१९९२ चा २८ वा ज्ञानपीठ पुरस्कार श्री. नरेश मेहता यांना १९७२ ते १९९१ या कालावधीत हिंदी सर्जनात्मक लेखनाच्या माध्यमातून भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. सर्जनात्मकतेच्या समस्येविषयी नरेश मेहता यांचा स्वत:चा असा दृष्टिकोन आहे. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात नरेश मेहता राजकारण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय होते. अखेरीस मात्र त्यांच्या आयुष्यात लेखनालाच महत्त्व होते. काव्य, खंडकाव्य, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादन अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. हिंदी तसेच इंग्रजीमध्येही त्यांनी अनेक कविता, लेख लिहिले. व्यक्ती आणि समाज, त्याचे स्वरूप, युद्ध आणि शांती, इतिहास आणि व्यक्ती अशा अनेक विषयांवर चर्चात्मक लेखन केले आहे.
माळव्यातील शाजापूर या गावी १५ फेब्रुवारी १९२२ रोजी नरेश मेहता यांचा जन्म झाला. बालपणीच आई गेल्याने वडील बिहारीलाल यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी होती. पण पत्नी-वियोगामुळे वडिलांचे संसारात लक्ष नव्हते. तेव्हा त्यांच्या काकांनी त्यांचे संगोपन केले. त्या घरातील पुस्तके, संपन्न कलेचा वारसा असलेल्या वातावरणात, त्यांना सर्व प्रकारची भौतिक सुखे मिळाली पण तरीही एकटेपण, उदासी होतीच. त्यांच्या गावात सहावीपर्यंतच शालेय शिक्षणाची सोय असल्याने नंतर ते नरसिंहगढ येथे आत्याकडे राहून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. नरसिंहगडच्या साहित्यप्रेमी राजमातेने एक दिवस काव्यलेखन सादरीकरणाचे आयोजन केले होते. तेव्हा छोटय़ा नरेशने कविता सादर केली. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि राजमातेने त्यांना नरेश असे काव्यनाम दिले. त्यांच्या नावाला, काव्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. शिक्षकांनी त्यांना काव्य, साहित्याची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांनी प्रेमचंद, मैथिलीशरण गुप्त यांची जेवढी पुस्तके वाचनालयात उपलब्ध होती ती सारी वाचून काढली. अनेक प्रवासवर्णने, चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्याही वाचल्या. मिळेल ते वाचत होते. आपल्या वर्गमित्रांच्या साहाय्याने एका पत्रिकेचे संपादन सुरू केले आणि त्यासाठी स्वत:च्या कविता लिहू लागले. पुढच्या शिक्षणासाठी उज्जैनला जाण्याअगोदर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते जिजाजींबरोबर थोडे दिवस इंदौरला गेले. तिथे त्यांनी वाचनालयातील पुस्तकांचे वाचन आणि कविता लिहायला सुरुवात केली. शरदबाबू, बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या वाचल्या. हरिवंशराय बज्जनजींचे निशा- निमंत्रण आणि नरेंद्र शर्माचे प्रवासिका गीत वाचण्याची संधी त्यांना मिळाली. या दोन्ही काव्यसंग्रहांनी प्रभावित झालेल्या नरेशजींनी त्याच भाषेत आणि छंदात अनेक कवितांचे लेखन केले.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
पेट्रोलियम पदार्थाचे मोजमाप
सुमारे ७५० विविध जीवनोपयोगी पदार्थाचा स्रोत असलेले खनिज तेल बॅरल (पिंपा)मध्ये भरून मोजले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे मोजमाप करणाऱ्या या पिंपाचे आकारमान १५९ लिटरइतके भरते.
द्रव पदार्थाची घनता ग्रॅम प्रति मिलिलिटर किंवा किलोग्रॅम प्रति लिटर या मापात मोजली जाते. प्रत्येक पदार्थाची घनता विशिष्ट तापमानाला विशिष्ट असते; परंतु बरेच पेट्रोलियम पदार्थ हे हायड्रोकार्बन रसायनांचे मिश्रण असतात. त्यांची घनता ही विशिष्ट संख्यांच्या टप्प्यात येते. उदा. पेट्रोलची घनता ६५० ते ७५० किलोग्रॅम प्रति लिटर या दरम्यान भरते, तर डिझेल इंधनाची घनता ८०० ते ८५० किलोग्रॅम प्रति लिटर या टप्प्यात असते, मात्र एकाच वेळी उत्पादित केलेल्या पदार्थाची घनता एकच असते. (उदा. पेट्रोलची ७२५.५ किलोग्रॅम प्रति लिटर आणि डिझेलची ८३५ किलोग्रॅम प्रति लिटर असू शकते.) जोपर्यंत त्या पदार्थात बदल होत नाही तोपर्यंत त्याची घनता बदलत नाही. त्यामुळे इंधनात भेसळ झाली आहे का, हे तपासण्यासाठी त्या इंधनाची घनता मोजली जाते.
घनता ही पेट्रोलियम पदार्थाची गुणवत्ता कसोटी नसली तरी पेट्रोलियम पदार्थाची उलाढाल करण्यासाठी या कसोटीचा वापर केला जातो. द्रवरूप इंधनाचे टँक, ट्रकच्या टाक्यात भरताना प्रमाणित केलेल्या धातूच्या काठीचा म्हणजे ‘डिपरॉडचा’ वापर करतात आणि त्यात भरलेल्या इंधनाचे आकारमान तक्त्यावरून काढतात. या धातूच्या काठीवर एक प्रकारची पेस्ट चोळतात. इंधनाच्या संपर्कात ती आली की रंगीत होते. अशा रीतीने टाकीतील इंधनाचे प्रमाण मोजतात.
परंतु पपात जेव्हा वंगणे भरतात तेव्हा त्याचे वजन करतात आणि मग घनतेच्या साहाय्याने आकारमान काढतात. घनता ही वजन आणि आकारमानाच्या गुणोत्तरात असते, या सूत्राचा इथे वापर करतात. आपल्याकडच्या २१० लिटर आकारमानाच्या पिंपात व्यावसायिक उलाढालीसाठी २०५ लिटर वंगण तेल भरतात.
अर्थात, घनता ही तापमानाशी निगडित असते. तापमान जास्त असेल तर घनता कमी भरते आणि तापमान कमी असेल तर घनता जास्त भरते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी तापमान कमी असते; त्या वेळी वाहनात इंधन भरण्यामागची हीच गोम आहे.
पेट्रोलियम क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार इंधनाची घनता १५ अंश सेल्सियस तापमानाला, तर वंगणाची घनता २९.५ अंश सेल्सियस तापमानाला नोंदवितात.
– जोसेफ तुस्कानो
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org