विद्युतधारा म्हणजे वाहकातील इलेक्ट्रॉनचा प्रवाह. जेव्हा वाहकातील इलेक्ट्रॉन्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे गतिमान होतात तेव्हा ते इतर इलेक्ट्रॉन्स आणि वाहकातील अणू व आयनांवर आदळल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो.
विद्युतप्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या या गुणधर्माला विद्युतरोध असे म्हणतात. ज्या पदार्थाना सर्वात कमी विद्युतरोध असतो त्यांना विद्युतवाहक म्हणतात. उदा. चांदी, तांबे इत्यादी. तर काही पदार्थातून विद्युतधारा वाहूच शकत नाही. म्हणजे त्यांच्या अंगी सर्वात जास्त विद्युतरोध असतो त्यांना विद्युतविरोधक किंवा विसंवाहक म्हणतात. उदा. रबर, लाकूड, काच इत्यादी.
बहुतेक सर्व धातू, आपले शरीर, ग्रॅफाइट इत्यादी वस्तूंतून विद्युतप्रवाह सहजतेने वाहतो. म्हणून या पदार्थाना विद्युतवाहक म्हणतात. वीज वाहून नेण्यासाठी बहुधा तांब्याच्या तारेचा उपयोग करतात. शुद्ध पाणी हे विद्युतवाहक नाही. पण पाण्यात एखादा क्षार अथवा आम्ल मिसळल्यानंतर, धन-ऋण आयन तयार झाले तर ते द्रावण विद्युतवाहक होते. काच, रबर, रेशीम, कोरडं लाकूड, मेण, अभ्रक, एबोनाइट हे पदार्थ स्वत:मधून विद्युतप्रवाहाला जाऊ देत नाहीत म्हणून त्यांना विद्युतविरोधक म्हणतात. जे पदार्थ उत्तम विद्युतवाहक आहेत तेही विजेच्या प्रवाहाला कमी-जास्त विरोध करतातच. वाहकाची भौतिक स्थिती (लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान आणि पदार्थ) कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा त्या वाहकाच्या दोन टोकांतील विभवांतराशी समानुपाती असते. याला ओहमचा नियम म्हणतात. जर वाहकातून वाहणारी विद्युतधारा क आणि त्याच्या दोन टोकांतील विभवांतर श् असेल तर, फ हा रोध असून दिलेल्या वाहकासाठी तो स्थिर असतो. एस.आय.पद्धतीत रोधाचे एकक ओहम ६ आहे. वाहकाचा रोध (फ) हा त्या वाहकाच्या लांबीच्या सम प्रमाणात असतो तर त्याच्या काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या (अ) व्यस्त प्रमाणात असतो. हा स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहकाची रोधकता किंवा विशिष्ट रोध असे म्हणतात. एस.आय.पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम-मीटर आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म आहे. निरनिराळ्या पदार्थाची रोधकता भिन्न असते. चांदीची रोधकता १.६० ७ १०-८ ओहम-मीटर आहे तर लोखंडाची रोधकता १० ७ १०-८ ओहम-मीटर आहे. रोधकांचा उपयोग परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी होतो.
-डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
रहमान राही- साहित्य
काश्मिरी भाषेतील एक सर्वमान्य प्रतिष्ठित कवी रहमान राही यांचे एकूण सात काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून, त्यापैकी सनव्यून साज, सुबहूक सौदा व कलाम-ए-राही हे त्यांचे पहिले तीन काव्यसंग्रह लोकप्रिय झाले. नौरोज-ए-सबा हा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रह १९५८ मध्ये प्रकाशित झाला. काश्मिरी जनसामान्यांच्या जगण्याच्या धडपडीशी निगडित अशा यातील कवितेने एक नवे युगच निर्माण केले. ‘काशिर शार सोम्बरन, अजिच काशिर शायरी, काशिर नग्माज शायरी हे संग्रहित ग्रंथ आणि बाबा फरीद यांचे पंजाबी सूफी कवींच्या अनेक कवितांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केलेला संग्रहही प्रसिद्ध झाला आहे. नवे विषय, नव्या संक्षिप्त रूपात आपल्या नज्म्ममध्ये व्यक्त करताना ते म्हणतात, ‘मालूम है अँधेरा उमड रहा है’ या विश्वातील गोंधळलेल्या, बेचैन मन:स्थितीचे चित्रण करणारी, माणसाचा विश्वास, श्रद्धा नाहीशी झालेली, हातातून सारे काही निसटून गेल्यानंतरच्या हताश भावनेचे चित्रण व्यक्त करताना ‘साँकल की आवाज’ या कवितेत राही लिहितात-
‘तू जो भी है
मेरी फरियाद सून
मैं समुद्र के सामने हवा का झोंका
सूर्य के सामने रोशनी का एक धब्बा
आँधी के सामने एक छोटासा घासफूस
धरती के नीचे बुलबुलाता केंचुआ
तू यदी है तो मेरी फरियाद सून।’
नज्म्ममध्ये विषयाची नियमबद्धता पाळावी लागते, पण राहीजींचे वैशिष्टय़ असे, की त्यांनी काश्मिरी नांतिया शायरीमध्ये एका नवीन शैलीचा प्रयोग केला आहे.
‘वह भय, कुंडली मारकर जीभ निकले हुए
मनके अन्दर बैठा था
पागलों ने भी समझ लिया की
अब धैर्य और खामोशी मेंही छुटकारा है।’
कुशाग्र बुद्धी आणि उत्कृष्ट कल्पनाविलास, नवे विषय, नवी शैली यामुळे त्यांनी काश्मिरी काव्याला परिपूर्णता आणली. भाषेचा सर्जनशील वापर, तंत्रशुद्धता, लेखनातील लय, चढउतार, मार्मिक शब्दांचा वापर ही त्यांच्या लेखनाची खास वैशिष्टय़े आहेत. त्यांच्या कवितेत इस्लामचे संदर्भ येतात तसेच हिंदू, ग्रीक पुराणकथांचेही संदर्भ येतात. त्यांच्या लेखनात विविधता असल्यामुळेच त्यांचे लेखन विविधस्पर्शी झाले आहे.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com