वैशाली पेंडसे-कार्लेकर vaishali.karlekar1@gmail.com

‘खाणपिणं’ हा मराठी माणसाचा अगदी ‘जिव्हा’ळय़ाचा विषय. आज आपल्या मराठी माणसांच्या स्वयंपाकघरात (किचनमध्ये नाही हो!) आणि पोटात पुरणपोळीबरोबर देशोदेशींच्या खाद्यपदार्थानापण जागा मिळाली आहे. या पदार्थाबरोबर आणि अर्थातच इंग्रजीच्या संपर्कातून अनेक नवीन शब्द आपल्या खाण्यापिण्यातही आले. ‘अगं, त्या रेसिपीमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत की कटरवर चॉप करून?’ यापेक्षा छान ‘कुस्करून’, ‘लगदा करून’ घ्या किंवा कटर म्हणजे ‘चिरणी’वर चिरून घ्या ना. रेसिपीला ‘पाककृती’ असा छान शब्द आहेच. आमटीसाठी डाळ ‘घोटून’ घेता येते, तर श्ॉलोफ्राय, डीपफ्रायऐवजी अळूवडय़ा तेलावर ‘परतून’ किंवा ‘तळून’ही घेता येतात. सॅलडला ‘कच्चाहार’ म्हणता येईल. जेवणातलं सूप आता ‘सुपा’इतकं सवयीचं झालं असलं तरी त्याच्यासाठी ‘सार’, ‘कढण’ असे काही समानार्थी शब्दही वापरता येतील.

आज मी ब्रंच केल्यामुळे लंच स्कीप केलंय, असं म्हणण्याऐवजी‘भरपेट न्याहारी’ केल्यामुळे दुपारचं जेवण घेतलं नाही असं म्हणता येईल. स्नॅक्ससाठी ‘अल्पोपाहार’ किंवा वेळेनुसार ‘मधल्या वेळचं खाणं’ आहेच. समारंभामध्ये लोकप्रिय असणारी बुफे पद्धती ‘स्वरुचिभोजन’ या शब्दाने अधिक रुचिपूर्ण होईल.

केकबरोबर आपल्याकडे बेक करणं आलं. बेक, ग्रील या क्रियांसाठी भाजणं, शेकवणं ही क्रियापदं वापरता येतील. मसाला किंवा इतर स्वाद हे पदार्थामध्ये मुरण्यासाठी मॅरिनेट करणे किंवा मॅरिनेशन असा वाक्प्रयोग केला जातो. त्याला  अनुक्रमे ‘मुरवत ठेवणं किंवा  मुरमाखवणं’, ‘मुरवणी’ असंही म्हणता येईल. ग्रेव्हीला ‘रस्सा’, डिप करणे याला ‘बुडूक’, ‘डुबूक’, ‘डुबकावणं’ असंही म्हणता येईल.   

जंकफूडचा शब्दश: अर्थ न घेता त्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थाचे ‘अरबटचरबट’, ‘सटरफटर’, ‘चुरडूमुरडू’, ‘चाऊम्याऊ’, ‘चाणाचुरा’, ‘चटकमटक’ असे वेगवेगळय़ा छटांचे अनेक शब्द आपल्याकडे आहेत. भूक लागल्यावर पटकन तयार होणारे फास्टफूड म्हणजे आपला ‘झटपट खाऊ’.

शब्दांची ही खाद्ययात्रा हिंडू तेवढी रसपूर्ण वाटणार आहेच. पण महत्त्वाचं आहे ते – कोणतेही शब्द भाषेत रुळण्यासाठी सर्वानी ते शब्द भरपूर प्रमाणात वापरणं. चला तर मग, यासाठी प्रयत्न करू या.