पृथ्वीच्या पर्यावरणातील ऑक्सिजनपैकी सुमारे ५०-८० टक्के ऑक्सिजन सागरातून मिळतो. सागरी ऑक्सिजनच्या निर्मितीतील मोठा वाटा आहे प्लवकांचा. त्यानंतर मुक्त संचार करणाऱ्या वनस्पती, शैवाल आणि काही जिवाणू यांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर पडतो. प्रोक्लोरोकॉकस हा एक सूक्ष्म जिवाणू असून, असे मानले जाते की पृथ्वीवरील प्रकाश संश्लेषण करणारा सर्वात लहान सजीव आहे. पृथ्वीच्या पर्यावरणातील ऑक्सिजनपैकी २० टक्के ऑक्सिजन तो निर्माण करतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे उष्ण कटिबंधात असणाऱ्या पर्जन्य वनाद्वारे एकत्रित निर्माण केला जाणारा ऑक्सिजन एकटय़ा प्रोक्लोरोकॉकसद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कमी आहे.
ऑक्सिजनचे प्रमाण सतत बदलत असल्याने सागरातून किती ऑक्सिजन निर्माण केला जातो हे अचूक मोजणे जिकिरीचे व कठीण काम आहे. उपग्रहाद्वारे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या प्लवकावर वैज्ञानिक नजर ठेवून अंदाज घेऊ शकतात परंतु उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती हवी तशी आणि तितक्या प्रमाणात मिळू शकत नाही, कारण त्यालाही काही मर्यादा आहेत. प्लवकांची संख्या वातावरण तसेच ऋतू बदलामुळे उन्हाळय़ात जास्त असते तर पावसाळा किंवा हिवाळय़ात कमी होण्याची शक्यता असते. शिवाय सागरी पाण्यातून मिळणारी पोषकद्रव्ये कमी जास्त झाली, तापमानात बदल झाला किंवा काही अन्य कारणामुळेही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होतो आणि ऑक्सिजननिर्मिती कमी होते. विशिष्ट ठिकाणच्या प्लवकांच्या प्रकाश संश्लेषणात दिवसातील वेगवेगळय़ा वेळीही फरक पडतो असे अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे.
सागरातून समजा ५० टक्के ऑक्सिजन पृथ्वीच्या वातावरणात सोडला जात असेल तर तेवढाच ऑक्सिजन सागरी प्राण्यांनी वेगवेगळय़ा क्रियांसाठी वापरला असे समजले जाते. जमिनीवरील प्राण्यांप्रमाणेच सागरी प्राणी आणि वनस्पती श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. त्याशिवाय सागरातील प्राणी, वनस्पती मृत पावल्यानंतर त्यांची कुजण्याची प्रक्रिया होते त्यातही ऑक्सिजन खर्ची पडतो. शैवाल पूंज (अल्गल ब्लूम) ज्यात शैवाल प्रमाणाबाहेर एकत्र वाढून त्यांचा पूंज किंवा बहर निर्माण होतो. तो बहर मृत होतो त्या वेळी त्यांच्या विघटनासाठीही ऑक्सिजन लागतो. या वेळी लागणारा ऑक्सिजन सागराच्या त्या भागात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. अशा वेळी त्या विशिष्ट क्षेत्रात कमी ऑक्सिजनचा पट्टा निर्माण होतो, त्याला ‘मृत क्षेत्र’ म्हणतात.
– डॉ. किशोर कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org