भानू काळे
अल्लाउद्दीन खिलजीने १२९४ मध्ये देवगिरीचा पाडाव केला आणि तेव्हापासूनची जवळपास ५०० वर्षे बहुतेक मराठी मुलुखावर मुसलमानी अंमल टिकला. मुस्लीम राज्यकर्ते तुर्की, अफगाण, इराणी, पठाण, अरब, मुघल इत्यादी विभिन्न वंशांचे असले तरी सर्वाची राज्यकारभाराची भाषा मात्र फार्सीच राहिली. कारण प्राचीन काळात इराणचे (पर्शियाचे) साम्राज्य त्या परिसरात सर्वाधिक सामर्थ्यवान होते व फार्सी ही त्यांची भाषा होती. इतक्या प्रदीर्घ संपर्कानंतर मराठीवर फार्सीचा खूप प्रभाव पडणे स्वाभाविक होते. मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीचा विचार करताना फार्सीकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. मराठीत फार्सी शब्द किती मोठय़ा प्रमाणावर होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधव जूलियन यांची कविता. तिचे विडंबन करताना अनंत काणेकर यांनी आपल्या ‘शिवाजीचे बेगमेस उत्तर’ या कवितेत लिहिले होते- ‘जरि या मराठमोळय़ा शिवबास बोध व्हावा, तरि फारशी-मराठी मज कोश पाठवावा’!
जबरदस्त, हरामखोर, सरदार, दिलगीर, तनखा, खुशामत, बेलगाम, आवाज, इशारा, एल्गार, खंजीर, गर्दी, इमारत, इनाम, तारीख, परवाना, तहसील, तपास, अर्ज, मोबदला, मिळकत, बिदागी, गुलाम, आजार, इलाज, पैदास, तमाशा, ख्याल असे असंख्य फार्सी शब्द मराठीने स्वीकारले. अनेक आडनावेदेखील फार्सीतून आली. उदाहरणार्थ, कारखानीस, किल्लेदार, चिटणीस, खासगीवाले, जकाते, जमादार, पागनीस, दिवाण, पोतदार, फडणीस, डबीर, मिराशी, मिरासदार, शिलेदार, सबनीस, हवालदार, सराफ. माधवराव पटवर्धन यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ किंवा यू. म. पठाण यांचा ‘फार्सी- मराठी अनुबंध’ हा ग्रंथ याची साक्ष पटवायला पुरेसा आहे.
भाषाशुद्धी चळवळीचा परामर्श घेताना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी पुणे येथील १९२७ सालच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ‘‘जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत, ते केवळ अन्य भाषांमधून आले म्हणून बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे,’’ असे म्हटले होते. न. चिं. केळकर यांनीही सह्याद्री मासिकात लिहिताना ‘‘तत्त्वात जिंकाल, पण तपशिलात हराल’’ अशा शब्दांत चळवळीची मर्यादा नोंदवली होती. ‘‘शब्द कुठूनही येऊ द्या, मराठीचा एकूण शब्दसंग्रह वाढणे महत्त्वाचे आहे’’ हे हरी नारायण आपटे यांचे मत आजही स्वीकारार्ह वाटते.
bhanukale@gmail.com