डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com
हृदयरोग हा केवळ रक्तवाहिन्यांचा आजार नसतो. भावनांचा परिणाम सर्वात जास्त हृदयावर होतो. आपल्याला झालेल्या भावनिक जखमा आपल्या अंतर्मनात साठलेल्या असतात आणि पुन्हा तशा जखमा होऊ नयेत म्हणून आपण नकळत आपल्या हृदयाभोवती एक संरक्षक कवच, भिंत उभी केलेली असते. ही भिंत काही वेळ आपल्या हृदयाचे संरक्षण करते, पण त्यामुळे आपला आपल्या हृदयाशी संवादच होत नाही. त्रासदायक असतात म्हणून आपण आपल्याच भावना जाणत नाही; भावनिक वेदनांपासून बचाव करण्यासाठी आपण स्वत:ला बधिर करून घेतलेले असते. हृदय पूर्णत: निरोगी करायचे असेल तर केवळ रक्तवाहिन्यांचे प्लम्बिंग करून ते होणार नाही, त्यासाठी या भावनिक जखमा भरून यायला हव्यात. आपला आपल्या हृदयाशी संवाद व्हायला हवा. त्यास आधार, प्रेम द्यायला हवे. ते ध्यानाने शक्य होते.
नाकारलेल्या, दडपलेल्या भावना साक्षीध्यानाच्या सरावाने जाणवू लागतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या शरीरातील संवेदना साक्षीभाव ठेवून स्वीकारू लागलो, की या त्रासदायक भावना कमी होतात. त्यानंतर कल्पनादर्शन करून प्रेम, कृतज्ञता अशा उन्नत भावना मनात धारण करता येतात. आनंददायी प्रसंगाचे ध्यान केल्याने आपण शरीर-मनातील युद्धस्थिती बदलून शांतता स्थिती आणू शकतो, मानसिक तणाव कमी करू शकतो, हृदयाकडील रक्तपुरवठा वाढवू शकतो.
‘रिव्हर्सिग हार्ट डिसीज’ प्रयोगात सहभागी रुग्णांसाठी डॉ. डीन ओर्निश यांनी कल्पनादर्शन ध्यानाचा दोन प्रकारे विशेष उपयोग केला. त्याला त्यांनी ‘डायरेक्टेड व्हिज्युअलायझेशन’ (दिग्दर्शित कल्पनादर्शन ध्यान) आणि ‘रिसेप्टिव्ह व्हिज्युअलायझेशन’ (स्वीकारजन्य कल्पनादर्शन ध्यान) असे म्हटले. ‘दिग्दर्शित कल्पनादर्शन ध्यान’ म्हणजे निरोगी हृदयाचे चित्र बंद डोळ्यांनी पाहायचे, हृदयामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार होत आहेत हे पाहायचे, रक्तवाहिन्यांतील अडथळे कमी कमी होत आहेत, त्यामधून रक्त कुठेही न अडता वाहत आहे असे ध्यान करायचे. त्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरायची. असे ध्यान करताना भीतिदायक चित्र दिसू लागले तर त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना स्वीकारायच्या, म्हणजे साक्षीध्यान करायचे. त्यानंतर पुन्हा आपले शरीर निरोगी आहे हे कल्पनेने पाहायचे. अशा ध्यानाचा उपयोग निरोगी व्यक्तीदेखील स्वास्थ्य जपण्यासाठी करू शकतात.