इरॅटोस्थेनिस सांप्रतकाल पूर्व (बिफोर प्रेझेंट) २७६ ते १९५ या काळात होऊन गेलेले एक ग्रीक तत्त्ववेत्ते होते. पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम शोधणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. इरॅटोस्थेनिस यांनी पृथ्वीचा परीघ मोजला कसा, याची कहाणीही रंजक आहे. इजिप्तमधल्या सिएन (आजचे अस्वान) गावातल्या विहिरीत उन्हाळ्यातल्या एका ठरावीक दिवशी ठीक मध्यान्हीला सूर्याचे प्रतिबिंब पूर्णपणे दिसते, असे इरॅटोस्थेनिस यांचे निरीक्षण होते. यावरून त्यावेळी सूर्याची किरणे तिथे लंबरूप पडतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

इरॅटोस्थेनिस यांनी पृथ्वीचा परीघ मोजण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सूर्यकिरणांच्या कोनाचा अभ्यास करण्याचे ठरवले. सिएन आणि अलेक्झांड्रिया ही दोन गावे एकाच रेखांशावर आहेत, असे इरॅटोस्थेनिस यांना वाटत होते; त्यामुळे त्यांनी ही दोन ठिकाणे निवडली आणि त्या दोन गावांमधले अंतर मोजले. त्या काळात तिथे प्रचलित असणाऱ्या परिमाणानुसार ते ५,००० स्टेडिया इतके होते. ज्यावेळी सिएनच्या विहिरीत सूर्यकिरणे लंबरूप पडली, त्याच वेळी इरॅटोस्थेनिस यांनी अलेक्झांड्रिया येथे जमिनीत रोवलेल्या उंच खांबांची उंची आणि सावलीच्या लांबीचे गुणोत्तर वापरून सूर्यकिरणांचा पतनकोन मोजला. तो कोन होता ७ अंश १२ म्हणजे पूर्ण वर्तुळाच्या (३६० अंशांच्या) ५०व्या भागाइतका. सूर्यकिरण समांतर असतात. त्यामुळे हा कोन त्या दोन ठिकाणांना पृथ्वीमध्याशी जोडणाऱ्या त्रिज्यांमधल्या कोनाइतकाच असणार, असे त्यांचे गृहीतक.

वर्तुळाच्या परिघावरच्या ५० व्या भागातील अंतर ५,००० स्टेडिया असेल तर पूर्ण परीघ हा ५० गुणिले ५,००० म्हणजे २,५०,००० स्टेडिया असला पाहिजे, असे गणित इरॅटोस्थेनिस यांनी मांडले. आजच्या परिमाणांमध्ये ते ४४,१०० किलोमीटर इतके होते. आजच्या आधुनिक साधनांनी मोजलेला पृथ्वीचा परीघ ४०,०७५ किलोमीटर आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळात त्यांना मिळालेला निष्कर्ष अचूक उत्तराच्या खूपच जवळ जाणारा होता.

इरॅटोस्थेनिस यांची पद्धत योग्य होती, परंतु काही त्रुटी राहिल्या. पृथ्वी गोल आहे, तसेच सिएन आणि अलेक्झांड्रिया एकाच रेखांशावर आहेत, असे त्यांचे निरीक्षण होते. पण पृथ्वी पूर्णपणे गोल नाही; ती ध्रुवांपाशी थोडी चपटी आहे. सिएन आणि अलेक्झांड्रियाही एकाच रेखांशावर नसून सिएन ३ अंश ३ पूर्वेकडे आहे. शिवाय सिएन आणि अलेक्झांड्रिया यांच्यातले अंतर उंटावरून प्रवास करून मोजले, पण तो प्रवास सरळ रेषेतला नव्हता. वास्तवात ते अंतर ५,००० स्टेडिया नसून ४,५३० स्टेडिया आहे.

तरीही, कोणतीही आधुनिक साधने नसताना सूर्याचे प्रतिबिंब आणि खांबाची सावली यांना प्रमाण धरून त्यांना मिळालेले उत्तर प्रत्यक्ष संख्येच्या इतक्या जवळ जाणारे होते, हे विशेष!

चारुशीला सतीश जुईकर, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org