भानू काळे
आज मराठीत वापरात असलेले अनेक शब्द आपल्याकडे कसे आले याविषयी या सदरात गेले वर्षभर बरेच काही सोदाहरण लिहिले गेले. त्यातून काही सैद्धांतिक मांडणी करता येईल का, याचा या शेवटच्या लेखात विचार करू. एखादा शब्द कुठून आला याचा शोध इतिहास, तंत्रज्ञान, भूगोल, अर्थकारण अशा अनेक घटकांना स्पर्श करतो. इतिहासाशी असलेला संबंध आजवरच्या अनेक उदाहरणांतून अगदी स्पष्ट आहे. फारसी, पोर्तुगीज, इंग्रज राजवटी येऊन गेल्या आणि त्यातूनच त्यांच्या भाषांशी संपर्क आला. तंत्रज्ञानातूनही अनेक शब्द, विशेषत: आधुनिक राहणीशी संबंधित शब्द मराठीत आल्याचे आपण बघितले.
भूगोलाचाही भाषेवर परिणाम होतो. बंगालीतून मराठीत भाषांतर करणारे अशोक शहाणे म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात खडकाळ जमीन, पाण्याचे दुर्भिक्ष्य. दगडाचा टणकपणा, ओबडधोबडपणा मराठीत आहे. महाराष्ट्रात पाण्याची पंचाईत आहे आणि तिथे बंगालमध्ये पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न आहे. वंदे मातरम् बंगालबद्दल लिहिलेले आहे. सोलापूर किंवा नगरमधील लोक आपली मातृभूमी सुजलाम् सुफलाम् आहे, असे कसे कबूल करणार?’’
शब्दांचा उगम अर्थकारणदेखील सूचित करतो. जिथे पावसावर अवलंबून असल्याने शेतीचे उत्पन्न खूप कमी आहे, अशा महाराष्ट्रात विलासी राहणीला फारसा वावच नव्हता! दिमाख, लवाजमा, चैन, ऐष, मिजास, आलिशान, लाजवाब, रुबाब, शानदार, षौक, मुजरा यांसारखे विलासी जीवनाशी जोडलेले शब्द फार्सीतूनच मराठीत आले यात नवल नाही!
आपण फक्त घेवाण केली आणि देवाण केली नाही का? ‘गुरू’, ‘नमस्ते’, ‘बंदोबस्त’, ‘जंगल’ असे काही भारतीय शब्द परकीयांनीही आत्मसात केले, पण त्यांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे हे एक कटू सत्य आहे. कारण भाषिक संस्कृतीही पाण्याप्रमाणे वरच्या पातळीवरून खालच्या पातळीकडे, जेत्याकडून जिताकडे नैसर्गिकरीत्या वाहात असावी. आजकाल भाषिक अस्मितेला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्रजी पाटय़ांना काळे फासणे हा मराठीप्रेमाचा आविष्कार बनतो. हिंदीभाषक रिक्षाचालकांना मराठीत बोलायची सक्ती केली जाते. आपल्या भाषेतला एखादा शब्द मुळात आला कुठून याचा शोध या अस्मितेतील आक्रमकता कमी करतो. आपली भाषा हा एक सामूहिक आणि काही प्रमाणात वैश्विकदेखील वारसा आहे, हे दाखवून देतो. समाजाची जडणघडण ही फक्त त्या विशिष्ट समाजाचीच निर्मिती नसते, हे एक तत्त्वही या शोधातून अधोरेखित होते. (समाप्त)
bhanukale@gmail.com