काव्यात अंतर्मुख होऊन, स्वत:बद्दल विचार करणाऱ्या महादेवी या कोषातून बाहेर येऊन, समाजोन्मुख, बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाने गद्यलेखनात व्यक्त होतात. गद्यलेखनात महादेवी अवतीभवतीची माणसं, प्राणी-जगत, तत्कालीन साहित्यिक घडामोडी, साहित्यिक विचारधारा, आपली एकूणच शिक्षण पद्धती- या सर्वाचं सजग, चौफेर दर्शन घडवतात. महादेवी वर्माच्या गद्य साहित्यिात- ‘प्रतितके चलचित्र’ (१९४३), ‘स्मृतिकि रेखाएँ’ (१९४३), ही शब्दचित्र, ‘पथके साथी’ (१९५६), ‘मेरा परिवार’ (१९७२), ‘संस्मरण’ (१९८३) – ही संस्मरण आठवली आहेत. त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांचे संकलन- ‘संभाषण’ (१९७४) – हे तर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यविषयक आणि एकूणच स्त्रीविषयक विचारांचे उत्कृष्ट संकलन आहे. या व्यतिरिक्त ‘शृंखलाकी कडियाँ’, ‘साहित्यकारकी आस्था तथा अन्य निबंध’, ‘संकल्पित’ हे लेखसंग्रह आणि ‘क्षणदा’ हा ललितलेखसंग्रह- हे सारेच महादेवींच्या साहित्याची, त्यांच्या विचारधारेची परिपूर्ण ओळख करून देणारे गद्यसंग्रह आहेत.
लेखिकेला भेटलेल्या व्यक्ती, साहित्यिक- त्यांचे स्वभाव- विशेष, या साऱ्यांचे विलक्षण जिवंत चित्रण लेखिका करते.गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, अशा सर्व स्तरांतील स्त्रियांच्या अडचणी, बालविधवेची समस्या, सतीचा प्रश्न, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न अशा अनेक अंगांनी विचार करून लिहिलेले- ‘शृंखला की कडियाँ’तील सारे विश्व- हे ‘स्त्री’ या विषयावरील परिपूर्ण स्वरूपाचे पुस्तक आहे.
भारतीय स्त्री एकीकडे मंदिरातील अधिष्ठात्री देवता, देवी रूपात असते तर दुसरीकडे आपल्याच घरातील एका अंधाऱ्या, धूळभऱ्या कोपऱ्यात बंदिवान असते. तिला जेवढा आदर मिळतो, तेवढीच अवहेलना, अनादरही सोसावा लागतो. महादेवी हे अनुभव केवळ शब्दबद्ध करून थांबल्या नाहीत, तर या विदारक अवस्थेवर आपल्या परीने विधायक उपाय सुचवले, स्वत:ही साहाय्य केले.
आपल्या आश्रमात काहींना आश्रयही दिला. यासंदर्भात त्या म्हणतात, ‘स्त्री-जीवनात काही विधायक बदल घडायला हवे असतील तर स्त्रीने आपल्या आदर आपणच राखायला हवा. त्यासाठी स्वत्वाची जाणीव आणि आत्मविश्वास हवा.’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
अॅव्होगॅड्रो स्थिरांक
पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे ‘अणू’. अणूमुळेच त्या पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म ठरतात. साधारण अणूचा आकार १०० पिकोमीटर (१०-१२ मीटर) इतका असतो.
सर्वच पदार्थ अणूच्या अवस्थेत असतात असे नाही. धातूरूप मूलद्रव्ये अणूच्या अवस्थेत, तर अधातूरूप मूलद्रव्ये अणू किंवा रेणूच्या स्वरूपात आढळतात. हेलियम, निऑन, ऑरगॉन यांसारखे निष्क्रिय वायू अणूच्या अवस्थेत तर हायड्रोजन, नायट्रोझन, ऑक्सिजन, क्लोरिनसारख्या क्रियाशील वायूचा रेणू दोन अणूंचा बनलेला असतो. मिठाचा म्हणजे सोडियम क्लोराईडचा रेणू दोन अणूंपासून, तर मॅग्नेशियम क्लोराईडचा रेणू तीन अणूंपासून बनलेला असतो.
एक ग्रॅम पदार्थात किती अणू किंवा रेणू असतील? विज्ञानात या प्रश्नाचे उत्तर ‘असंख्य’ असे सांगून चालणार नाही. याचे उत्तर शोधण्यासाठी अॅव्होगॅड्रो स्थिरांकाचा (६.०२३ ७ १०२३) उपयोग केला जातो. कसे? ते पुढील उदाहरणांतून पाहू.
पदार्थाच्या अणूभाराइतका पदार्थ म्हणजे एक ‘मोल’. हेलियम अणूस्वरूपात आढळतो. हेलियमचा अणुभार ४ आहे. एक मोल हेलियम म्हणजे ४ ग्रॅम हेलियम. या ४ ग्रॅम हेलियममध्ये अॅव्होगॅड्रोच्या स्थिरांकाइतके रेणू असतात. शास्त्रीय भाषेत यालाच ‘एक ग्रॅम रेणू’ म्हणतात.
हायड्रोजनचा रेणू हायड्रोजनच्या दोन अणूंनी बनलेला असतो. हायड्रोजनचा रेणूभार २ आहे. म्हणजेच हायड्रोजनच्या एक ग्रॅम रेणूमध्ये (एक मोलमध्ये) अॅव्होगॅड्रोच्या स्थिरांकाइतके रेणू असतात. त्यातील अणूंची संख्या दुप्पट असते.
अशा प्रकारे प्रत्येक पदार्थातील अणू व रेणूंची संख्या सांगता येते. अशाच प्रकारच्या इतर उदाहरणांसाठी खालील तक्ता पाहा.
अमेडिओ अॅव्होगॅड्रो (१७७६-१८५६) या इटालियन शास्त्रज्ञाने ‘सारखेच तापमान व सारखाच दाब असणाऱ्या सर्व वायूंच्या सारख्याच घनफळातील रेणूंची संख्या ही सारखीच असते’, हा सिद्धांत १८११ मध्ये मांडला. त्यांच्या हयातीत त्या नियमाचा स्वीकार झाला नाही. कान्नीद्झारो यांनी १८६० मध्ये अॅव्होगाड्रो यांच्या नियमाचे सोप्या भाषेत शास्त्रीय स्पष्टीकरण दिले.
फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ जीन पेरिन यांनी १९०९ मध्ये ६.०२३ ७ १०२३ या स्थिरांकाला अॅव्होगाड्रोचा स्थिरांक म्हणून सर्वप्रथम संबोधले. पेरिन यांना १९२६ मध्ये त्यांच्या अॅव्होगाड्रोचा स्थिरांक ठरवण्याच्या विविध पद्धतीच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.
– डॉ. सतीश कोलते
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२