भारतीय ज्ञानपीठ प्रा. विनायक कृष्णा गोकाक यांना १९७० ते १९८४ या कालावधीत भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी १९९० चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक, शिक्षणतज्ज्ञ गोकाक हे कन्नड नवकाव्याचे जनक मानले जातात.
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील सावनूर या गावी ९ ऑगस्ट १९०९ रोजी गोकाक यांचा जन्म झाला. उत्तर कन्नडा या मागासलेल्या जिल्ह्यातून आलेले डॉ. गोकाक ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या बी. ए. व एम. ए. या परीक्षेत इंग्रजी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ, इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे प्राध्यापक, प्राचार्य, डायरेक्टर, कुलगुरू म्हणूनही काम केले. सत्य साईबाबा उच्च शिक्षणसंस्थेचे कुलगुरू या नात्याने धार्मिक व नैतिक शिक्षणाच्या नव्या अभ्यासक्रमाची त्यांनी आखणी केली. विद्यार्थ्यांचे उदंड व अखंड प्रेम त्यांना कायमच मिळत राहिले. विद्यार्थीप्रिय प्रा. गोकाक यांची व्याख्याने, विशेषत: इंग्रजी व्याख्याने, ऐकणे हा त्या काळच्या तरुण पिढीच्या अभिमानाचा विषय असे. त्यांची शिस्त, पांडित्य याचा विलक्षण प्रभाव त्यांच्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांवर व सांगलीला प्राचार्य असतानाही झालेला होता.
योगी अरविंद आणि साईबाबा यांच्या तात्त्विक दृष्टिकोनांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला होता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महान कवी द. रा. बेन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, एका नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या मित्र मंडळात गोकाक एक सदस्य म्हणून सामील झाले. या काळात त्यांनी स्वच्छंदतावादी कवितांचे लेखन केले.
प्रा. गोकाक यांनी कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लेखन केले आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी गद्य-पद्य, समीक्षात्मक आणि संपादित लेखन केले आहे. त्यांचे इंग्रजी तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत, तर कन्नडमध्ये ५० पेक्षा जास्त साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यात २१ कवितासंग्रह – ‘भारत सिंधू रश्मि’ या महाकाव्यासह प्रसिद्ध झाल्या असून – २ कथासंग्रह, ४ नाटके, ३ प्रवासवर्णनपर पुस्तके, १० समीक्षाग्रंथ आणि इतर अन्य रचना प्रकाशित झाल्या आहेत.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
हबल आणि पेट्रियट
‘नासा’ने १९९० साली हबल दुर्बीण अवकाशात यशस्वीपणे सोडली, आणि या दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांमधून अवकाशातल्या अनेक रहस्यांचा उलगडा होऊ लागला.
मात्र हबलने सुरुवातीला पाठवलेली छायाचित्रे थोडी धूसर होती. यामागच्या कारणाचा छडा लावण्याचा प्रयत्न नासाच्या तंत्रज्ञांनी केला तेव्हा लक्षात आलं, की हबलच्या मुख्य आरशाची वक्रता २.२ मायक्रॉनने कमी होती. एक मायक्रॉन म्हणजे मीटरचा एक दशलक्षांश भाग.
शास्त्रज्ञांनी सलग पाच र्वषे खपून हा आरसा तयार केला होता. त्याच्या चाचण्या हजारदा झाल्या होता. मग असं का झालं असावं? त्याचाही शोध घेतल्यावर आढळलं की आरशाची चाचणी करत असताना वक्रतामापकावर रंगाचा एक अतिसूक्ष्म कण पडला होता. त्यामुळे मापनात चूक झाली होती.
नंतर नासाने दुरूनच त्या आरशात सुधारणा केली आणि हबलकडून सुस्पष्ट प्रतिमा येऊ लागल्या. मोजमापन करताना मापकाची छोटीशी चूक किती महाग पडू शकते याचं हे एक उदाहरण, तर दुसरं आहे पेट्रियट क्षेपणास्त्राचं.
१९९१ मधल्या आखाती युद्धात सौदीमधल्या अमेरिकन तळाच्या दिशेने एक इराकी स्कड क्षेपणास्त्र झेपावलं. अमेरिकन पेट्रियट क्षेपणास्त्र या स्कडला रोखू शकलं नाही, आणि तळावरचे २८ अमेरिकन सनिक मृत्युमुखी पडले.
काय होतं या दुर्घटनेमागचं कारण?
लक्ष्य ठरवताना पेट्रियटमध्ये वेळ मोजण्यासाठी संगणकाच्या अंतर्गत घडय़ाळाचा वापर केला होता. हे घडय़ाळ एक दशांश सेकंदाचं असल्याने त्याला १०ने गुणून वेळ सेकंदात घेतली जात होती. संगणकाचं घडय़ाळ २४ बिट्स वापरून डिजिटल पद्धतीने चालत होतं. पण त्या संख्येला १० ने गुणल्यावर प्रत्यक्ष वेळेत किंचित, म्हणजे तासाला ०.००३४ इतका सूक्ष्म फरक पडत होता.
एरवी या अत्यल्प फरकाने फार गडबड झाली नसती. पण त्या दिवशी पेट्रियट क्षेपणास्त्राचा संगणक सलग १०० तास काम करत होता. त्यामुळे हा फरक वाढत वाढत ०.३४ सेकंद इतका झाला. सेकंदाला दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या स्कडचा ठिकाणा निश्चित करताना जवळजवळ ५०० मीटरचा फरक पडला, आणि अर्थातच पेट्रियटचा नेम चुकला!
– मेघश्री दळवी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org