यास्मिन शेख
‘एखाद्या नोकराने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली असली, तरी त्याच्या मालकानेही माफी मागावी, असा आग्रह का धरायचा? याचा विचार सद्सद्विवेकबुद्धी असणारी व्यक्ती करू शकेल.’ किंवा ‘माणसाचे माणूसपण त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीमुळेच ठरते.’ वरील दोन्ही वाक्यांत ‘सद्सद्विवेकबुद्धी’ या शब्दातच एक मोठी चूक आहे. या शब्दाची फोड करू या- सद् सद् विवेक बुद्धी. या शब्दात सद् सद् हेच सदोष आहेत.
सत् हा शब्द आधी आल्यास आणि पुढील शब्दात ‘अ’ आल्यास- म्हणजे सत् असत् हे शब्द जेव्हा समासात एकापुढे एक येतात, तेव्हा त् चा द् होतो. दुसरा शब्द सत् नसून असत् आहे. त्या शब्दानंतर वि (व) आल्यामुळे त्या शब्दाचे रूप असद् होते. वरील शब्दांत सत् असत् असे दोन शब्द आहेत. त्यामुळे पहिल्या शब्दातील त् चा द् अ = सदसद् असे त्या शब्दाचे रूप होते. सत् असत् विवेक या सामासिक शब्दाचे रूप होईल- सदसद्विवेक. असा विवेक असलेली बुद्धी या सामासिक शब्दाचे योग्य रूप आहे सदसद्विवेकबुद्धी.
आता या शब्दातील चारही शब्दांचा अर्थ असा आहे- सत् (विशेषण)- अर्थ- खरा, चांगला, वास्तविक, यथातथ्य, योग्य, रास्त, उत्तम इ. असत् (वि.) सत् च्या विरुद्धार्थी खोटा, अयोग्य, चुकीचा, वाईट, अवास्तविक. सदसत् (वि.) खरेखोटे, वास्तविक व अवास्तविक, बरेवाईट. सदसद्विवेक किंवा सदसद्विचार (पु. नाम.) अर्थ-बरेवाईट, खरेखोटे यासंबंधी विचार किंवा विवेक. सदसद्विवेकबुद्धी किंवा सदसद्विचारशक्ती (स्त्री. नाम) अर्थ- खरे कोणते व खोटे कोणते यासंबंधी योग्य विचार करण्याची मानसिक शक्ती किंवा बुद्धी. वरील दोन्ही वाक्यांतील निर्दोष शब्द आहे- सदसद्विवेकबुद्धी.
पुढील शब्द पाहा :
सदसदि वेकबुद्धी.
सत् +आचरण = सदाचरण,
सत् +संगती = सत्संगती,
सत् +संग = सत्संग,
सत् +आचार = सदाचार,
सत् +उक्ती = सदुक्ती,
सत् +गती = सद्गती,
सत् +गुण = सद्गुण,
सत् +गुरू = सद्गुरू,
सत् गृहस्थ = सद्गृहस्थ,
सत् भाव = सद्भाव,
सत् धर्म = सद्धर्म,
सत् पात्री = सत्पात्री (दान),
सत् कर्म= सत्कर्म,
सत् पुरुष = सत्पुरुष,
सत् शील = सत्शील,
सत् बुद्धी = सद्बुद्धी.