भारतीय ज्ञानपीठाचा १९९३ चा पुरस्कार उडिया भाषेतील प्रसिद्ध लेखक डॉ. सीताकांत महापात्र यांना भारतीय साहित्यातील १९७३ ते १९९२ या कालावधीतील योगदानासाठी प्रदान करण्यात आला. ओरिसामधील कटक जिल्ह्यातील चित्रोत्पला नदीच्या तीरावरील महानगा या छोटय़ाशा गावात एका सुशिक्षित, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबात १७ सप्टेंबर १९३७ मध्ये महापात्र यांचा जन्म झाला. स्थानिक शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संपूर्ण इतिहास विषय घेऊन त्यांनी १९५७ साली पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्र विषय घेऊन अलाहाबाद विश्वविद्यालयातून १९५९ साली प्रथम क्रमांकाने एम.ए.ची पदवी संपादन केली. उत्कल विद्यापीठातून सामाजिक मानवशास्त्रीय विज्ञानात डॉक्टरेट केल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून पदविकाही त्यांना मिळाली. याशिवाय आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यापीठातील अध्यापनाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत अनेक उच्च पदे भूषविली. प्रारंभी ओरिसा शासन सेवेत (१९९०-१९९५) सचिव आणि नंतर युनेस्कोत सांस्कृतिक विकासकार्यात प्रमुख अधिकारी (१९९४-९६) म्हणून कार्यरत होते. १९९६ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर डॉ. सीताकांत महापात्र यांची नियुक्ती होमी भाभा अधिष्ठान व एन. बी. टी. या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून झाली. केम्ब्रिज विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठाचे ते सन्माननीय फेलो होते. तसेच होमी भाभा फेलोशिपही त्यांना दिली गेली. या काळात त्यांनी पूवरेत्तर भारतातील आदिवासी समाजाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेचा अभ्यास केला. आदिवासी काव्यरचना केल्या. अनेक शोधनिबंध लिहिले. भारतीय आदिवासी मौखिक काव्यपरंपरेचे नऊ संग्रह अनुवादित करून संपादित केले. शासकीय सेवेत असूनही त्यांनी लेखन-वाचन हा व्यासंग सातत्याने जोपासला. त्यांची सुमारे ९८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अधिकतर लेखन उडिया भाषेत असून, इंग्रजीतही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.पाश्चात्त्य कवितेच्या विविध परंपरांचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. तसेच पारंपरिक ओरिया कवितेची जाणही गहिरी आहे आणि आदिवासी जनजीवनाशी असलेला घनिष्ठ संबंध या साऱ्यांनी त्यांची काव्यसंवेदना घडविली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा