लसूणघास हे द्विदल वर्गातील अतिशय महत्त्वाचे सदाहरित बहुवार्षकि चारा पीक आहे. त्यासाठी पिकाचे सिरसा ९, आनंद ८, आर.एल. ८८ हे वाण वापरले जातात. जनावराच्या उत्तम वाढीसाठी आणि सुदृढ प्रकृतीसाठी लसूणघासाचा चारा अत्यंत उपयुक्त ठरतो. लसूणघासाचे वार्षीय आणि बहुवार्षीय असे दोन प्रकार आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या जनावरांसाठी लसूणघासाचा वर्षभर पुरवठा म्हणजे आवडीच्या हिरव्यागार चाऱ्याची रुचकर व पौष्टिक मेजवानीच ठरते. लसूणघासाचा चारा सकस असल्याने जनावरे आवडीने खातात. लसूणघासाच्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाचक पदार्थ, चुना, फॉस्फोरिक आम्ल आणि जीवनसत्व अ व ड इत्यादी घटकांचा समावेश पुरेशा प्रमाणात असतो. लसूणघासामुळे जनावरांची भूक वाढते, पचनक्रिया सुधारते, शरीराची झीज भरून निघते व हाडांची आवश्यकतेप्रमाणे वाढ होते. शिवाय दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
मध्यम, पोयटायुक्त, काळ्या, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत, थंड व कोरडय़ा हवामानाच्या प्रदेशात हे पीक कमी-जास्त प्रमाणात वाढते. यासाठी खोल नांगरट करून, ढेकळे फोडून, कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. वाफे बांधणी करताना वरंबे नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडे रुंद व उंच ठेवावेत. हेक्टरी ३० किलो बियाण्यांची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला पंधरवडा या दरम्यान करावी. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी असावे. ५-६ टन शेणखत / कंपोस्ट खत पेरणीपूर्वी द्यावे. नत्र १५ किलो (३३ किलो युरिया), स्फुरद १५० किलो (९३८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), पालाश ४० किलो (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. प्रत्येक चारा कापणीनंतर १५ किलो युरिया, ५० किलो स्फुरद द्यावे.
लसूणघास कापणीनंतर खुरपणी करावी. पावसाळ्यात दर ८-१०, हिवाळ्यात १२-१४ व उन्हाळ्यात ६-८ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पेरणीनंतर पहिली कापणी ५५-६० दिवसांनी करावी. त्यानंतर २१-२५ दिवसांच्या अंतराने कापण्या कराव्यात. प्रतिवर्षी साधारण १०-१२ कापण्यांपासून १,०००-१,२०० क्विंटल हिरवा चारा एका हेक्टरमध्ये मिळतो.
जे देखे रवी.. – पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी – २
ज्ञानेश्वरीत भ्रमर, काजवा आणि टिटवी यांची गोष्ट येते. भ्रमराबद्दलची ओवी म्हणते जैसे भ्रमर परागु नेती। परि कमळदळे नेणती। तैसी परी आहे सेविती। ग्रंथाइये. कमळाला न कळता पराग उचलायचे आहेत. पुस्तकाशी मस्ती नाही. बुक मार्क नाही. समासात नोंदी नाहीत आणि काहीही अंडरलाइन वगैरे करायचे नाही. कव्हर घालणे, पुस्तक बायडिंगला पाठविणे, त्याची झेरॉक्स प्रत काढणे असल्या गोष्टी नाहीत. कळत-नकळत गीता मनात साठवायची आहे. अर्थात पराग भुंगा इतरत्र घेऊन जाणारच तसे आपणही मग गीतेतल्या शब्दार्थाची पसरण करायची.
मग येतो काजवा. अमृतातेही पैजा जिंकेन, गीतेला धरून मायबोलीत अशी रचना करीन की, कोण कोणाला शोभते हे कळणार नाही, अशी भाषा स्वत:बद्दल ज्ञानेश्वरांनी वापरली आहे; परंतु इथे मात्र आपले बहुरूपी ज्ञानेश्वर ‘‘माझ्या मनातली इच्छा अनावर झाली आहे म्हणून बोलतो; परंतु गीतेच्या सूर्यासमोर काजवा कुठला दिसायला,’’ असे उद्गार काढतात.
हे अनावर न विचारता। वायाची धिंवसा उपनला चित्ता।
येऱ्हवी भानूतेजी काय खद्योता। शोभा आथी।।
अशी ओवी ते सांगतात. खद्योत म्हणजे काजवा. धिंवसर म्हणजे उत्कट इच्छा. मग येते टिटवी एक लबाड पक्षीण. वाळूत घरटे करणारी, त्यात अंडी ठेवणारी, कोणी श्वापदांची नजर वळाली तर मरून पडायचे नाटक करणारी, जेणेकरून हिला कशी अंडी होतील, असे श्वापदांना वाटेल. मग श्वापदे गेली की टिव-टिव करीत पिल्लांसाठी दर पाच-दहा मिनिटांनी आपल्या छोटय़ाशा चोचीत पाणी घेऊन पिल्लांना पाजणारी. पाणी आहे समुद्राचे. केवढे तरी अमाप. हे समुद्राचे पाणी म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वर स्वत: टिटवी.
ओवी म्हणते
टिटिभू चांचुवरी। माप सुये सागरी। मी नेणतु त्यापरी। प्रवर्ते येथ।।
टिटवीने चोचीने समुद्राचे पाणी उपसावे तसा मी हा अजाण गीतेवर बोलेन असे म्हणणे आहे. नंतर येते चिलट, हे उडून उडून पन्नास फूट वरती आकाशात जात नसेल. आता ज्ञानेश्वर स्वत:ला चिलट म्हणतात.
ओवी म्हणते
हे अपार कैसेनि कवळावे। महातेज कवणे धवळावे।
गगन मुठी सुवावे। मशके केवीं।।
या अपार गगनाला मी कसा कवेत घेऊ, हे महातेज (सूर्य) मी कसा उजळणार आणि चिलटाने आपल्या मुठीत हे आकाश कसे घ्यावे. पशु-पक्षी, कीटक सगळ्यांचे मोठे सूक्ष्म निरीक्षण आहे आणि ते एका तत्त्वकाव्याच्या दावणीला कळत नकळत जोडले जात आहे.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – स्किझोफ्रेनिया : एक मानसिक आजार – भाग १
ज्यांना इंग्रजी चित्रपट पाहायची हौस आहे त्यांनी ‘ए ब्यूटिफूल माइंड’ हा चित्रपट बहुधा पाहिला असावा. नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ जॉन नॅश यांच्या जीवनकथेवरील हा चित्रपट आहे. या थोर शास्त्रज्ञाने स्कि. फ्रे. या आजाराशी चिवट लढा देऊन नोबेल पारितोषिकापर्यंत कसा दमदार प्रवास केला, हे चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे. हा विकोर पूर्णपणे बरा होत नाही. पण औषधोपचारांच्या मदतीने ‘छिन्नमानसिकता’ अशा स्वरूपाच्या रोगावर पूर्णपणे नियंत्रण आणता येते. इंडियन एक्सप्रेस बुधवार, १९ जून २०१३ स्किझोफ्रेनिया वरील लेख वाचावा. लेखासोबतचे, खिडकीच्या गजाला डोके टेकलेले मुलाचे चित्र पाहावे. तसेच लोकसत्ता, ८ जून २०१३ स्किफ्रेवरील लेख वाचावा. तुम्ही आम्ही केव्हा तरी अशी बालके- मनाने हातबल झालेली; असंबद्ध बोलणारी, स्वत:च्या विश्वात रमणारी, साध्यासुध्या प्रसंगाला विचित्र प्रतिक्रिया देणारी, भरल्या घरात एकटेच राहण्याचा आग्रह करणारी पाहिली असतील, ऐकली असतील.
अशी मुले त्यांच्या पूर्वायुष्यात खूपच हुशार असतात. शाळेतील वर्गात नेहमी वरचा क्रमांक असतो आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात जमीन अस्मानाचा फरक पडतो. उंच डोंगरावरून खोल दरीत फेकल्यासारखी मुलाची अवस्था होते. या आजारात त्या व्यक्तीचे विचार, भावना आणि कृती यात ताळमेळ नसतो. व्यक्तीला वास्तवाचे भान राहात नाही. सामान्यपणे ‘भास आणि भ्रम’ ही दोन प्रमुख लक्षणे या विकारात असतात. हे भास कोणत्याही ज्ञानेंद्रियांच्या कार्यासंबंधी असतात. तुम्हा आम्हाला जे ऐकू येत नाही, दिसत नाही, स्पर्श होत नाही व चव कळत नाही, ते या दुर्दैवी रुग्णांना भास स्वरूपात ठामपणे जाणवते. ‘आपणाला कोणीतरी छळत आहे, आपल्यावर दबाव आणत आहे किंवा आपल्याकडे काही विशेष शक्ती आहे’ अशी भ्रमिष्ट लक्षणे या दुर्दैवी रुग्णांमध्ये वाढती असतात. भास म्हणजे ‘हॅल्युसिनेशन्स’ व भ्रम म्हणजे ‘डिल्युजन्स’ यांचा सामना पुढील लेखात!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २५ जुलै
१८९७ > ‘तरुणी शिक्षण नाटिका’ आणि ‘संतती कायद्याचे नाटक’ लिहून सद्य सामाजिक विषयांवरील मराठी नाटकांचा पाया रचणारे नारायण बापूजी कानिटकर यांचे निधन. ४५ वर्षांच्या आयुष्यात, वकिली शिक्षणानंतर त्यांनी १० नाटके लिहिली होती, त्यांत बडोदे संस्थानातील विषप्रयोग (मल्हारराव महाराज), क्रॉफर्ड प्रकरण (नाटय़विजय) हे विषय, ऐतिहासिक कथा व अनुवाद यांचा समावेश होता.
१९२२ > कवी, गीतकार, ‘नवशाहीर’, बालसाहित्यिक वसंत बापट यांचा जन्म. ‘बिजली’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह सामाजिक वास्तवाला महत्त्व देणारा होता. राष्ट्र सेवा दलासाठी अनेक नाटिका लिहिणाऱ्या बापट यांचे भाषेवरील प्रभुत्त्व इतके होते की, ‘चिंधीचे गाणे’ सारखी चित्रपटगीते, जाहिराती, पोवाडे, समरगीते, ‘झेलमचे अश्रू’सारखे गीत-नृत्यनाटय़ आणि प्रेमकाव्येही त्यांनी ताकदीने लिहिली. ‘बारा गावचे पाणी’ (प्रवासवर्णन) आणि ‘जिंकुनि मरणाला’ (व्यक्तिचित्रे) असे गद्यलेखन त्यांनी केले. २००२ साली ते निवर्तले.
१९३४> समीक्षक व ललित लेखक दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी यांचा जन्म. त्यांच्या समीक्षालेखनाची आतापर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संजय वझरेकर