दूरवरच्या देशांपर्यंत लंडन शहराचे महत्त्व वाढले ते साधारणत १७व्या शतकाच्या सुरुवातीला. इंग्लंडच्या राजवटीने आणि त्यांच्या पार्लमेंटने वसाहतवादाला सुरुवात केल्यापासून साधारणत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे जवळजवळ ३५० वष्रे हे महत्त्व टिकून राहिले. एके काळी विस्ताराने, लोकसंख्येने व प्रतिष्ठेने लंडन जगात सर्वश्रेष्ठ समजले जाई.
गेल्या साठ ते सत्तर वर्षांमध्ये मात्र ही परिस्थिती बदलली आहे. असे असले तरी आजही अनेकांना लंडनची पार्लमेंट, लंडनचे पूल, लंडनचा इतिहास तिथले समाजजीवन याबद्दल सुप्त आकर्षण आहेच. कधीही सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याचे सूत्रधार शहर म्हणून लंडनची ख्याती होती. त्यामुळे अनेक देशांतील राजकारण्यांचा इथे राबता होता.
अगदी साठ-पासष्ट वर्षांपूर्वी दुसरे महायुद्ध संपेपर्यंत हिटलरी झंझावाताला तोंड देण्यासाठी जी युद्धनीती, डावपेच आखले गेले ते या लंडनमधूनच! या महायुद्धात जो विध्वंस, होरपळ झाली त्यात लंडनचा क्रमांक बराच वरचा लागेल. जगभर हिंडलेल्या पर्यटकाला आजही इंग्लंडच्या छोटय़ाशा बेटावरचे लंडन शहर पाहिल्याशिवाय जग पाहिल्यासारखे वाटत नाही. शेकडो वष्रे ‘साम्राज्याचा गाभा’ असलेल्या लंडनबद्दलचे सुप्त आकर्षण भारतीयांना तर वेगळेच आहे. बिटिश साम्राज्याच्या आधिपत्याचा आता मागमूसही शिल्लक नसला तरी लंडनवासियांच्या मातृभाषेचे – इंग्लिशचे -आधिपत्य जगावर नक्कीच आहे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा