बंदिस्त शेळीपालनात ५० शेळ्यांचा कळप फायदेशीर ठरतो. कळपामध्ये २५-३० माद्यांसाठी एक नर असावा. पारंपरिक शेळीपालनामध्ये शेळ्यांना रानात चरण्यासाठी मोकळे सोडल्यामुळे त्यांना विविध प्रकारचा नसíगक चारा मिळतो. त्यातून त्यांना महत्त्वाचे सर्व अन्नघटक उपलब्ध होतात. परंतु बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांना चरण्यासाठी रानात मोकळे सोडत नसल्यामुळे त्यांच्या पोषणाची विशिष्ट काळजी घ्यावी लागते.
एका शेळीला २४ तासांत ५-६ किलो चारा लागतो. यापकी ३-४ किलो हिरवा चारा व १-२ किलो वाळलेला चारा द्यावा. दिवसातून चार वेळा ओला व वाळलेला चारा द्यावा. सकाळी आठ वाजता, दुपारी बारा वाजता तसेच चार वाजता व रात्री आठ वाजता या प्रकारे चार वेळा चारा द्यावा. एका शेळीला २००-२५० ग्रॅम खुराक द्यावा. खुराकासाठी मका, गहू, ज्वारी, बाजरी यांचा वापर करावा. क्षारांच्या विटा गोठय़ामध्ये टांगत्या ठेवाव्यात. चाऱ्यासाठी सुबाभूळ, शेवरी, गिन्नीगवत, मका, कडवळ, मेथीघास, खुरपलेले गवत, कडबा, शेतातील पालापाचोळा यांचा खाद्यान्न म्हणून वापर करता येतो.
शेळ्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल अशा प्रकारे चारा पिकांचे नियोजन करावे. आठवडय़ातून एक-दोन वेळेस कडुिलब, विलायती चिंच, आंबट चिंच आणि बांबू या झाडांचा पाला खाद्य म्हणून दिल्यास शेळ्यांमध्ये आजाराचे प्रमाण कमी राहते. शेळ्यांना पिण्यासाठी गोठय़ात स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहील, याची काळजी घ्यावी. पाणी साठवण्याचे भांडे रोजच्या रोज धुवून स्वच्छ करून पुन्हा भरून ठेवावे. त्यामुळे शेळ्यांना पाण्यापासून होणाऱ्या आजाराचे प्रमाण कमी राहते. गोठय़ातील शेळ्यांचे आंत्रविषार, घटसर्प, लाळ्याखुरकत व पीपीआर या महत्त्वाच्या आजारांसाठी वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसीकरण करावे. तसेच आजारी शेळ्यांना वेळच्या वेळी औषधोपचार करावेत. शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याने दर चार महिन्यांनी असे वर्षांतून तीनदा जंतप्रतिबंधक औषधोपचार करावेत. शेळ्यांच्या शरीरावर उवा, पिसवा व गोचीड यांसारखे बाह्य़ परोपजीवी मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्यांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
जे देखे रवी.. – अज्ञान (बगळ्यांबद्दल?)
जेवताना खडा लागला तर तो काढावाच लागतो. त्याला वेळ लागतो, पण काढल्याशिवाय जेवता येत नाही, अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. तसेच अज्ञान दाखविल्याशिवाय ज्ञान कळत नाही. म्हणून अज्ञानाची लक्षणेही सांगण्यात आली आहेत. ही अज्ञानाची टोपी कोणाला किती ‘फिट’ बसते, हे प्रत्येकाने ठरवावे.
प्रतिष्ठेवर जो जगतो। मान सन्मानाची वाट पाहतो। सत्काराने ज्याला होतो। हर्ष।।
विद्येचा घालतो पसारा। पुण्य कर्माची पेटतो दवंडी। सारे काही करतो। कीर्तीसाठी।।
भात्यासारखा फुगतो। वारा गेला की पडतो। लाभाने किंवा हानीने। माजतो किंवा मरगळतो।।
भुकेले कुत्रे। जसे खाते नासके उघडे। तसे पैशाबद्दल। अज्ञानाचे।।
म्हणतो मीच तो एक। माझ्याच घरी ऐश्वर्य। मीच काय ते सर्व। जाणतो
मीच एक जाणतो। मीच केवळ प्रख्यात। गर्वाने संतुष्ट। आणि ताठ।।
रोग्याने वागावे बेताल। मग होते त्याची तळमळ। तशी ह्य़ाच्या पोटात मळमळ। दुसऱ्याच्या सुखाने
दिवा जसा वात वारा खातो। तेलाला पितो। आणि काजळी होऊन। उरतो।।
पाण्याने तडतडतो। फुंकला की विझतो। पसरला की। सगळेच भस्म करतो।।
फक्त मिणमिणतो। तेवढय़ानेच गरम होतो। एवढाच तो। विद्यावान असतो।।
मस्त खाणे पिणे। आणि स्वस्थ झोपणे। त्यात रोगाचे सुप्त असणे। हे न जो जाणे।। उपनिषदांकडे नाही कल। योगशास्त्राची नाही आवड। अध्यात्माचा। नाही गंध।। आत्मचर्चा हे शास्त्र। बुद्धीने होते प्राप्त। ही तर भली मोठी थाप। असे म्हणत सुटतो भन्नाट।। कर्मकांडाची असते जाण। पुराणे तोंडपाठ। ज्योतिषात निष्णात। तो म्हणेल ते घडते।।
कलेत निपुण। पाककलेत पटाईत। अथर्वातले तंत्र। ह्य़ाच्या हातात।।
कामशास्त्राची संपूर्ण जाण। नाटय़शास्त्र तर पाठ। वेदांमधले मंत्र। स्वाधीन ह्य़ाच्या।।
कळतो ह्य़ाला कायद्याचा विचार। जादूटोण्याचे प्रकार। शब्दांचे कोष। ह्य़ाचे चाकरदार।।
व्याकरणात तरबेज। तर्कशास्त्रात गाढ । केवळ अध्यात्मातच। ठार आंधळा।।
अध्यात्म हेच खरे तर एकत्व। ते सोडून शोधतो सर्वत्र। नक्षत्राने नाही उजाडत। जळो हा।।
मोरांची पिसे। त्यावर असतात शंभर डोळे। पण ते तर आंधळे। तसे हे
‘जळो हा’ असे म्हणत ज्ञानेश्वर ‘ज्ञानेश्वरी’त एकदाच रागावलेले आहेत.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – कॅन्सर रक्ताचा : भाग ६
१९७१ ते १९९५ पर्यंत मी, गुरुजी कर्मयोगी वैद्यराज बा. न. पराडकर यांच्या मार्गदर्शनामुळे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन रुग्णालय चालविले. एके दिवशी दोन रुग्ण पानथरी वाढली आहे म्हणून प्रवेशित झाले. सकाळी रिकाम्या पोटी दोघांचेही, उदरपरीक्षण, यकृत, प्लीहा, पोट याकरिता केले. दोघांचीही पानथरी एक वितभर वाढलेली होती. दोघांनाही कृमीनाशक उपचार; कृमीनाशक गोळ्या, आम्लपित्तवटी, आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, सतापाकाढा अशी दिली. आठवडाभरात एकाची पानथरी पूर्णपणे व्यवस्थित झाली होती. दुसऱ्या रुग्णात काहीच फरक नव्हता म्हणून विशेष रक्त तपासणी केली तर तो रक्ताचा कॅन्सर निघाला.
आधुनिक वैद्यकात रक्ताच्या कर्करोगातील एका प्रकारात रुग्णाच्या शरीरातील ‘टी’ पेशी घेऊन त्यात जैवअभियांत्रिकीने सुधारणा केल्या जातात. त्यांना बी पेशींचा हल्ला ओळखण्याची क्षमता दिली जाते. त्या सुधारणेतून सीटीएल ०१९ या पेशी निर्माण केल्या व रुग्णाच्या शरीरात सोडल्या तेव्हा त्यांची संख्या वाढते व कर्करोग बरा होतो. या दुसऱ्या रुग्णाच्या कर्करोगाची ही तांत्रिक माहिती त्या वेळेस मला माहीत नव्हती. मी त्याचे मलमूत्र व रक्त परीक्षण पुन्हा करवले. कृमी, आमांशापेक्षा त्याची रक्त तयार करण्याची यंत्रणा कमी पडते आहे; बोनमॅरोचे काम नीट होत नाही असे निदान केले. त्याकरिता पुढील उपाययोजना तीन महिने केली. मानवी शरीरात वनस्पतीजन्य पदार्थापेक्षा प्राणिज पदार्थ लवकर शोषले जातात; शरीरात सात्म्य होऊन नवीन ऊर्जा देतात असा माझा अभ्यासपूर्ण विश्वास आहे. जोडीला गव्हांकुररस घ्यावा.
पिंपळलाख हे प्रमुख द्रव्य असणारे लाक्षामिश्रण, लाक्षादिगुग्गुळ, लाक्षादिघृत, फलत्रिकादिकाढा, अम्लपित्तवटी, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा अशा ढोबळमानाने दिलेल्या औषधांनी प्लेटलेट काऊंट, हेमोग्लोबिन सुधारले. ईएसआर काऊंट कमी झाला. अरुचि, मुंग्या येणे या लक्षणांचा मागोवा घेणे उपयुक्त ठरले. श्री धन्वंतरीकृपा।
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २६ सप्टेंबर
१९२०> संस्कृतचे अभ्यासक, संतसाहित्यिक, आयुर्वेदाचे जाणकार, कवी, कीर्तनकार अनंत दामोदर आठवले यांचा जन्म. आपले गुरू दासगणू महाराजांचे समग्र वाङ्मय त्यांनी ११ खंडांत संपादित केले. ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ यातून त्यांच्या महाभारताच्या अभ्यासाची व्यासंगता लक्षात येते.
१९५२> सूचीकार, चरित्रकार सदाशिवशास्त्री कान्हेरे यांचे निधन. ‘कॅटलॉग ऑफ द मराठी मॅन्युस्क्रिप्ट्स् इन द इंडिया ऑफिस लायब्ररी’ अशी मराठी हस्तलिखितांची एक सूची त्यांनी तयार केली.
१९८५ > लेखिका, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ यमुनाबाई हिर्लेकर यांचे निधन. शिक्षण शास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंड व जर्मनीत प्रवास. तेथील शिक्षणप्रणालीवर अनेक पुस्तके व लेख प्रसिद्ध.
१९९६> ख्यातनाम पत्रकार, नाटककार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष विद्याधर गोखले यांचे निधन. ‘लोकसत्ते’चे काही काळ संपादक असणाऱ्या गोखल्यांची साहित्यसंपदा मोठी आहे. विशेषत: संगीत नाटकांची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. यापैकी संगीत सुवर्णतुला, मंदारमाला, जावयाचे बंड ही नाटके खूप लोकप्रिय झाली. गालिबवरील पुस्तकही गाजले.
– संजय वझरेकर