ते माँट्रेआल इथेच कार्यरत आहेत.
त्यांना वयाच्या अकराव्या वर्षापासून प्रोग्रामिंगने भुरळ घातली. विसाव्या वर्षापासून त्यांना मानव आणि प्राण्यांमधील बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने आकर्षित केले. तेव्हाच त्यांनी ठरवले की आपण यंत्रबुद्धिमत्ता विकसित करून संगणकाचे ज्ञान वाढवण्याचे काम करायचे.
हेही वाचा >>> कुतूहल : अल्फागो’च्या पुढे…
माहीत नसलेल्या घटनेपासून अनुमान कसे काढावे याकरता डीप लर्निंग ही पद्धती विकसित करण्यात बेंजुओबरोबर जेफ्री हिंटन आणि यान लिकुन हे शास्त्रज्ञ आहेत. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या जाळ्यामधून यंत्राचे स्वशिक्षण करता येईल असे बेंजुओ यांचे म्हणणे आहे. अनेक थरांच्या जाळ्यामध्ये प्रत्येक थर आलेल्या विदेचे कोणा एका निकषावर विश्लेषण करते आणि ते निष्कर्ष पुढे पाठवत जाते, जर अपेक्षित उत्तरात फरक असेल तर पुन्हा प्रसारण होते जोपर्यंत बरोबर उत्तरातला व आलेल्या उत्तरातला फरक कमी होत नाही, तोपर्यंत हे चक्र सुरू राहते. सखोल चेतना जालाद्वारे संज्ञानात्मक शिक्षण शिकवले जाऊ शकते यावर बेंजुओ यांनी बरेच काम केले आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : गो मॅन गो
डीप लर्निंग हे तंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी नियमावली बनवणे आणि वापरावर नियंत्रण ठेवणे यात खूप महत्त्वाचे ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अति वेगवान प्रगतीमुळे ही गरज अत्यंत तातडीची झाली आहे असे प्रतिपादन ते करतात आणि त्याकरता वेगळ्या पद्धतीचे संशोधन करायला सुचवतात.
बेंजुओ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातला सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे डीप लर्निंग विषयाकरिता त्यांना मिळालेला ‘‘ट्यूरिंग पुरस्कार,’’ त्याशिवाय मेरी व्हिक्टोरिया पुरस्कार, ए.ए.ए.आय. फेलो आणि लीजन ऑफ ऑनरने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना डीप लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘भीष्मपितामह’ म्हणून संबोधण्यात येते.
ते सध्या ‘युनिव्हर्सिटी डी माँट्रेआल’ येथील ‘संगणक विज्ञान आणि ऑपरेशन्स रिसर्च (OR)’ विभागात प्राध्यापक आणि ‘माँट्रेआल इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग अल्गोरीदम’चे वैज्ञानिक संचालक आहेत. ‘प्रगत संशोधन केंद्रा’चेही ते सह-स्थापक आहेत.
– डॉ. अनला पंडित
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org