मराठवाडय़ातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा लक्षात घेऊन १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या तीन क्षेत्रांत कार्य करते. विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालये तसेच कृषीतंत्र विद्यालये आहेत. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्न तंत्रज्ञान असे अनेक अभ्यासक्रम राबविण्यात येतात. येथील शिक्षणविषयक विविध सुविधेमुळे पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी परराष्ट्रातील विद्यार्थीही येथे शिक्षणासाठी धाव घेतात. विद्यार्थ्यांची कार्यकुशलता वाढावी, कार्यकुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद या संस्थेशी विद्यापीठाने द्विपदवी कार्यक्रमासंबंधी सामंजस्य करार केला आहे. याप्रकारचा द्विपदवी सामंजस्य करार करणारे राज्यातील हे पहिलेच कृषी विद्यापीठ आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने विद्यापीठाच्या सूर्यफूल व करडई या पिकांसंबंधित संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन दिले आहे. विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे आजपर्यंत विविध पिकांचे १२५ वाण, २० कृषी अवजारे विकसित केली असून ७१५ तंत्रज्ञान शिफारसी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विभागीय कृषी विस्तार केंद्र तसेच घटक व अशासकीय कृषी विज्ञान केंद्र करतात. विद्यापीठ दरवर्षी विद्यापीठ वर्धापन दिनी खरीप पीक मेळावा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रब्बी पीक मेळावा घेते. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन करते व विद्यापीठ निर्मित बियाणाचे वाटप करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी विद्यापीठात महिला शेतकरी मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषी दैनंदिनी, कृषी दिनदíशका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेती-भाती हे मासिक, यांचे प्रकाशन करण्यात येते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये नवचतन्य निर्माण करण्यासाठी ‘विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठामार्फत राबवला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा