डॉ. नीलिमा गुंडी
भाषा नेहमी काळ आणि सामाजिक परिस्थिती यांच्याशी नाते राखत बदल आत्मसात करते. त्यामुळे काळाच्या ओघात काही जुने वाक्प्रचार गतार्थ होतात आणि नवे वाक्प्रचार वापरात येतात. त्याचे श्रेय सर्जनशील लेखकांप्रमाणे पत्रकार आणि युवा पिढी यांनाही जाते. वर्तमानपत्रे ही दैनंदिन व्यवहाराच्या निकट असतात. त्यांच्या भाषेचा प्रभाव समाजमनावर मोठय़ा प्रमाणावर पडत असतो. त्यामुळे भाषेला नवे वळण देण्यात त्यांचा मोठा वाटा असतो.
नव्या तंत्रज्ञानामुळे ट्विटर हे समाजमाध्यम सध्या लोकप्रिय झाले आहे. कधीकधी एखादी राजकीय व्यक्ती त्यावरून जेव्हा महत्त्वाचे भाष्य करते, तेव्हा त्या भाष्याला जोरदार प्रतिसाद मिळत जातो. अनेक जणांच्या तेथील शेरेबाजीवजा अभिव्यक्तीला ‘टिवटिवाट करणे’ असा वाक्प्रचार हल्ली वापरला जातो. यात मूळ इंग्रजी शब्दातील अक्षरांची आठवण एकीकडे जपली आहे. शिवाय ‘चिमण्यांचा चिवचिवाट’ या शब्दाशीही त्याचे नाते नादातून राखले आहे. ईमेलवरून हल्ली एकमेकांना प्रतिसाद देत संवाद साधणे, यासाठी ‘मेलामेली करणे’ हा कानावर पडणारा वाक्प्रचारही इंग्रजी संज्ञेला मराठी लकब बहाल करणारा आहे.
‘कोलांटी उडी घेणे’ (पक्षबदल करणे), ‘घरचा अहेर’(आपल्या पक्षावर टीका करणे) ‘चुप्पी तोडणे’ (मौन सोडणे) असे नवे वाक्प्रचार सध्या विविध राजकीय घडामोडींचे वर्णन करताना वर्तमानपत्रांमध्ये वापरलेले दिसतात. तसेच महात्मा गांधी यांच्या शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याची आठवण जपत अभिनव पद्धतीने निषेध नोंदवण्यासाठी ‘गांधीगिरी करणे’ हा वाक्प्रचारही रूढ झालेला दिसतो. उदा. ‘रहदारीचे नियम मोडणाऱ्या मंडळींना गुलाबाची फुले देऊन गांधीगिरी करण्याचा उपक्रम शहरात राबवला गेला.’
प्रत्येक युवा पिढी भाषेचे वळण बदलण्याचा वारसाच जणू चालवत असते. याचे उदाहरण म्हणजे एकेकाळी ‘एखादी गोष्ट लक्षात न येणे’ यासाठी ‘टय़ूब न लागणे’ असा वाक्प्रचार वापरला जात असे. आता त्यासाठी ‘टोटल न लागणे’ असा वाक्प्रचार वापरला जातो. असे नवनवे वाक्प्रचार तयार होतच असतात. यातून भाषेच्या प्रवाहीपणाची एकप्रकारे खात्री पटत राहते.
nmgundi@gmail.com