मध्ययुगीन दर्यावर्दीना भर समुद्रातले आपले स्थान समजणे फारच कठीण ठरत असे. धृव ताऱ्यावरून किंवा मध्यान्हीच्या सूर्यावरून अक्षांश कळत असत व त्यामुळे उत्तर-दक्षिण प्रवासावर नियंत्रण ठेवता येत असे. परंतु पूर्व-पश्चिम प्रवास योग्यरीत्या होण्यासाठी रेखांश माहीत असण्याची गरज होती. रेखांश काढण्यासाठी स्थानिक वेळ आणि इंग्लंडमधील ग्रीनविचची वेळ (जिथले रेखांश शून्य मानले गेले आहेत ) माहीत असण्याची आवश्यकता होती. स्थानिक वेळ ही तारे – सूर्य – चंद्र यांच्या स्थानावरून काढणे शक्य होत असे. परंतु ग्रिनविचची वेळ कशी काढायची हा एक मोठाच प्रश्न होता.
चंद्र हा ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर सरकत असल्याने, रेखांश कळण्यासाठी दर्यावर्दी हे जर्मनीच्या टोबियास मायरने १७५० साली सुचवलेली ‘लूनर डिस्टन्स मेथड’ काही काळासाठी वापरत होते. प्रवासात एखाद्या ठरावीक स्थानिक वेळेला, ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवरचे चंद्राचे स्थान पाहिले जायचे. ग्रिनविचला हीच स्थानिक वेळ असल्यास, तेथे ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर चंद्र कुठे दिसेल हे टोबियासच्या तक्त्यांवरून कळायचे. या दोन ठिकाणच्या, चंद्राच्या स्थानांतील फरकावरून ग्रिनविचला हीच स्थानिक वेळ होऊन किती कालावधी गेला आहे हे समजायचे. हा कालावधी म्हणजेच जहाजाच्या स्थानाचे रेखांश! मात्र सागरी प्रवासातल्या निरीक्षणांतील अनिश्चिततांमुळे, या रेखांशांच्या अचूकतेवर बऱ्याच मर्यादा असायच्या.
रेखांशांबद्दलच्या अज्ञानामुळे जहाजे भरकटली जाऊन अनेक अपघात होत असत. हे टाळण्यासाठी १७१४ सालीच ब्रिटिश सरकारने रेखांश शोधण्याची अचूक पद्धत शोधणाऱ्याला वीस हजार पौंडांचे बक्षीस जाहीर केले होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले ते जॉन हॅरिसन नावाच्या एका सुताराने. १७३० सालापासून ते १७६१ सालापर्यंतच्या, तीस वर्षांतील विविध प्रयत्नांनंतर जॉन हॅरिसन याला जहाजांवर वापरता येईल, असे घडय़ाळ बनवण्यात यश आले. तेरा सेंटीमीटर व्यासाचे हे घडय़ाळ दिवसाला दोन सेकंदांहूनही कमी वेळ पुढेमागे होत असे. स्प्रिंगवर चालणाऱ्या या घडय़ाळात, चाकांचा वेग नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलन्स व्हीलच्या रचनेत हॅरिसनने वैशिष्टय़पूर्ण बदल केले होते. या घडय़ाळाद्वारे रेखांश मापन करताना, जहाजाच्या हेलकाव्यांचीच काय, पण तापमानातल्या बदलांचीही चिंता उरली नाही. हे घडय़ाळ पुढची सुमारे अडीचशे वर्षे प्रत्येक जहाजावर रेखांशाचे गणित करण्यासाठी अत्यावश्यक उपकरण म्हणून वापरले गेले.
– कॅप्टन सुनील सुळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org