डॉ. नीलिमा गुंडी

प्रवास या अनुभवातील काही कंगोरे वाक्प्रचारांमध्ये टिपलेले आढळतात. प्रवास कशासाठी करावयाचा यावरूनही वाक्प्रचार बदलतात. उदा. युद्धात ‘कूच करणे’ म्हणजे इशारतीचा नगारा वाजला की सैन्याने चालायला सुरुवात करणे. मध्येच न थांबता मार्गक्रमण करणे, यासाठी ‘मजल दरमजल’ असा वाक्प्रचार कोशात नोंदवण्यात आला आहे. आपण आज तो टप्प्याटप्प्याने केलेला प्रवास या अर्थाने वापरतो. मजल (मूळ अरबी शब्द मंझिल) म्हणजे जेथे पोहोचायचे आहे, ते ठिकाण. त्याच्याशी संबंधित ‘मजल मारणे’ म्हणजे प्रगतीचा पल्ला गाठणे हा वाक्प्रचारही रूढ आहे. पूर्वी प्रवासाची वेगवान साधने उपलब्ध नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागत असे. त्यात प्रवासी ‘मेटाकुटीला येणे’ या वाक्प्रचाराचा अनुभव घेत असत. मेट/ मेटे म्हणजे गुडघ्याचा सांधा. मूळ शब्द होते- मेटे खुंटीस येणे. याचा वाच्यार्थ आहे, घातलेली मांडी काढून गुडघ्यावर उभे राहणे, नेटाने खेचणे. (घोडा चालताना थकला की त्याच्या ढोपरासंबंधी हे शब्द योजतात.) लक्ष्यार्थ आहे, प्रयत्नांची शिकस्त करून कंटाळणे.

विष्णुभट गोडसेभटजी यांचे ‘माझा प्रवास’ हे पुस्तक वाचताना १८५७ च्या काळातील प्रवासाचे चित्र समोर येते. काही वेळा प्रवासात गंभीर प्रसंग गुदरतात. गोडसे भटजी यांनी ‘झाशीची वाताहत’ वर्णन करताना लिहिले आहे की इंग्रजांनी पाठलाग केल्यामुळे ‘काही काही घोडेस्वार जिकडे ज्यास वाट फुटली, तिकडे निघोन गेले.’ वाट फुटेल तिकडे जाणे म्हणजे वेळ, प्रसंग येईल त्याप्रमाणे- अगोदर काही न ठरवता जाणे.

प्रवासात दिशादर्शक असे मैलाचे दगड असतात. आपले जायचे ठिकाण किती लांब आहे, रस्ता कोणता आहे, याची कल्पना त्यामुळे येते. ‘मैलाचा दगड’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लक्षणीय, दखलयोग्य. प्रवास करताना प्रदेशाची सीमा ओलांडली जाते. त्यातून आलेल्या ‘सीमोल्लंघन करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, ‘रूढ चाकोरी ओलांडणे.’ धार्मिक कारणांसाठी केलेल्या प्रवासाला यात्रा असे म्हणतात. आयुष्याच्या वाटचालीला प्रवासाचे रूपक योजले जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, हे सांगताना इहलोकीची यात्रा संपणे, हा वाक्प्रचार वापरला जातो.

nmgundi@gmail.com

Story img Loader