कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म म्हणजे त्याचा रंग, विद्युतवहनशक्ती, उष्णतावहनशक्ती, चुंबकीयशक्ती, प्रकाशपरावर्तन शक्ती, प्रकाश शोषून घेण्याची शक्ती आणि त्यातून ध्वनिलहरी वाहू देण्याची शक्ती हे सर्व काही त्यामध्ये असलेल्या अणू-रेणूंवर असते. मात्र कोणत्याही पदार्थाचे आकारमान ठरावीक आकारमानापेक्षा लहान झाल्यास त्याचे गुणधर्म आकारमानानुसार बदलू लागतात. ठरावीक आकारमानापेक्षा किती असावे हे त्या पदार्थावरसुद्धा अवलंबून असते. नॅनो विज्ञान-तंत्रज्ञान विकासाचा प्रमुख आधार हाच आहे. १९व्या शतकात विकसित झालेल्या आधुनिक पोलादापासून आजच्या अत्याधुनिक ‘स्मार्ट मटेरियल्स’पर्यंत सर्वच पदार्थाच्या विकासाचे प्रमुख सूत्र सूक्ष्म स्तरावर त्यांची संरचना नियंत्रित करणे हेच आहे. याच स्तरावरील रचनेतून त्यांची व्यावहारिक पातळीवर वर्तणूक ठरते. या आण्विक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर नियंत्रण मिळवून हव्या त्या संरचनेचे पदार्थ बनविणे हा नॅनोविज्ञानाच्या विकास प्रक्रियेचा प्रमुख गाभा आहे.
अगदी साधे उदाहरण म्हणजे पदार्थाचा रंग. चांदीचा रंग पांढरा, तर सोन्याचा पिवळा असतो. परंतु सोन्यासारखी पिवळीधम्मक आणि केवळ चांदीचे अणू असणारी चांदी आणि रूबीसारखे दिसणारे लालसर सोने प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ आता सहजगत्या तयार करताना दिसतात.
पदार्थ द्रवरूप होण्याची प्रक्रिया बहुतेक सर्व पदार्थाचे द्रव, घन किंवा वायू रूपात स्थित्यंतर हे काही ठरावीक तापमानालाच होत असते. मात्र नॅनो आकारमानातील घनपदार्थाचे द्रवरूपात स्थित्यंतर होण्याचे तापमान कित्येक शेकडय़ांनी बदलते. उदारणार्थ सोने सुमारे १०६४ अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. परंतु ५ नॅनोमीटर आकाराचे सुवर्णकण सुमारे ८०० अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. परंतु ३ नॅनोमीटर आकाराचे कण २५० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानालाच वितळतात.
नॅनो कण तयार करण्याच्या अनेक पद्धती हल्ली, विशेषत: रसायनशास्त्राचा उपयोग करून विकसित होत आहेत. रासायनिक अभिक्रिया करताना वापरलेले द्रव पदार्थ काढून टाकल्यावर उरलेले पुडीच्या रूपातील पदार्थ वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येतात. त्यांचे पातळ पापुद्रे(थिन फिल्म्स)सुद्धा तयार करता येतात. पाणी आणि तेलाच्या मिश्रणाचा म्हणजे मायक्रोइमल्शनचा वापर करून सूक्ष्म नॅनोकण तयार करण्याचे तंत्रज्ञान बऱ्याच प्रमाणात विकसित झालेले आहे. त्याचे औषध जगतामध्ये खूप महत्त्व आहे.
शैलेश माळोदे (नाशिक) – मराठी विज्ञान परिषद, , वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल -मानवनिर्मित नॅनो कण
कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म म्हणजे त्याचा रंग, विद्युतवहनशक्ती, उष्णतावहनशक्ती, चुंबकीयशक्ती, प्रकाशपरावर्तन शक्ती, प्रकाश शोषून घेण्याची शक्ती आणि त्यातून ध्वनिलहरी वाहू देण्याची शक्ती
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made nano particles