नियंत्रित खर्च आणि उत्पादन वाढ हे किफायतशीर व्यवसायाचे सूत्र असते. दुग्ध व्यवसायात प्रमुख खर्च गुरांच्या खाद्यावर (६५ ते ७० टक्के) आणि खरेदीवर (२० टक्के) होतो. तर मिळकत प्रामुख्याने दूधविक्रीतून (९० टक्के) होते. हा व्यवसाय करताना शास्त्रीय दृष्टिकोन आणि व्यापारी वृत्ती ठेवावी. जमाखर्च नोंदी, प्रत्येक गायीचे/ म्हशीचे दूध उत्पादन, दुभते दिवस, भाकड दिवस, आजारपण, प्रजननविषयक नोंदी ठेवाव्यात. यामुळे दूध उत्पादन खर्च काढता येतो. नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या गुरांचे संगोपन टाळून खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
दुधाळ गुरांचे संगोपन : दुधाळ जातींची जनावरे पाळल्यास दुग्ध व्यवसायात खात्रीने नफा मिळतो. विताच्या ३०० दिवसांत किमान २४०० लिटर दूध देणाऱ्या संकरित गायी, वितास किमान १८०० लिटर दूध देणाऱ्या मुरहा आणि मेहसाणा जातीच्या म्हशी यांचे संगोपन करावे.
दुधाळ गुरांचा कळप तयार होण्यासाठी सिद्ध वळूंच्या वीर्यमात्रांचा वापर करावा. कळपाच्या सरासरी दूध उत्पादनापेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी/ म्हशींचेच संगोपन करावे. मुरहा जातीच्या वळूंपासून म्हशींचा दुधाळ स्वरूपाचा कळप तयार करावा. दर्जेदार कालवडी/ पारडी संगोपनाद्वारे गुरे खरेदी खर्चावर नियंत्रण ठेवावे.
खाद्य व्यवस्थापन: दुधाळ गायी/ म्हशींना गरजेइतके सकस, समतोल खाद्य, चारा द्यावा. खाद्य कमी प्रमाणात दिल्यास खाद्य खर्चावर नियंत्रण येत नाही. उलट दूध उत्पादन कमी होऊन नुकसान वाढते. उसाचा वरचा पाला, पेंढा, गहू सरमड असे पोषणमूल्य कमी असणारे खाद्य दुधाळ गुरांना दिल्यास पोषण घटकांच्या (पिष्टमय घटक, प्रथिने, खनिज घटक) कमतरतेमुळे दूध उत्पादन घटते. गायी/ म्हशी माजावर येत नाहीत. गाभण राहत नाहीत. त्यामुळे भाकड कालावधी वाढून व्यवसायात नुकसान होते.
दुधाळ गुरांना शारीरिक पोषणासाठी प्रतिदिनी दोन किलो पशुखाद्य (खुराक) आणि प्रति तीन किलो दूध उत्पादनासाठी एक किलो पशुखाद्य लागते. हिरवी वैरण साधारणपणे प्रतिदिनी २० किलो आणि सुका चारा (कडबाकुट्टी/ सुके गवत/ पेंढा) पाच किलो लागतो. खुराक आणि वैरण देण्याचे प्रमाण वैरण उपलब्धतेनुसार निश्चित करावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा