– परसदारी छोटासा झोका, झाडाला टांगलेला त्या झाडाच्या मुळाशी रंगीबेरंगी ठिपक्यांच्या अळूचं रान, पलीकडे आंब्याचं झाड, जाई-जुईचा छोटासा कुंज, कुंपणाला मोगरीची झाडी. वळणावळणाची छोटीशी वाट. चित्र पूर्ण झालं. होय ना?
– काळ्या-पांढऱ्या रंगाची कात टाकून रजतपट ईस्टमन कलर झाला तेव्हा बागांमध्ये पळापळी खेळणारी नायक-नायिकेची जोडी, शोभेला सर्वत्र प्लास्टिकची फुलं घेऊन झुडपं गुपचूप उभी, एकमेकांवर डोलणारी डाहलियाची फुलं दाखविली की चित्र दृश्य पूर्ण. होय ना?
– लांबलचक डांबरी काळाकुळीत रस्ता आणि दुभाजकावर फुलझाडांच्या रांगा. झेंडूसारखी पिवळ्या रंगाची फुलं फुललेली. चित्र पूर्ण होय ना?
मित्रा, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशी दिलीस. खरं उत्तर आहे; नाही! तुला ते चित्र संपूर्ण वाटलं हीच ‘त्या’ फुलांची शोकांतिका आहे. म्हणजे असून दिसत नाहीत आणि नसली तरी लक्षात येत नाहीत. या सर्व दृश्यांमध्ये जर्द रंगाची कर्दळीची फुलं असतात. दिसली आता?
गेल्या काही वर्षांत शहरांचं काँक्रिटीकरण झाले, गावा-गावातल्या घरांभोवती सेप्टिक टँक आले, जमिनी फरसबंद झाल्या आणि कर्दळी हरवल्या. अशा हरवल्या की त्या इथे होत्या याचाही विसर पडला. जरा भूतकाळात डोकाव, गावा-गावातल्या गल्ल्यांत कर्दळीची बनं हमखास दिसायची. होय ना?
मित्रा, कर्दळीची फुलं किती जबरदस्त होती आठवतं? रंगांचं वरदान घेऊन जन्माला आलेली कर्दळ फुलं वैभवशाली होती. एकेरी लालचुटूक रंगांची असोत की मोठाल्या आकारांची लालभडक लाल आणि पिवळ्या धम्मक रंगाची असोत, फुलं चारचौघांत उठून दिसायची.
पाकळ्यांचे रंग अगदी चित्रकाराच्या पॅलेटवरून थेट तरतरीत, टपोरी आणि सदोदित टवटवीत. झाडं फार तर एक-दीड मीटर उंचीची असायची; पण फुलांचे दांडे ताठ आणि ठाम. त्यांना धरूनच फुलं उमलायची. फुलांचा आकार भूमितीतल्या आकाराप्रमाणे प्रमाण नसायचा. एखाददोन पाकळ्या चुकारपणे आधी उमलायच्या आणि त्या मागोमाग येणाऱ्या पूर्णपणे उमलायला विसरून जायच्या!  सकाळी पाकळ्यांवर दवबिंदूंचे हिरे दिसायचे, तर कधी पाकळ्यांवर  ‘पोलका डॉट’सारखे ठिपके असायचे. कर्दळीच्या एकेरी फुलाची मोठीशी पाकळी तोडून मैत्रिणीच्या करंगळीच्या नखावर ठेवायची, हा माझा लहानपणाचा छंद.
कर्दळीची फुलं तोडली तर ना कोणाला खंत, ना खेद. मला वाटतं, अशा फुलांशी मुलांची दोस्ती अधिक असते. कर्दळीच्या फुलांचा हा स्वतंत्र बाणा त्यांच्या फळोत्पत्तीत दिसायचा. फूल पूर्णपणे उभयान्वयी, स्त्री-पुरुष केसर एकमेकांशी सलगी करायचे आणि काही दिवसांनी छोटी वाटोळी, काटेरी बोंडं दिसायची. आतल्या बिया भेंडीच्या बियांसारख्या पांढऱ्या असायच्या. झपाटय़ानं जून होऊन काळ्याभोर व्हायच्या. फळं सुकल्यावर त्या बाहेर सांडायच्या. बिया पर्फेक्ट गोलाकार आणि कडक असल्यानं जुन्या काळातल्या बंदुकीच्या गोळीसारख्या दिसायच्या. १८५७च्या युद्धात सैनिकांनी त्यांचा तसा वापरही केला. त्यावरून या झाडाला ‘इंडियन शॉट’ म्हणतात. कर्दळ, रासायनिक प्रदूषण रोखण्यात अव्वल नंबर राखते. आता हे काम म्हणे कारखान्यांची स्वतंत्र यंत्रणा करते. प्रदूषण व्हायचं ते होतं; पण कर्दळीची बनं अस्तंगत झाली. अधूनमधून दिसते कुठे कुठे. ताठ मानेने उभी राहिलेली, भरगच्च गर्द रंगाची कर्दळ.. मिस यू, डार्लिग.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : बांधकाम साहित्य
आराखडा काढताना उत्तम तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेतला, पण प्रत्यक्ष बांधकामात मात्र काटकसर करायला गेलो तर सगळेच मुसळ केरात! ‘बांधकामाचा दर्जा’ हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, पण हा ‘दर्जा’ म्हणजे काय? चांगल्या दर्जाचे वाळू, सिमेंट, खडी आणि योग्य प्रमाणात पाणी वापरून केलेले बांधकाम चांगले बांधकाम. जसे, स्वयंपाकात सर्व वस्तू योग्य प्रमाणात घातल्या तरच पदार्थाची चव चांगली होईल, उपलब्ध आहे म्हणून जरा जास्तच मीठ घातले तर सगळेच बिघडते. तसेच बांधकामात पण, स्वस्त आहे म्हणून एखाद्या वस्तूचे प्रमाण बदलले तर इमारतीच्या आरोग्यालाच धोका निर्माण होऊ शकतो.
सर्वप्रथम वाळूचे बघूया. नदीतून उपसलेली, मातीचे प्रमाण अत्यल्प असलेली वाळू योग्य. वाळूतील मातीचे प्रमाण कसे ओळखायचे? मूठभर वाळू भांडंभर पाण्यात टाकल्यावर, पाण्याचा रंग फारसा बदलला नाही तर मातीचे प्रमाण कमी. तसेच हातात घेऊन मूठ घट्ट वळल्यास वाळू घसरून जायला हवी. हाताला चिकटल्यास मातीचे प्रमाण जास्त. वाळूतील जास्त माती काँक्रीटची ताकद कमी करते. तसेच खडीसुद्धा योग्य आकाराची हवी. सगळ्यात महत्त्वाचे पाण्याचे प्रमाण. आवश्यक तेवढेच पाणी मिसळणे योग्य. कारण जास्त पाण्याने काँक्रीट खराब होते. सिमेंट कुठले वापरायचे? सगळीकडे अनेक जाहिरातींचा मारा असतो, पण त्यातले कुठले वापरायचे ते ठरवण्यासाठी सिमेंटची नामांकित कंपनी निवडावी. लोखंडी सळ्या नेहेमी न गंजलेल्या आणि संरचना अभियंत्याने ठरवून दिलेल्या आकारातीलच घ्याव्यात. खांब आणि तुळ्यांची ताकद त्यावरच ठरते. काँक्रीट कितीही चांगले जमले तरी त्याचे स्वत:चे काही आकारमान नसते. ते ठरते लोखंडी सळ्यांच्या जाळीदार पिंजऱ्यामुळे. आवश्य तेवढय़ा सळ्या  त्यात घालायलाच हव्यात काँक्रीट ओतताना ते सगळीकडे व्यवस्थित पोचत आहे की नाही ते बघावे.  हवेची पोकळी निर्माण होऊ देऊ नये. हल्ली तयार काँक्रीटचे ट्रक मागवतात. त्याचा दर्जा चांगला असण्याची अपेक्षा असते. कच्च्या मालाचे नुकसान त्यामुळे  वाचते. साठवण्यासाठी वेगळी जागापण  लागत नाही.
हेमंत वडाळकर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची : केरळात बहुधार्मिकतेची सुरुवात
केरळातील बंदरे व शहरे ही इसवी सनाच्या दुसऱ्या- तिसऱ्या शतकांत जगातील सर्वात अधिक गजबजलेली व्यापारी केंद्रे होती. जागतिक अर्थव्यवस्थेत केरळातील मसाले, कापड व मोती यांच्या व्यापाराचा मोठा वाटा होता. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातले अशोकाचे शिलालेख केरळात सापडले आहेत. इ. स. पहिल्या शतकात चेरा घराण्याचे राज्य असताना केरळातून ग्रीक, रोमन व अरबांशी व्यापार चालत होता. सेंट थॉमस नावाचा सिरियातील ख्रिश्चन साधू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. तो पहिल्या शतकात हिंदुस्थानात मद्रास व केरळच्या प्रदेशात ख्रिस्ती धर्माची शिकवण सांगत फिरत होता. इ. स. ६८ साली मद्रासजवळ त्याचा वध झाला. त्या वेळी त्याचे बरेच अनुयायी पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर होते. तेव्हापासून केरळात ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य वाढले. नायर लोकांच्या बरोबरीने थॉमसच्या शिष्यांना मान मिळत असे.
राज्यांच्या लष्करातही या ख्रिस्त्यांचा भरणा होता. विजयनगर राज्यातही नोकऱ्यांमध्ये ख्रिस्त्यांचा मोठा भरणा होता. केरळच्या काही भागाला मलबार असे नाव अरबांनी ठेवले. अरब लोकांचा केरळशी व्यापाराच्या निमित्ताने आधीपासून संबंध होताच. पुढे इस्लामचा प्रसार झाल्यावर ८१५ साली केरळमध्ये मोठय़ा प्रमाणात लोकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. केरळातील हिंदूू राजे ख्रिस्ती, मुसलमान, ज्यू लोकांना त्यांच्या धर्माचरणात अडथळा आणीत नसत. मार सोपार हा पाद्री इ. स. ८८२ मध्ये बॉबीलानमधून कोलम येथे आला. केरळाची राजधानी व प्रमुख बंदर त्या काळी क्विलॉन येथे होते. मार सोपारने राजाला भेटून ख्रिस्ती बांधवांची व्यवस्था लावून घेतली. ख्रिस्ती व ज्यू लोकांचे निराळे नाड बनवून त्यांच्यावर त्यांचाच अंमलदार आणि षटशत् सभा नेमून दिली.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. २० डिसेंबर
१८७९अनेक जीवनोपयोगी वस्तूंचा शोध  लावणारा अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन याने दीर्घकाळ चालणाऱ्या विजेच्या दिव्याची निर्मिती यशस्वी केली. मेन्लो पार्क येथील प्रयोगशाळेत त्याने निवडक निमंत्रितांसमोर हा सुधारित वीज-दिवा पेटवून दाखवला आणि क्रांती घडली! आज घरोघरी पोहोचलेले विजेचे दिवे ही एडिसनच्या याच सुधारित दिव्याची अपत्ये. त्याहीआधी वीज-दिवे तयार करून पाहण्याचे प्रयोग झाले होते, परंतु उष्णतेमुळे या दिव्यांच्या काचा फुटत. ते अजिबात सुरक्षित नव्हते आणि तासाभरात ते निकामी होत. दिव्यातील उष्णता कमी ठेवून प्रकाश देणाऱ्या फिलामेंटचे अनेक  प्रकार शास्त्रज्ञांनी वापरून पाहिले होते, पण व्यर्थ. याउलट एडिसनने, योग्य फिलामेंट वापरण्यावर भर देतानाच वीजप्रवाह नियंत्रित करण्याकडे लक्ष केंद्रित केले. एकंदर सात घटकांचा विचार करून त्याने हा दिवा बनविला होता, त्यात दिव्याच्या होल्डरपासून ते अर्थिगपर्यंतचे घटक समाविष्ट होते. यामुळेच आजच्या वीज-दिव्याचा जनक  होण्याचा मान एडिसनकडे जातो.
१९५६ आधुनिक महाराष्ट्राचे आधुनिक संत गाडगेमहाराज यांचे महानिर्वाण. ग्रामीण आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गाला केवळ देवभक्तीचा वा धर्माचा आधार पुरेसा नसून आचरणही सुधारले पाहिजे, हे जाणून त्यांनी स्वच्छता आणि इतर मूल्यांचा प्रसार केला. देवाला बळी देऊ नका, देवाधर्माच्या वा कुळाचाराच्या नावाने मटण-दारूच्या जेवणावळी उठवू नका, असा प्रसार त्यांनी गावोगाव केला, त्यासाठी कीर्तनासारखा प्रकार नव्याने वापरला. स्वत:कडे कपर्दिकही न ठेवता गाडगेबाबांनी गरजूंसाठी धर्मशाळेसारख्या सुविधा उभारल्या.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in