पूर्वी, एका विशिष्ट हवामानाच्या वातावरणात वापरात येणारी, एकवर्गीय (मोनोग्रेड) वंगणतेले, मोटारगाडय़ा, ट्रकसारख्या वाहनांच्या इंजिनात वापरली जातं. पुढे, हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही हंगामांत वापरली जाऊ शकणारी बहुवर्गीय (मल्टिग्रेड) वंगणतेले निर्माण झाली. वंगणतेले ही पेट्रोलियम ‘बेस ऑइल्स’ व रासायनिक पूरके(अ‍ॅडिटिव्ह्स) यांच्या मिश्रणाने बनतात. वंगणतेलातील त्यांचे प्रमाण साधारणत: ९०:१० असे असते. तापलेल्या इंजिनाला थंडावा देणे, इंजिन भागांना गंजू न देणे, एकमेकांवर घासणाऱ्या इंजिनभागात घर्षण न होऊ देणे, इंजिनात मळी साचू न देणे इत्यादी महत्त्वाची काय्रे वंगणतेले करीत असतात.
इंजिनातील वेगवेगळ्या भागांसाठी निरनिराळी वंगणतेले निर्माण केली जातात. इंजिनतेले ही गिअरतेलांपेक्षा वेगळी असतात. दुचाकी वाहनांचे वंगण हे चार चाकी वाहनांपेक्षा वेगळे असते. त्यांच्या आवश्यक जाडसरपणा (व्हिस्कॉसिटी)नुसार, त्यातील बेस ऑइल्स कमीजास्त प्रमाणात असली तरी त्यातली रासायनिक पूरके पूर्णत: भिन्न असतात. इंजिनतेलात असणारी पूरके वंगणतेलाचे उष्ण तापमानाला विघटन होऊ देत नाहीत, इंजिनभाग स्वच्छ ठेवतात, घर्षणाला आवर घालतात, तेलाला सहजपणे गोठवीत नाहीत की उकळून देत नाहीत. या उलट गिअर तेले गाडीचा वेग कमीजास्त होत असताना, गिअर यंत्रणेवर येणारा दाब शोषतात व त्या वेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेचा निचरा करतात.
औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी वंगणे ही गाडय़ांच्या इंजिनासाठी वापरल्या जाणाऱ्या वंगणापेक्षा सर्वस्वी वेगळी असतात. त्यांचे अतिरिक्त कार्य घुसळणाऱ्या यंत्रभागात निर्माण होणाऱ्या बुडबुडय़ांना आवर घालणे, यंत्रभागात घुसलेल्या पाण्याला निपटून काढणे या प्रकारची असतात.
हवा ही वंगणकार्यात अडथळा आणते, तसेच पाणी वंगणातील रासायनिक पूरकांशी संयोग पावले की अवक्षेप तयार होतो व वंगण निकामी ठरते. वंगणतेलात रंग मिसळून त्यांना आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला जातो. जपानमध्ये तर दुचाकीच्या वंगणतेलात अत्तर मिसळतात. तिथल्या महिला मोपेडचा (मोटर सायकल) मोठय़ा प्रमाणात वापर करतात. चुकीच्या वंगणतेलांच्या वापराने गाडीच्या इंधन भागांची नासाडी होते व डागडुजीचा खर्च वाढतो, प्रदूषणात भर पडते.
जोसेफ तुस्कानो, (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – जो सुख साधुसंग में
माणसाच्या जीवनाचे अंतिम ध्येय कोणते? या प्रश्नाला गेली हजारो र्वष आपण उत्तर शोधीत आहोत. अवघं अध्यात्म, सारं तत्त्वज्ञानशास्त्र आणि जीवविज्ञान या प्रश्नानं भारलेलं आहे. त्या चिंतनामधूनच माणसाला देव आणि दानव अथवा सैतान, नरक आणि स्वर्ग या संकल्पना स्फुरल्या आणि ध्येय कोणते? हा प्रश्न सोडवायला देवाचा आधार आणि सत्कृत्यामधील नीतिमूल्यांची मदत होऊ लागली. देव आणि स्वर्ग या संकल्पना पुढे एकमेकांत मिसळल्या आणि माणसं ‘राम’ म्हटल्यावर ‘स्वर्गवासी वा वैकुंठवासी’ इ. होऊ लागली.
देवत्वाला ‘राम’ असं नाव संकल्पून कबीरजींनी अनेक दोहे रचले. ‘राम’ म्हणजे सत्त्वशीलता, सर्वगुणसंपन्नता याचं प्रतीक म्हणून सर्वमान्य होतं. त्याचाच आधार त्यांनी घेतला. मात्र कबीरजी कच्च्या गुरूचे चेले नव्हते. रामनामाचं महत्त्व लोकांना पटविण्याकरता कर्मकांड आणि रूढी समाजात निर्माण झाल्या आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे, त्यांनी तेव्हाच लोकांना भानावर आणण्याला सुरुवात केली. त्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अपरिचित दोहा असा-
राम बुलावा भेजिया, दिया कबीरा रोय,
जो सुख साधुसंग में, सो वैकुंठ ना होय।।
कबीरजींनी डोळ्यांत वास्तवाचं अंजन घालण्याचं काम चोख पार पाडलंय.
खरं सुख कोठं असतं? आणि जगण्याचं ध्येय काय असावं? याची मर्मज्ञ आणि मार्मिक उत्तरं त्यांनी दिली आहेत.
त्यांना ठाऊक होतं की रामभक्तीचं अवडंबर माजवून ‘माझी- स्वत:ची स्वर्गात’ सोय लावण्याकरता लोकांच्या रांगा लागतील. मोक्ष अथवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी समाजाशी फटकून राहण्याचा ‘स्वार्थी’ विचार लोकांमध्ये बोकाळतोय. मी रामभक्ती करून वाट पाहत बसतो, कधी एकदा रामाच्या सहवासात राहायला मिळेल या गोष्टीची! ही रामभक्ती, खरीखुरी नव्हेच. रामाच्या सहवासातील स्वर्ग ही संकल्पना कपोलकल्पित आहे. खरं काय असेल, तर ते इथलं, इहलोकातलं जगणं! उगीच स्वर्गलोकीच्या आशेवर दिवस कंठून जनसंपर्क तोडण्यात अर्थ नाही. इथेच साधुसंतांच्या सहवासानं वैकुंठ निर्माण करायचं. मग संतसज्जनांच्या सहवासाला सोडून जाण्यात काय हशील? रामानं वैकुंठात बोलावण्याचं पाचारण केल्याची चाहूल लागली आणि कबीरजींना दु:ख झालं. मला ईश्वर आणि राम शोधायचा आहे, तो याच अवनीवरती. इथेच या भूलोकात. इथल्या जिवंत माणसांमध्ये.
इथल्या साधुसंतांच्या सत्संगामध्येच राहणं, त्यांच्याकडून ज्ञान मिळवणं आणि ते वाटणं हाच माझा स्वर्ग, हेच माझं सुख आणि हेच माझं ध्येय!
कबीर फक्त थोर कवी नव्हते, समाजाशी त्यांची नाळ घट्ट बांधलेली होती, ते समाजसंत होते..
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – जुन्यातून नवे उत्क्रांत होणे हीच जुन्याची खरी वाढ
‘‘मनुष्यानें जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणें विचार करावा व सत्य वाटणाऱ्या मतांचें ग्रहण करून जेथें संशय वाटेल तेथें कोणतेंच ठाम मत बनूं न देणें हें श्रेयस्कर आहे. धर्म, तत्त्वज्ञान, नीति आणि इतर सामाजिक र्निबध या सर्वाचीच खिचडी धर्माच्या रूढ कल्पनेंत झालेली आहे. या वेगवेगळ्या गोष्टींची फारकत होणें फार जरूर आहे, असें मला वाटतें. सनातन सत्य कोणतें, तें शोधून काढण्याचे मार्ग कोणते, ईश्वर आहे कीं नाहीं, असल्यास त्याचा आपला संबंध काय, व त्याच्यासंबंधाने आपलें कर्तव्य काय, वगैरे गोष्टींचा स्वतंत्रपणे विचार करण्याला प्रत्येक व्यक्तीला मोकळीक असली पाहिजे. आजपर्यंत समाजाचा – अर्थात् समाजांतील रूढ मतांचा – व्यक्तींवर फार दाब असल्यामुळें स्वतंत्र विचारांची वाढ अगदीं खुंटून गेलेली होती. अलीकडे हा दाब कमी होत जाऊन स्वतंत्र विचारांना अवकाश मिळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. लोकमतांत हा जो बदल होत चालला आहे त्यामुळें कांहीं व्यक्तींच्या उद्दामपणाला वाव मिळून क्वचित् प्रसंगीं स्वतंत्रपणाच्या नांवाखालीं स्वैर अत्याचारांना सवड मिळत आहे, ही गोष्ट खरी; परंतु स्वतंत्र विचारांचा कोंडमारा होण्यापेक्षां या बाजूनें होणारें नुकसान पुरवलें.’’ महर्षि धों. के. कर्वे यांचा सामाजिक सुधारणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमस्त असला तरी तितकाच आग्रही आणि बुद्धिवादी होता. ते लिहितात, ‘‘मनुष्यांनीं प्रामाणिकपणानें व सद्बुद्धीनें अनेक बाजूंनी विचार करून आपल्या आचरणाचा मार्ग ठरवावा, व तो अमलांत आणण्याला त्यांना समाजानें हरकत करूं नये; असें झाल्याशिवाय समाजाच्या अंगीं जिवंतपणा यावयाचा नाहीं. आपल्या राष्ट्रांत प्राचीन काळीं होऊन गेलेल्या सत्पुरुषांविषयीं व सद्ग्रंथांविषयीं आपणांमध्यें पूज्यबुद्धि व आदर पाहिजे ही गोष्ट खरी; तरी ‘न निदरेषं न निर्गुणम्’ हें न विसरतां परिस्थितीचा विचार करून व दिवसेंदिवस मनुष्यजातीची जी प्रगति होत आहे, ती लक्षांत घेऊन सत्याच्या बळकट आधारावर आपले विचार उभारले पाहिजेत. जुनें जशाचें तसें संभाळून ठेवण्यांत शहाणपणा नाहीं. जुन्यानव्यांचा एकजीव होऊन जुन्यांतून नवें उत्क्रांत होणें, हीच जुन्याची खरी वाढ होय.’’