आधुनिक मानवाचे आयुष्य राजकीय, भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींनी आणि आता तंत्रज्ञानाने आकारले जात आहे. कालानुरूप या परिस्थितींत सखोल बदल घडू शकतात. या बदलांचा परिणाम मानवाच्या जीवन-दर्जावरही होतो. उदाहरणार्थ अनेक जणांना, समूहांना असाहाय्यतेमुळे देशांतर करावे लागले, तर त्यांचा जीवन-दर्जा खालावू शकतो.
अशा घटनांमुळे प्रत्येक देशातील नागरिकांच्या आयुष्यावर वेळोवेळी प्रभाव पडल्याने त्यांच्या जीवनदर्जावर काय परिणाम झाला; याचे मोजमापन करण्याची गरज निर्माण झाली. त्यादृष्टीने जीवनदर्जानुसार शक्य तितक्या देशांची क्रमवारी विविध निर्देशांकांनी, सूचकांनी किंवा दरांनी दर्शवण्याच्या पद्धती पुढे आल्या. त्यातील काही मानवी आयुष्याच्या मर्यादित तर काही व्यापक बाबींवर प्रकाश पाडतात. ते पलू आणि त्यासंबंधीचे अलीकडचे काही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मोजमापन पुढीलप्रमाणे आहे :- (१) आर्थिक : रोजगार शाश्वती, बहुमिती गरिबी निर्देशांक, मालकीचे घर असण्याचा दर, मालकीचा स्मार्टफोन असण्याचा दर, ज्ञान अर्थ-व्यवस्था निर्देशांक. (२) आरोग्य : शासनाचा आरोग्यावर केला जाणारा दरडोई खर्च, रुग्णालयातील खाटा, कर्करोग आणि संसर्गजन्य नसलेल्या रोगांमुळे होणारा मृत्यूदर, बाल मृत्यूदर. (३) पर्यावरण : पर्यावरण-दक्षता कृती निर्देशांक, पर्यावरण-धोका निर्देशांक, नसर्गिक अनर्थ-धोका सूचकांक. (४) सामाजिक/ राजकीय : सामाजिक प्रगती निर्देशांक, स्त्रियांची शालेय शिक्षणातील वर्षांची सरासरी, फुरसतीचा स्वत:साठी उपलब्ध वेळ, शासन पारदर्शकता, जागतिक दहशतवाद निर्देशांक
(५) बहुव्यापक : मानव विकास निर्देशांक, मानवी आनंदपण निर्देशांक, राष्ट्रीय सुबत्ता निर्देशांक, नगर विकास निर्देशांक, नागरी उत्कर्ष निर्देशांक वरील नमुनादाखल यादीवरून लक्षात येते की, मानवी जीवन-दर्जा विविध प्रकारे मांडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मानव जीवन-दर्जा मोजमापन करण्यासाठी सर्वप्रथम कळीचे घटक निवडून त्याबाबत आकडेवारी मिळवली जाते. तिचे विश्लेषण करून तक्ते किंवा आलेख तयार केले जातात. त्या माहितीवरून प्रत्येक घटकासाठी योग्य असे गुणोत्तर काढून सूचकांक काढला जातो. यावरून राबवलेल्या धोरणांचा परिणाम समजून येतो. असे काही सूचकांक विशिष्ट पद्धतींनी एकत्र करून एक संयुक्त निर्देशांक निर्माण केला जातो. बरेचसे निर्देशांक दरवर्षी प्रसिद्ध केले जातात, त्यामुळे इतर देशांशी तुलना यासोबतच प्रत्येक देशाच्या वाटचालीचा मागोवा मिळतो. त्यासाठी खात्रीलायक आकडेवारी मिळवून तिचे संकलन करण्याचा हा मोठा व्याप संयुक्त राष्ट्रसंघ व त्याचे विभाग, जागतिक बँक अशा बहुराष्ट्रीय संस्था, विद्यापीठे आणि काही स्वयंसेवी संस्था गेली काही वष्रे सातत्याने करत आहेत.
–डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
डॉ. गोकाक – महाकाव्य
डॉ. गोकाक यांची सवरेत्कृष्ट रचना, त्यांचे महाकाव्य – ‘भारत सिन्धू रश्मि’ हीच आहे. १९८२ मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुमारे पस्तीस हजार ओळींचे महाकाव्य १९७२ ते १९७८ या कालावधीत ते लिहीत होते. दोन भागांतील स्वच्छंद छंदात लिहिलेल्या या महाकाव्याचे इतिवृत्त ऋ ग्वेदावर आधारित आहे. पण प्रतिपादन वर्तमानकाळातील आहे.
ब्रह्मर्षी विश्वामित्र हे या महाकाव्याचे नायक आहेत. गोकाक यांच्या दृष्टीतून विश्वामित्र हे एक विभूती होते. पराजय, कपट, ज्ञानसंपादन, अनुभूती, शोध वगैरे अवस्थांतून जाताना त्यांचा प्रवास नेहमी उन्नतीकडे जाताना दिसतो. एकीकडे या महाकाव्यात विश्वामित्राचे आख्यान आहे. जे क्षत्रिय राजकुमार असूनही ऋ षी बनले होते. तर दुसरीकडे आर्य आणि द्रविड संस्कृतीची एकरूपता आणि भारतवर्षांचे आख्यान आहे. दुसरा सूत्रधार राजा सुदास हा जातींच्या समरसतेचं प्रतीक आहे. आणि विश्वामित्र वर्णाच्या समरसतेचं प्रतीक आहे. यातील त्रिशंकू हे आजच्या मानवाचे प्रतीक आहे. ज्याने स्मृती, मती आणि कल्पना यावर विजय मिळवला आहे पण त्याला प्रज्ञा हे सिद्धीचे एकमात्र साधन आहे हे कळलेले नाही. अखेर तो नक्षत्र बनतो. कारण मुक्ती केवळ प्रज्ञेनेच शक्य आहे – याचा त्याला अनुभव येतो. दृश्य जगतातील सर्वकाही या महाकाव्यात जिवंत झाले आहे. थोडक्यात या महाकाव्यात वैदिक संस्कृती आणि त्यातील परिवर्तनशील मूल्यांची अशा पद्धतीने रचना केली आहे की प्राचीन दृष्टी आणि आधुनिक आशा-आकांक्षा एकाच पातळीवर येऊन आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी निमित्त बनलेली आहे. आणि यातून भारतवर्षांच्या भव्य आणि मंगलमय रूपाचे दर्शन घडते.
आधुनिक जीवनावरही महाकाव्यातून भाष्य करता येते हेच ‘भारत सिन्धू रश्मि’ या महाकाव्यातून डॉ. गोकाक यांनी दाखवून दिले आहे. प्रतिभासंपन्न डॉ. गोकाक यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले. याच वर्षी त्यांच्या ‘द्यावा पृथिवी’ – या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कर्नाटक विद्यापीठाने १९६७ मध्ये आणि पॅसिफिक विद्यापीठाने (कॅलिफोर्निया) १९७१ मध्ये त्यांना डी. लिट् देऊन गौरव केला. १९९० मध्ये कन्नड साहित्यातील सवरेत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com