शेती विषयात द्विपदवीधर फुकुओका जपानच्या शेतकी खात्यात नोकरीला होते. त्यांच्याकडे अमेरिकेहून आयात केलेले तांदळाचे नमुने तपासण्याचे काम होते. प्रत्येक नमुन्यात त्यांना वाटायचे की तांदळाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. पण त्यांच्या निरीक्षणाकडे कोणी लक्ष दिले नाही. कंटाळून त्यांनी नोकरी सोडली. त्यांना निसर्गाचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते जंगलात फिरत व वनस्पतींचा अभ्यास करत. त्यांना हे उमगलं की रसायनं वापरून केलेली शेती सदोष आहे. निसर्गाची आपली एक अशी वागायची पद्धत आहे. ती जर आपल्याला समजली तर धान्य पिकविण्यासाठी कुठल्याही निविष्ठांची गरज नाही. इथुनच सुरू झाला त्यांचा निसर्गपोषित शेतीचा प्रवास!
शेतात फिरताना त्यांना एके ठिकाणी आढळलं की वर्षांनुवष्रे पडित असलेल्या एका जमिनीच्या तुकड्यात तांदळाच्या डौलदार ओंब्या आल्या आहेत. आपल्या शेतात त्यांनी नांगरणी, वखारणी न करता तांदळाचे बियाणे नुसते फेकून दिले. तरीही शेतात त्यांची रोपे उगवली. बरोबरच चारापण उगवला. त्यांनी चारा कापला व तिथेच रूजायला टाकून दिला. त्या कुजलेल्या गवताचे सेंद्रिय खत झाले. जंगलात त्यांना निसर्गाचा सर्जन-विसर्जन-सर्जन मंत्र मिळाला आणि मग त्यांनी मागे वळून बघितले नाही. फक्त एक किलो तांदळाच्या बियाणांना शेणात कालवून त्यांनी त्यांचे लहान लहान गोळे केले व एक एक फुटाच्या अंतरावर त्यांना पेरले. अधूनमधून त्यांचे सिंचन केले. त्यांना यापासून भरघोस पीक मिळाले.
फुकुओका यांचे निसर्ग पोषित शेतीचे चार मंत्र आहेत. शेतात नांगरणी, वखारणी करायची नाही. शेतात कुठलेच सेंद्रिय वा रासायनिक खत टाकायचे नाही. चारयाला मारक ठरेल असं कुठलंच रसायन शेतात टाकायचे नाही. शेतात यंत्र आणायचे नाही.
आपल्या अनुभवावर त्यांनी ‘वन स्ट्रॉ रिव्हॉल्यूशन’ हे पुस्तक लिहिले. त्याचे २८आंतरराष्ट्रीय भाषांतून अनुवाद झाले (मराठी अनुवाद-काडातून क्रांती). ते जगभर फिरले. २००८ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अरुण डिके (इंदूर),
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत : ४ फेब्रुवारी
१९४९ – वेदांताचे अभ्यासक, वेदांचे भाषांतरकार व ज्योतिष विषयांचे लेखक रामचंद्र विनायक उर्फ बाबासाहेब पटवर्धन यांचा जन्म १८७५ साली झाला. बी.ए.एल.एल.बी.चे शिक्षण घेतलेल्या बाबासाहेबांनी ‘वेद काय म्हणतात?’ हे तंतोतंत कळावे यासाठी वेदांचे भाषांतर करावे या उद्देशाने तयंनी अ. ब. कोल्हटकर, द. अ. तुळजापूरकर यांच्या सहाय्याने ‘मराठी श्रुतिबोध’ हे मासिक सुरू केले. ६४ पृष्ठांच्या या मासिकात ३२ पृष्ठे संहिता व ३२ पृष्ठे भाषांतर एवढा मजकूर दिला जात असे. हे मासिक तीनच वर्षे चालले. या तीन वर्षांत या मासिकातून ७ मंडले, २९ सूत्रे, ५ अष्टके आणि ४ अध्याय त्यांनी काढले. आयुर्वेद आणि ज्योतिष हेही पटवर्धनांच्या अभ्यासाचे विषय. ‘आकाश ज्योतिष’, ‘भारतीय वेदपद्धती’ अथवा ‘सूर्यसिद्धांताचे समूल’ आणि ‘सोपपत्तिक मराठी भाषांतर’, ‘सरस्वत कुलवंतस माधवोपाध्याय विचरित आयुर्वेद प्राकश’ ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके. मानवी पूर्वज तसेच ओरांगोत्तान अथवा जंगली माणूस इस्रायल लोकांचा इतिहास आदी ग्रंथही त्यांच्या नावावर जमा आहेत. ४ फेब्रुवारी १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय वझरेकर
वॉर अँड पीस : केसांचे विकार
केसांचे विकार हे खरे म्हणजे विकार नव्हेतच. केस पांढरे झाले, गळावयास लागले, म्हणजे शरीरातील काही कमीअधिक बिघडते असे नव्हे, तरीपण तरुण मुलामुलींच्या दिसण्याच्या एका कल्पनेमुळे केसांना काही विलक्षण महत्त्व आजकालच्या वैद्यकात आले आहे. बऱ्याच वेळा शारीरिक कारणापेक्षा हवा, पाणी यांच्यातील अपायकारक भाग, हे केस गळणे किंवा पिकण्याला कारण असतात. आहारातील असमतोल, चिंता व चुकीचे शाम्पू, तेल यामुळेही केसांची ‘केस’ जिंकणे म्हणजे वैद्यांची कसोटी लागत असते. केसांत कोंडा असताना डोक्याला तेल चोपडून केस गळणे कधीच थांबत नाही. ज्यांना केस समस्येवर अक्सर इलाज हवा आहे त्यांनी ‘डॅन्ड्रफ’, खरबा किंवा सोरायसिससारखी खपल्या, खवडे इ. लक्षणांवर लक्ष द्यावे.
वयाने, ज्ञानाने व कर्तृत्वाने खूप मोठय़ा व्यक्तींचे आमच्यावर लोभ, प्रेम फार. स्वाध्याय महाविद्यालय पुणे याचे चालक, मालक, पालक प्रा. डॉ. विष्णुपंत महाजन यांचा आयुर्वेदाचा दांडगा अभ्यास. एक दिवस वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठय़ांचे ‘घरगुती औषधे’ हे पुस्तक घेऊन ते माझ्याकडे आले व त्यातील वटजटादि तेल या केश्यतेलाची चर्चा करून हे तेल तयार करा असे सुचविले. अप्पाशास्त्री म्हणजे घरगुती स्वरूपाच्या औषधीशास्त्राचे मेरुमणी. वटजटादि तेलात वडाच्या पारंब्यांची, केसांच्या बळकटीकरिता अप्पाशास्त्रींना कशी काय कल्पना सुचली असेल हे त्यांनाच माहीत!
अशाच एका गुणवान आमलक्यादि तेलाची आम्ही जाहिरात न करताही जेव्हा एखादे कुटुंब ‘स्टॉकमध्ये असावे म्हणून’ आमलक्यादि तेल तीन/सहाच्या हिशेबात घेऊन जाते त्या वेळेस घटकद्रव्यांच्या ताजेपणाची खऱ्या अर्थाने कल्पना येते. तेल कसे खपेल यापेक्षा ताज्या वडाच्या पारंब्या, ब्राह्मी, कोरफड, उत्तम दर्जाचे आवळे किंवा आवळकाठी हे सारे मोठय़ा प्रमाणावर कसे मिळणार हीच काळजी आहे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. : माणसे जगतात, हेच आश्चर्य!
विकृती हा शब्द विशेषकृती असा घडला असला तरी या विषेशकृतीचे स्वरूप आता विपरीत कृति असेच रुळले आहे. मी शरीररचना आणि शरीर क्रिया या विषयांच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर second MBBS मध्ये पोहोचलो आणि Stethoscope गळ्यात अडकवण्याच्या उच्च स्थितीला पोहोचलो. रुग्णालयातला एखाददुसरा रुग्ण चुकून मला डॉक्टर म्हणू लागला आणि अनेक विकृति असलेल्या रुग्णांचे दर्शन घडू लागले. या विकृति शास्त्राला इंग्रजीत Pathology म्हणतात. Pathology या विषयाचे त्याकाळचे पाठय़पुस्तक बॉइड या एका नामवंताने लिहिले होते. Boyd ने हजारो विकृति झालेल्या मृत रुग्णांची शवविच्छेदने (post Mortem) केली होती आणि म्हणूनच लिहिले होते की ‘माणसे मरतात याचे आश्चर्य वाटत नाही तर ती जगतात कशी याचा मला अचंबा वाटतो.’ पूर्वी संसर्गजन्य रोग होते त्यात आता प्रदूषणाची भर पडली आहे. पूर्वी गरिबी आणि त्यातून घडणारे उपोषण होते आता कुपोषण आहे. रामदासांनी मूर्खाची लक्षणे सांगताना रस्त्याच्या कडेला रचलेल्या अन्नाच्या ठेल्यावर तिथेच उभे राहून ते उघडय़ावरचे अन्न खाणे असे लक्षण सांगितले. हल्ली बकाल शहरीकरणामुळे अर्धे लोक असेच जेवतात. घरी स्वयंपाक करण्याचे सोपस्कार करणारे आठवडय़ातून एकदा बाहेरचे मागवतात किंवा दोन एक हजार रुपये टिकवून आपल्या चौकोनी कुटुंबाला काहीतरी Fancy भरवतात.
या बाहेरच्या खाण्याच्या जागांमध्ये भटारखाने बघणे हा एक विदीर्ण अनुभव असतो. किंबहुना ते दर्शन घडते तेव्हा महिनाभर बाहेर खाण्याचे थांबते मग परत सुरू होते. सगळ्या नद्यांमध्ये, फोफावलेल्या लोकसंख्येमुळे तयार झालेल्या अनियोजित शहरांमधली गटारे आणि कारखान्यात होणारे रसायनांचे स्त्राव सोडलेले आहेत. धान्याच्या शेतावर कीटनाशके टाकली जातात. ही औषधे तयार करणाऱ्या हुशार माणसाला जे औषध एक जीव मारू शकते, तेच औषध माणसांना कसे सोडणार हा विचार सुचत नाही. धंद्याच्या नावाखाली हल्ली फळे रसायनांत उबवण्याची पद्धत सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधी कैरी मीठ लावून खाण्याऐवजी पिकलेले आंबेच घरी पोहोचतात आणि त्यात किती कीटकनाशके आणि उबवणारी रसायने असतात कोण जाणे? मांसाहारांचेही तेच. गावठी अंडे कोठे मिळतच नाही. कोंबडय़ांना नैसर्गिक रीतीने खाऊ देण्याऐवजी असा काही कृत्रिम आहार देतात आणि इतकी जीवनसत्त्वे टाकतात की अंडय़ाला Vitamins चा वास येतो. इंग्लंडमधे गायींना पुष्ट करण्यासाठी त्यांना त्यांच्या नकळत मांसाहार भरवण्याचा प्रकार सुरू झाला. त्या गायीचे मांस खाणाऱ्यांना एक दुर्धर रोग झाला, मग तो प्रकार थांबला. बॉईड म्हणत होता तेच खरे. माणसे जगतात हेच आश्चर्य आहे.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com