उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना ‘मीठ खाऊ नका’ असा सल्ला डॉक्टर देतात. मिठावाचून जेवण ही कल्पनाच काही लोकांना करवणार नाही. मीठ म्हणजे सोडिअम क्लोराइड. यातील सोडिअममुळे शरीरात पाणी जास्त प्रमाणात राखले जाते. साहजिकच रक्तदाब वाढतो. त्यामुळे मीठ खाणे बंद करायला सांगतात. ‘लो सॉल्ट’ हे एक पर्यायी मीठ असून त्यात २/३ पोटॅशिअम क्लोराइड व १/३ सोडिअम क्लोराइड असते.
स्वयंपाकात टाकल्या जाणाऱ्या मिठाखेरीज इतर अनेक अन्नपदार्थातून शरीराला सोडिअमचा पुरवठा होत असल्याने मीठ खाणे बंद केले तरी शरीराला योग्य त्या प्रमाणात हा उपयुक्त क्षार मिळत राहतो. पण हे जरी खरे असले तरी जेवताना काही जणांना मीठ लागतेच. अशा लोकांसाठी साध्या मिठाऐवजी म्हणजे सोडिअम क्लोराइडऐवजी पोटॅशिअम वा मॅग्नेशिअम क्लोराइड अर्थात सोडिअम नसलेले मीठ उपयुक्त ठरते. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम क्लोराइडमुळे चव मिठाचीच लागते, पण सोडिअममुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत. बाजारात हे मीठ ‘लो सॉल्ट’, ‘के सॉल्ट’ या नावाने उपलब्ध आहे. पण पोटॅशिअम क्लोराइड हे सोडिअम क्लोराइडइतकेच घातक आहे. जर ७५ किलोच्या व्यक्तीने १९० ग्रॅम हे मीठ खाल्ले तर त्याच्या जिवावर बेतू शकते. अन्नपदार्थामधील सोडिअमचे प्रमाण कमी करण्यासाठी पोटॅशिअम लॅक्टेटचा वापर केला जातो. रक्तातील पोटॅशिअमचे प्रमाण वाढल्यास आरोग्यास घातक ठरू शकते. काही आजारांमध्ये व काही औषधांच्या परिणामामुळे शरीरातून पोटॅशिअमच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते. मूत्रिपड व हृदयाचे कार्य बिघडणे असे परिणाम दिसून येतात. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मिठाचा वापर करावा. व्यक्तीची पोटॅशिअमची दैनिक गरज सोडिअमपेक्षा जास्त असली तरी सामान्यपणे आपण सोडिअमचे सेवन जास्त प्रमाणात करतो. समुद्री तणांच्या पावडरचाही मिठाला पर्याय म्हणून वापर केला जातो. सोडिअमचे प्रमाण कमी करण्यासाठी जेवणातील मीठ कमी करणे हा खरे तर सर्वात सोपा उपाय आहे. विकतचे दुखणे घेण्यापेक्षा जिभेवर ताबा ठेवल्यास व थोडा संयम बाळगल्यास शरीरात अतिरिक्त प्रमाणात सोडिअम सेवन करण्याने होणारे दुष्परिणाम सहज टाळता येतील.
डॉ. जगन्नाथ दीक्षित (औरंगाबाद)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – त्या सावळ्या तनूचे..
‘श्रीकृष्ण’ या आवडत्या देवाच्या प्रतीकावर लिहायला पुष्कळ आहे. एका आयुष्यात या पूर्ण पुरुषानं यच्चयावत सर्व भूमिका पार पाडल्या. धोरणी श्रीकृष्ण, गीतोपदेश करणारा पार्थसारथी, द्वारकेचा राजा अशा पोक्त भूमिकेतील हा कृष्ण, बाळपणच्या लीलांकरिता तितकाच लोकप्रिय आहे.
पण मनापासून भावणारं कृष्णरूप म्हणजे मुरलीधर, गिरिधर गोपालांचा सर्वसामान्यांशी जवळीक साधणारा, त्यांच्यामधील एक होणारा, आई-वडील, भाऊ अशा कौटुंबिक आणि घरगुती नातेसंबंधात रमणारा हा कृष्ण आपला सन्मित्र होऊन आपल्याबरोबर राहतो, त्या कृष्ण रूपाला ‘अहो’ म्हणताच येत नाही.
तर गोरी राधेच्या प्रेमाचा आणि आत्मार्पणाच्या भावनांना आपलंसं करणारा कृष्ण शृंगाराचे मोहक आदर्श घालून देतो.
पण मित्रा, त्या रूपवती राधेच्या बरोबरीनं अष्टवक्रा कुब्जली होती आणि इतरही गोपी होत्या. त्यानंतर रंगरूपानं सामान्य कृष्णाच्या मोहकतेनं व्याकूळ होणाऱ्या स्त्रिया अशा सर्वसाधारण माणसांना आपलंसं करणारा श्रीकृष्ण पाहून मनाला गहिवरून येतं.
अशाच एका साध्यासुध्या गोपिकेचं ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे’ या भावगीतात सुरेख शब्दांकन केलंय.
मुळात माणिक वर्माचा स्वर म्हणजे जणू माणिकमोती. तजेलदार, पाणीदार आणि तितकाच निरागस. त्या सावळ्या तनूचे हे भावगीत ऐकताना असं वाटतं की घरातली कामं करता करता मध्येच न राहवून ती गोपिका थबकली असावी. तिच्या कमरेवर घडा असावा, नाहीतर ताक घुसळण्याकरता डेऱ्यात घातलेली रवी. कदाचित आंघोळ करताना स्वत:च्या ओलेत्या सुकुमार यौवनाकडे पाहून ती क्षणभर विसावली असावी. मन कृष्णाची सय येऊन भावविभोर झालं असावं. तिचा अवघा जीव कानात गोळा झाला असावा आणि कदाचित कृष्णाच्या पाव्याचे अनाहत सूर तिला ऐकू येत असावेत. शेजघरात भिरभिरून तिनं आइना शोधला असावा आणि नयनाच्या कोंदणात घननिळाची आठवण येऊन काजळाची रेघ रेखली असावी. आणि मनोमन लाजली असावी; एकटीच! फक्त त्याची आठवण काढून, ऊर धपापला असावा नि अंगावरचा पदर सावरत असावा. मन कसनुसं नि सैरभैर झालं असावं. सारं काही ठीक तर चाललंय मग हे पिसं आलं कुठून?
म्हणून ती म्हणते,
त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग
न कळे मनास आता, या आवरू कसे ग।
ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा
चोहिकडे बघे मी परिना कुठे दिसे ग।
हलतू तरू लतात, हा खोडसाळ वात
आलाच वाटते तो, मी सारखी फसे ग।
खुपते तनूस शेज, क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा, हृदयात जो वसे ग।
गीत : आत्माराम सावंत, संगीत- दशरथ पुजारी
स्वर : माणिक वर्मा, राग- जोग.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – सनातनी मनाचा मागासलेपणा कुरवाळून नवी राष्ट्र उभारणी होत नाही
‘‘अर्धवट विचार करणाऱ्या माणसांना इतिहास हा सर्व धर्मातीत राजवटींचा आणि लोकशाहीचा शत्रू असल्यासारखा दिसतो. कोणत्याही राष्ट्रात जय-पराजय, चढ-उतार, द्वंद्वाच्या दोन कोटींप्रमाणे एकमेकांला चिकटलेले असतातच. इतिहास शिवाजी विसरू देत नाही, तसा तो महंमद गझनीही विसरू देत नाही. भूतकाळातल्या जखमा इतिहास दर पिढीला जाग्या ठेवतो. त्या जखमा कधी बऱ्याच होऊ देत नाही. म्हणून वर्तमानकाळात हा इतिहास भिन्नधर्मीय लोकांचे मन एकत्र येण्यास एक महत्त्वाचा अडथळा ठरतो, असे काहीजणांना वाटते, तर काहीजणांना इतिहासातील राजे डोळ्यांत खटकत असतात.. इतिहासाशी फारकत घेऊन राष्ट्र उभे करता येईल, हा अनेकांच्या डोक्यात असणारा भ्रम आहे, तो भ्रम जितक्या लवकर निरस्त होईल, तितके चांगले. राष्ट्र इतिहास सोडून उभे राहत नसते. सत्य दडपून ठेवून असत्याच्या पायावर कशाचीच निर्मिती करता येत नसते. सोय म्हणून असत्याचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती दंभ वाढवीत असल्यामुळे लोकशाहीला जितकी मारक आहे, तितकी निर्भय सत्याची चिकित्सा लोकशाहीला मारक नाही.’’ नरहर कुरुंदकर ‘जागर’ (१९६९) या पुस्तकातील एका लेखात म्हणतात –
‘‘नवे भारतीय राष्ट्र उभे राहायचे असेल, तर ती उभारणी धर्मातीत लोकशाहीच्या पायावरच होऊ शकेल, या श्रद्धेने मी विचार करीत आहे. धार्मिक राष्ट्रवादाच्या पायावर या देशात उभारणी करणे अशक्य आहे, असे मला वाटत नाही. ते शक्य आहे. पण राष्ट्राच्या हिताचे नाही, अशी माझी धारणा आहे, धर्मातीत लोकशाहीची उभारणी धर्मप्रधान जीवनाच्या अत्यंत स्पष्ट व कठोर विश्लेषणातून व फक्त त्यातूनच शक्य असते. सनातनी मनाचा मागासलेपणा चोंभाळून, कुरवाळून नवी उभारणी करता येणे शक्य नसते. राष्ट्राच्या उभारणीत हा इतिहासाचा उपयोग असतो.. हलक्या, भाबडय़ा, स्वप्नाळू श्रद्धा सत्याच्या कठोर अग्नीत परिशुद्ध करून घेणे व अपरिहार्य वास्तवाची जाणीव करून देणे हे इतिहासाचे काम असते. तोच इतिहासाचा उपयोग असतो.’’