दूध उत्पादनात दर्जाचे सातत्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. कासेच्या आजारामुळे गुरांचे दूध उत्पादन थांबून कायम स्वरूपाचे नुकसान होते; यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, दूध काढणाऱ्या व्यक्तीने साबण, पाणी वापरून हातपाय स्वच्छ करावे. धुण्याचा सोडा गरम पाण्यात टाकून (४ टक्के) दूध काढण्याची, साठवण्याची भांडी स्वच्छ करून घ्यावीत. दूध काढण्याच्या यंत्राचा वापर करावा. दूध त्वरित थंड करावे. यामुळे दुधाचा दर्जा सुधारतो. दूध नासणे टाळता येते.
गुरांचे आरोग्य : किफायतशीर दुग्धव्यवसायासाठी गुरे निरोगी असायला हवीत. सकस आहार दिल्याने खाद्य कमतरतेमुळे होणारे आजार टाळता येतील. जिवाणू, विषाणूंद्वारे होणारे आजार रोगप्रतिबंधक लसीकरणाच्या नियमित कार्यक्रमाद्वारे टाळता येतील. गोठय़ाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, धुण्याचा सोडा, चुना समप्रमाणात घेऊन फवारणी करणे, शेणमूत्राची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, भटक्या गुरांचा संपर्क टाळणे, पाण्याच्या टाक्या, गव्हाणी यांना दर पंधरा दिवसांनी चुनासफेदी करणे अशा उपाययोजनेद्वारे गुरांचे आजार टाळता येतील. जंतांचा त्रास टाळण्यासाठी दर तिमाहीस जंतनाशक (कृमीनाशक) औषध पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार सर्व गुरांना पाजावे. गोचीड, गोमाश्यांचा प्रादुर्भाव असल्यास गुरांच्या अंगावर, गोठा आणि परिसरात कीटकनाशक औषध वापरावे. वैयक्तिक पातळीवर गोचीडनियंत्रण करण्याऐवजी सामुदायिक पातळीवर एकाच वेळी गोचीडनाशक कार्यक्रम घ्यावा. आजारी गुरांना त्वरित पशुवैद्याद्वारे पूर्ण उपचार करून घ्यावेत.
गुरांचा गोठा : गुरांचे संगोपन गोठय़ात करावे. गायी-म्हशींना पॅडॉकमध्ये (अंगणात) मोकळे सोडावे. पॅडॉकमध्ये गव्हाण आणि पाण्याची टाकी असावी. पॅडॉकच्या एका बाजूस शेड असावी. उन्हाच्या वेळी गुरे शेडमध्ये आराम करू शकतील. गोठा, पॅडॉक कुंपणाने बंदिस्त करावे.
तणाव टाळणे : दुधाळ गुरांना दूध उत्पादनाचा तणाव असतो. आवश्यकतेनुसार सकस आहार देऊन तणाव कमी करता येईल. उन्हाळ्यात गुरांना सावलीत ठेवण्याची तजवीज करावी. त्यांच्या पाठीवर ओल्या गोण्या ठेवाव्यात. शक्य असल्यास पंख्याचा वापर करावा. थंड पाणी पाजावे. याद्वारे उन्हाळ्याचा तणाव कमी करता येईल. पायातील जखमा, अस्वच्छ गोठा यामुळेदेखील तणाव येतो.
कुतूहल – किफायतशीर दूध उत्पादन- ३
दूध उत्पादनात दर्जाचे सातत्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. कासेच्या आजारामुळे गुरांचे दूध उत्पादन थांबून कायम स्वरूपाचे नुकसान होते
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-08-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucrative milk production