मानवाच्या माहितीत ११८ मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांमधे १७ अशा मूलद्रव्यांचा एक गट आहे, ज्यांना रसायनविज्ञानात ‘दुर्मीळ मूलद्रव्ये’ किंवा ‘दुर्मीळ मृत्तिका’ (रेअर अर्थ्स) म्हटले जाते. ही सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. त्यांचे रासायनिक गुणधर्म बरेचसे एकसारखे आहेत. त्यामुळे निसर्गात ती खनिजरूपात आढळतात तेव्हा बहुधा एकत्रितच आढळतात. इतर मूलद्रव्यांच्या खनिजांचे जसे समृद्ध साठे असतात, तितके मोठे साठे या खनिजांचे नसतात. सुरुवातीला ही मूलद्रव्ये फक्त काही मोजक्या खनिजांमध्येच आढळून आली. या कारणांनी त्या सतरा मूलद्रव्यांना दुर्मीळ मृत्तिका म्हणतात.
रासायनिक अभिक्रियाशीलता (रिअॅक्टिव्हिटी) आणि उत्प्रेरकता (कॅटॅलिसिस) हे या मूलद्रव्यांचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे औद्याोगिक प्रक्रियांमध्ये त्यांचा वापर अगदी सहजपणे करता येतो. त्यांचे चुंबकीय आणि प्रकाशीय गुणधर्मही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्यामधे उच्च तापमान प्रतिरोधकता आढळते. या गुणधर्मांमुळे दुर्मीळ मृत्तिका तांत्रिक आणि औद्याोगिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठरतात. उच्च तंत्रज्ञानाचा विकास, अक्षय ऊर्जानिर्मिती, आरोग्य सेवा, ग्राहकोपयोगी नवनवीन उपकरणे, प्रदूषणरहित उत्पादने, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे त्यांना आधुनिक अर्थव्यवस्थेची किंवा उद्याोगांची ‘जीवनसत्त्वे’ म्हणून संबोधले जाते.
दुर्मीळ मृत्तिकांपैकी निओडिमियम, समेरियम आणि डिस्प्रोसियम या मूलद्रव्यांचा वापर शक्तिशाली आणि टिकाऊ चुंबकांच्या निर्मितीत होतो. पवनचक्कीपासून विद्याुत निर्मितीपर्यंत आणि पार वैद्याकीय उपचारांमध्येही अशा चुंबकांची नितांत गरज असते. रुग्णांची ‘चुंबकीय अनुनाद प्रतिबिंबन’ (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग किंवा एमआरआय) प्रक्रिया वापरून चाचणी करताना, काही कर्करोगांच्या उपचारांमधे, तसेच पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठीही दुर्मीळ मृत्तिकांचा उपयोग होतो. उच्च तापमान प्रतिरोधकतेमुळे अंतराळ तंत्रज्ञानामध्ये, तसेच अणुऊर्जाविषयक तंत्रज्ञानामध्येही त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करून घेता येतो. संरक्षणक्षेत्रात शत्रूच्या नकळत गोपनीय हालचाली करण्यासाठी आणि शत्रूच्या रडारसारख्या यंत्रणांपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘छुप्या तंत्रज्ञाना’त (स्टेल्थ टेक्नॉलॉजी) होणाऱ्या त्यांच्या उपयोगाला वरदानच म्हटले पाहिजे.
दुर्मीळ मृत्तिका नावाप्रमाणे दुर्मीळ मात्र नाहीत. त्या पृथ्वीच्या कवचातील विविध खनिजांत विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. त्यांचे साठे प्रामुख्याने बास्टनासाइट, मोनाझाइट आणि झेनोटाइम या खनिजांच्या रूपात आढळतात. त्यातही जगातील सर्वांत जास्त साठे बास्टनासाइट आणि मोनाझाइट या खनिजांचे आहेत. बास्टनासाइटचे बहुतेक साठे चीन आणि अमेरिकन संघराज्यात आहेत. तर मोनाझाइटचे साठे भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियात आहेत. चीन हा दुर्मीळ मृत्तिकांचा सर्वांत मोठा उत्पादक देश असल्याने गेल्या काही दशकांपासून या खनिजांच्या बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व आहे.
अरविंद आवटी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org