कुतूहल: बांगडी साचा – भाग १
सूतकताईच्या इतिहासामध्ये हातकताईपासून म्यूल साच्यापर्यंत अनेक कताई तंत्रे विकसित होऊन त्यांचा उपयोग काही काळापुरता झालेला आपण पाहिला. ह्य़ा त्रुटी नाहीशा करून एक परिपूर्ण कताई साचा विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करीत होते.
अमेरिकेतील होर्ड आयलंड येथील जॉन थॉर्प याने ई. स. १८२८-२९ मध्ये बांगडी साच्याचे (िरग फ्रेम) तंत्रज्ञान विकसित केले. याच्यामध्ये पुढे तेथील जेंक्स याने काही सुधारणा केल्या. त्यामुळे काही वेळा बांगडी साच्याचा मूळ संशोधक म्हणून जेंक्स याचा उल्लेख केला जातो. १८३० पासून काही यंत्रे बनविणाऱ्या कंपन्यांनी बांगडी साचा तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु यंत्र उद्योगमधील आघाडीवर असलेल्या व्हाइटीन मशीन वर्क्सने १९४० मध्ये आणि लॉवेल मशीन शॉप यांनी १९५० साली बांगडी साच्याचे उत्पादन सुरू केल्यावर बांगडी साच्याचे तंत्रज्ञान कताई उद्योगात पकड घेऊ लागले. बांगडी चाते : या यंत्रामध्ये सुताला पीळ देऊन सूत बॉबिनवर गुंडाळण्यासाठी जे चाते वापरले जाते त्याच्याभोवती बांगडी (िरग) सारखे एक गोल कडे असते. त्याच्यावरून या चात्याला बांगडी चाते (िरग िस्पडल) असे नाव पडले. बॉबिन चात्यावर बसविलेली असते. चात्याभोवती असलेल्या बांगडीवर इंग्रजी ‘सी’ या अक्षराच्या आकाराची एक तार (ट्रॅव्हलर) बांगडीच्या वरच्या कडेवर अडकवलेली असते. ही तार बांगडीवर चात्याभोवती फिरते. बांगडी साच्यामध्ये वातीची बॉबिनवरील वात सुरुवातीचा घटक म्हणून वापरली जाते. या वातीची जाडी खेच रुळांच्या साहाय्याने कमी केली जाते. खेच रुळांमधून बाहेर पडणारा शेडा (स्ट्रॅण्ड) पुढे बांगडीवर फिरणाऱ्या तारेमधून ओवून घेऊन बॉबिनवर गुंडाळला जातो. बॉबिन चात्यावर घट्ट बसविलेली असते. त्यामुळे चाते फिरविले असता बॉबिन चात्याच्याच गतीने फिरू लागते. चात्याबरोबर बॉबिन जेव्हा फिरू लागते तेव्हा खेच रुळांकडून येणारा शेडा हा तारेमधून ओवल्यामुळे बॉबिनबरोबर तारदेखील बांगडीवर बॉबिनभोवती फिरू लागते. तारेच्या आणि सुताच्या या गोलाकार फिरण्यामुळे शेडय़ास पीळ बसू लागतो व सूत तयार होऊ लागते. बॉबिनच्या फिरण्यामुळे जरी तार ही बांगडीच्या कडेवर सभोवताली फिरू लागते तरी बॉबिनची आणि तारेची फिरण्याची गती सारखी नसते. तारेची गती ही बॉबिनच्या गतीपेक्षा थोडीशी कमी असते. तार व बॉबिनमधील या गती फरकामुळे तयार झालेले सूत हे बॉबिनवर गुंडाळले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा