शेती विषयात द्विपदवीधर फुकुओका जपानच्या शेतकी खात्यात नोकरीला होते. त्यांच्याकडे अमेरिकेहून आयात केलेले तांदळाचे नमुने तपासण्याचे काम होते. प्रत्येक नमुन्यात त्यांना वाटायचे की तांदळाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. पण त्यांच्या निरीक्षणाकडे कोणी लक्ष दिले नाही. कंटाळून त्यांनी नोकरी सोडली. त्यांना निसर्गाचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते जंगलात फिरत व वनस्पतींचा अभ्यास करत. त्यांना हे उमगलं की रसायनं वापरून केलेली शेती सदोष आहे. निसर्गाची आपली एक अशी वागायची पद्धत आहे. ती जर आपल्याला समजली तर धान्य पिकविण्यासाठी कुठल्याही निविष्ठांची गरज नाही. इथुनच सुरू झाला त्यांचा निसर्गपोषित शेतीचा प्रवास!
शेतात फिरताना त्यांना एके ठिकाणी आढळलं की वर्षांनुवष्रे पडित असलेल्या एका जमिनीच्या तुकड्यात तांदळाच्या डौलदार ओंब्या आल्या आहेत. आपल्या शेतात त्यांनी नांगरणी, वखारणी न करता तांदळाचे बियाणे नुसते फेकून दिले. तरीही शेतात त्यांची रोपे उगवली. बरोबरच चारापण उगवला. त्यांनी चारा कापला व तिथेच रूजायला टाकून दिला. त्या कुजलेल्या गवताचे सेंद्रिय खत झाले. जंगलात त्यांना निसर्गाचा सर्जन-विसर्जन-सर्जन मंत्र मिळाला आणि मग त्यांनी मागे वळून बघितले नाही. फक्त एक किलो तांदळाच्या बियाणांना शेणात कालवून त्यांनी त्यांचे लहान लहान गोळे केले व एक एक फुटाच्या अंतरावर त्यांना पेरले. अधूनमधून त्यांचे सिंचन केले. त्यांना यापासून भरघोस पीक मिळाले.
फुकुओका यांचे निसर्ग पोषित शेतीचे चार मंत्र आहेत. शेतात नांगरणी, वखारणी करायची नाही. शेतात कुठलेच सेंद्रिय वा रासायनिक खत टाकायचे नाही. चारयाला मारक ठरेल असं कुठलंच रसायन शेतात टाकायचे नाही. शेतात यंत्र आणायचे नाही.
आपल्या अनुभवावर त्यांनी ‘वन स्ट्रॉ रिव्हॉल्यूशन’ हे पुस्तक लिहिले. त्याचे २८आंतरराष्ट्रीय भाषांतून अनुवाद झाले (मराठी अनुवाद-काडातून क्रांती). ते जगभर फिरले. २००८ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अरुण डिके (इंदूर),
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा