डॉ. श्रुती पानसे

प्रत्येक पालकाला माहीत असतं की मुलं कधी ना कधी खोटं बोलतात, काही तरी कहाण्या रचतात, वेगळेच प्रसंग रचून सांगतात. मुलांच्या मनात काय चाललं आहे हे जर पालकांनी मुलांचा चेहरा बघून ताडण्याचा प्रयत्न केला तर लगेच कळतं की त्यांचा चेहरा अगदी पारदर्शी आहे, मनात काय चाललं आहे हे अगदी आरपार दिसू शकतं. खरं काय आहे ते आपल्याला सहज कळतं. एखाद्या वेळी सहज गंमत म्हणून किंवा शिस्त पाळायची नसेल तर मुलं खोटं बोलून जातात. वयात येणाऱ्या मुलांशी पालक बोलत असतात. गप्पा मारत असतात. पण तरीही आपल्या मुलांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहात नाहीत, तिथून ही समस्या सुरू होते. एका छोटय़ाशा खोटय़ातून खोटय़ाचं जाळंच विणलं जातं.

लहान मुलांना अशी नैसर्गिकच इच्छा असते की खरे घडलेले प्रसंग, न घडलेले प्रसंग आणि मनातल्या कल्पना यात काही तरी सरमिसळ करावी. कारण त्यांच्या मनात यातला फरक धूसर असतो. त्यांच्या दृष्टीने खरं आणि खोटं म्हणजे जणू काही एखादा खेळच. ते जसजसे मोठे होतात, तसतसं तो तुम्हाला गमतीत फसवू शकतो का, हे बघत असतो.

लहानपणी मुलांना ‘काऊ येऊन घेऊन गेला’ इथेच याची सुरुवात होते. मुलं मोठी होतात तशी ‘काऊनी नेलं नाही तूच लपवलं’ असं म्हणतात. याच पद्धतीने मुलं शाळेतल्या गोष्टी रचून सांगतात. तेव्हाच ते का रचताहेत, हे पडताळून पाहिलं पाहिजे. पण प्रात्येक वेळेला हे खोटं बोलणं नसतं. मुलांची कल्पनाशक्ती हवी तितकी धावली पाहिजे. एकूण आयुष्यासाठी कल्पनाशक्ती ही फार महत्त्वाची असते. नवनिर्मितीसाठी कल्पनाशक्ती हवीच. त्यासाठी मुलांबरोबर एकत्र बसून काल्पनिक गोष्टी रचायला हव्यात. त्या गोष्टीमध्ये ‘असं झालं तर काय होईल बरं..’ अशा मुक्त प्रश्नांना आणि मुक्त विचारांना जागा असली पाहिजे.

मुलं खोटं बोलत आहेत असं वाटेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे नीट बघून, त्यांच्या बोलण्यावरून खोटं बोलत आहे का याचा अंदाज घ्यायला पाहिजे आणि खोटं बोललेलं समजतं आहे हे सांगायला पाहिजे. कारण मेंदूच्या दृष्टीने खोटं बोलणं याला काही जागाच नाही. कारण ते प्रत्यक्ष घडलेलं नाही. न्यूरॉन्सची जुळणी न होताच बोललं गेलेलं आहे.

contact@shrutipanse.com