जिवाणू (बॅक्टेरिया) नजरेस पडत नसले तरी त्यांचा परिणाम मात्र खूप व्यापक असतो. सागरी परिसंस्थेचे आरोग्य जिवाणूंच्या हातात असते. समुद्राच्या एक लिटर पाण्यात एक अब्ज जिवाणू असतात. त्यांची लांबी ०.२ ते २० मायक्रॉन असते. ‘थायरोमार्गारिटा मॅग्नेफिका’ जिवाणू खारफुटीच्या दलदलीत सापडतो. त्याची लांबी दोन सेंटिमीटपर्यंत असू शकते. सर्वात लांब जिवाणूचा मान त्याच्याकडे जातो. सागरी जिवाणू गोलाकार, दंडगोलाकार, सर्पिल, स्वल्पविरामासारखेही असतात. ‘हॅलोक्वाड्रॅटम वाल्सबी’ मात्र दुर्मीळ चौकोनी आकाराचा असतो.
सागरातील सर्व सजीवांना खारे पाणी मानवते. किंबहुना त्यांच्यासाठी ती पूर्वअटच असते. ते अतिथंड, अतिउष्ण, आम्लधर्मी, अतिदाबयुक्त (समुद्रतळ) अशा प्रतिकूल परिस्थितीत राहतात. ‘पायरोलोबस फूमारी’ १०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात जगतो. पृष्ठभागापासून तळापर्यंत, एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सगळीकडे जिवाणू आढळतात. सागराच्या प्रत्येक थेंबात जिवाणू असतात. ३५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा पाळणा हलला आणि सागराच्या कुशीत जिवाणू जन्मला! प्रकाशसंश्लेषणाने स्वत: अन्न निर्माण करणारे पहिले सजीव म्हणजे नीलहरित जिवाणू- सायनोबॅक्टेरिया समुद्राच्या वरच्या भागात आढळतात. पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारेही तेच पहिले! उदा. सिनेकोकॉकस, प्रोक्लोरोकॉकस.
आयर्न, सल्फर, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड अशा रसायनांची ऊर्जा वापरणारे स्वयंपोषी जिवाणू समुद्रतळाशी असतात. तेथील खंदकातून बाहेर पडलेली रसायने हा त्यांचा ऊर्जास्रोत. उदा. ‘थाउमआर्किओटा’ जिवाणू किंवा मिथेन तयार करणारे ‘मिथॅनोसार्सिना बार्केरी’. मृतोपजीवी परपोषी जिवाणूही महत्त्वाचे. त्यांच्यामुळे मृत सजीवांतील कार्बनी पदार्थाचे विघटन होते. मूलद्रव्यांचे चक्रीकरण होते. सागरी परिसंस्थेचा कारभार व्यवस्थित, सुरळीत चालतो. काही परपोषी जिवाणूंमुळे सागरी प्राण्यांना रोगही होतात. उदा. ‘व्हिब्रिओ व्हल्निफिकस’. काही जिवाणू आणि इतर सजीवांची घट्ट मैत्री होते. ‘सिलीसिबॅक्टर’ जिवाणू डायनोफ्लॅजेलेट्सवर राहतात. ही मैत्री तुटली तर काही डायनोफ्लॅजेलेट्स जगू शकत नाहीत.
काही जिवाणू दुसऱ्या जिवाणूंची शिकार करतात. ‘डेलोव्हिब्रीओ’ जिवाणू हे त्याचे जिवंत उदाहरण! काही जिवाणूंना जगायला ऑक्सिजन लागतो (ऑक्सिश्वसन), काहींना ऑक्सिजन लागत नाही (विनॉक्सिश्वसन) तर काही जिवाणूंना ऑक्सिजनचा सहवास अजिबात सहन होत नाही. सागरातील प्रत्येक परिसंस्थेची तऱ्हा वेगळी. विपरीत, बिकट परिस्थितीतही टिकून राहण्याचा चिवटपणा या जिवाणूंच्या ठायी ठायी दिसतो. जिवाणूंमुळेच सागरासह सगळय़ाच परिसंस्थांतील जैव-भू-रसायन चक्रे कार्यरत राहतात.
– बिपिन देशमाने
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org