जपानी कृषितज्ज्ञ मसानोबु फुकुओका यांनी जपानमधील आपल्या स्वत:च्या शेतातले तण आटोक्यात आणण्याची एक विशेष कृषिपद्धती शोधून काढली, पण ती नीट समजून न घेता, ‘फुकुओका म्हणतात की शेतात खुरपण करू नका’ अशा प्रकारचा अपप्रचार करून भारतात त्यांचे शिष्य म्हणविणारे काही लोक शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत.
फुकुओका हे उन्हाळ्यात भाताचे पीक घेत. भाताचे पीक पाण्याने भरलेल्या खाचरातच लावले पाहिजे, असा काही नियम नाही. फुकुओका हे खाचरातच भात लावीत, पण ते पाण्याने न भरता त्याला फक्त जमीन ओली राहील एवढेच पाणी देत. त्यात तण उगवले की तण लहान असतानाच ते खाचर पाण्याने भरीत, जेणेकरून त्यातले तण पाण्याखाली दबून मरून जाईल. तण मरून गेले की ते खाचरात भरलेले पाणी सोडून देत. या युक्तीमुळे हातात खुरपे घेऊन भातातले तण काढणे ही क्रिया त्यांना टाळता येई. भातानंतर ते गहू किंवा बार्लीचे पीक घेत. यासाठी शेतात भात उभे असताना त्याच्या कापणीपूर्वीच ते त्यात गहू किंवा बार्लीचे बी टाकीत.
आपण पीक म्हणून लावीत असलेल्या वनस्पतींचे बी दुसऱ्या वनस्पतींच्या सावलीत किंवा पूर्ण अंधारातही रुजून येते, पण तणाचे बी मात्र अन्य वनस्पतींच्या सावलीत किंवा अंधारात रुजून येत नाही. त्यामुळे पूर्ण वाढलेल्या भाताच्या उभ्या पिकात टाकलेले गहू किंवा बार्लीचे बी रुजून त्याची रोपे लगेच वाढूही लागतात, पण जोपर्यंत भात उभे आहे तोपर्यंत त्यात तण वाढत नाही. भाताची कापणी केल्यानंतर एरव्ही या शेतात तण उगवून आले असते, पण आता तिथे गहू किंवा बार्लीची रोपे आधीच उभी असल्याने त्यांच्या सावलीत तणाचे बी कमी प्रमाणात उगवते आणि शिवाय तोपर्यंत चांगली थंडी पडू लागल्याने मागाहून रुजून येणारे तण गहू-बार्लीशी स्पर्धाही करू शकत नाही.
तणांचा बंदोबस्त करण्याची ही पद्धती केवळ जपानसारख्या वातावरणात आणि तांदूळ-गहू या पीकक्रमातच उपयोगाची आहे. महाराष्ट्रातल्या पिकांमध्ये ही पद्धती उपयोगाची नाही.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस : छातीत दुखणे : भाग – २
या दुखण्याची लक्षणे- १) छातीत हृदयाचे जागी व जवळपास दुखणे. बोलण्याचे किंवा जिना चढउतार करण्याचे श्रमाने दु:ख वाढणे. कष्ट करणे. थकवा येणे. हृदयाचे व श्वासाचे ठोके वाढणे. विश्रांतीने बरे वाटणे. अधिक श्रमाने हात, पाय, चेहरा काळानिळा वाटणे. २) जोरात काम केले, चाल केली, जिने चढउतार केले तर थोडा क्षुद्र श्वास लागणे, जरा विश्रांती घेतली की बरे वाटणे. नाडीच्या गतीत थोडय़ा श्रमाने किंचित वाढ होणे. ३) छातीत सर्वत्र कमी अधिक दुखणे, टोचणे, चमका मारणे, सर्दी, पडसे, खोकला ही लक्षणे अधिक असणे. अधूनमधून ताप येणे. वजन घटणे. कार्यशक्ती कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे. ४) पोट डब्ब होणे, फुगणे, खालचा वायू खाली व वरचा वायू न सरकणे. पोट गच्च वाटणे. त्यामुळे छातीत दुखणे हे दु:ख कमी अधिक व वेगवेगळ्या वेळी छातीत वेगवेगळ्या ठिकाणी दुखणे.
हृद्रोग हा विकार आहे वा नाही हे ठरविण्याकरिता; तसेच क्षय, सर्दी पडसे यांची निश्चिती करण्याकरिता; हृदयाचे ध्वनी व फुप्फुसातील ध्वनी, कफाचे आवाज यांचे बारकाईने परीक्षण करणे आवश्यक आहे. हृदय विस्तृती, कफाचा ‘कुई-कुई’ आवाज किंवा तार यामुळे उपचारांची दिशा निश्चित करता येते. आमाशय व पक्वाशय यांचा नाद बोटाने तपासावा. जीभ व पोट तपासून मलावरोधाचा संभव लक्षांत घेता येतो. घसा, नाक, गळा यांच्या तपासणीवरून सर्दी, पडसे, खोकला ही कारणे लक्षात घेता येतात. शरीराचे वजनांची नोंद करून क्षयाच्या कारणांचा विचार करता येतो. तापमान बघून क्षयाची निश्चिती करावयास सोपे जाते.
छातीतील वेदनांचे लक्षण संचारी आहे का? हे प्रथम ठरवून वायू हे कारण आहे का नाही? हे ठरविता येते. सर्दी, पडसे, खोकला यांची निश्चिती करून कफावरची योजना करता येते. थोडय़ाशा विश्रांतीने बरे वाटते का नाही हे ठरवून श्रमश्वासाचा उपचार करता येतो. पूर्ण विश्रांतीच्या यशाने हृद्रोगाची निश्चिती व त्याप्रमाणे पुढील उपचारांची दिशा ठरविता येते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. प्रेमात पडणे
‘प्रेमात पडणे’ हा वाक्प्रचारच मुळी विचित्र आहे. कोणीतरी उभा असतो आणि तो पडतो असे काही होते की काय? रस्त्यावर चालताना केळीच्या सालावर पाय पडून एखादा घसरला तर त्याला एक तर थोडेफार लागते, पण त्याहून जास्त संकोचाने त्याचे मन लाजते. तसे हे प्रेमात पडणे नसते. संकोच करणाऱ्या व्यक्ती मनातल्या मनात झुरतात. माणूस प्रेमात पडतो तेव्हा ज्या अहंकाराच्या जोरावर जो ‘मी’ म्हणून उभा असतो तो अहंकार तो गुंडाळून ठेवतो आणि दुसऱ्याला किंवा दुसरीला मनातल्या मनात किंवा उघडपणे अशी कबुली देतो की, आता माझे तुझ्याशिवाय होत नाही.
मी आई-बाप, भाऊ-बहीण अशा प्रेमाबद्दल बोलत नाही आहे तर नाते नसलेल्या स्त्री-पुरुष संबंधांबद्दल लिहितो आहे. या प्रेमात कितपत चिरंतन सत्य असते? की एक वयोमानाप्रमाणे उद्भवलेली रासायनिक जैविकता असते? प्रेमविवाह हल्ली वाढत चालले आहेत, पण ठरवून केलेल्या लग्नात ज्यात साधी तोंडओळखही नसते तिथे हे प्रेम कधी आणि कसे जडते?
हल्ली अमेरिकेहून मुलगा येतो. चार मुली पाहतो. त्यातली एक पसंत करतो. घाईघाईत लग्न उरकतात. मग मुलगा परत जातो. वधू व्हिसाची वाट पाहते. हल्ली उलटेही होऊ शकते. मुलीला ग्रीन कार्ड असेल तर ती आपले स्वयंवर मांडते. त्या काळात चार-पाच दिवस किंवा एक-दोन आठवडे ओळख झालेल्या या वराच्या आणि वधूच्या मनात एकदम चिरंतन प्रेम उद्भवते की हे लग्न अनुभवावर आधारित आणि व्यवहाराला साजेशी अशी एक सोय असते.. ज्याचे रूपांतर पुढे प्रेमात होईल, असा आडाखा बांधला जातो?
असे तर नाही ना की, प्रेम या कल्पनेबद्दल आपले विचार अतिरेकी असतात. उलट प्रेम, जगावेगळे प्रेम या गोष्टी निरंतर असतात की तात्पुरत्या? स्पिनोझ नावाचा तत्त्वज्ञानी म्हणतो, “passions are mere passages emotions mere motions”.भावनांना कणभर चुळबुळ किंवा खळबळ म्हणणारा हा तत्त्वज्ञानी शुष्क होता की वास्तववादी. हे सगळे तत्त्वज्ञान खरे असले तरी माणसांचे पोषण भावनांवरच होते, हेही १०० टक्के खरे आहे आणि स्त्री-पुरुषांमधील एकमेकांबद्दलची ओढ ही एक आदिम गोष्ट आहे. याच्यातूनच मुलं होतात आणि आई तयार होते. तेव्हा आईच्या प्रेमाचे कितीही गोडवे गायले तरी आईपण ही घटना आणि तिचे आपल्यावरचे प्रेम हे आदिम नाही, हे मान्य करावेच लागते आणि ते दुय्यम ठरते. प्रेमाचे भरते येते, असा एक वाक्प्रचार आहे. भरतीनंतर ओहोटी लागते, असा एक नैसर्गिक नियम आहे. जर समाधानाने जगायचे असेल तर आधी भरते आटोक्यात ठेवलेले बरे.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २१ फेब्रुवारी
१९०७ > राजकवी रा. अ. काळेले यांचा जन्म. ‘वाग्वसंत’, ‘ओळखीचे सूर’, ‘भावपूर्णा’, ‘वसंतागम’, ‘रूपमती’ आदी काव्यसंग्रह तसेच ‘नवे अलंकार’, ‘तांबे : एक अध्ययन’, ‘नवकवितेचे एक तप’ आदी समीक्षाग्रंथही त्यांनी लिहिले.
१९०८ > कायदेविषयक मार्गदर्शनपर पुस्तके लिहून पुढे ज्ञानेश्वरीचे विवेचन करणारे ‘अमृतज्ञानेश्वरी’ हे पुस्तकही लिहिणारे राम केशव रानडे यांचा जन्म. एकंदर २४ पुस्तके त्यांच्या नावावर आढळतात.
१९३१ > प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक व अभ्यासक डॉ. वसंत दामोदर कुलकर्णी यांचा जन्म. उस्मानिया विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम. ए. झाल्यावर तेथेच प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. ‘मराठी स्वाध्याय संशोधन पत्रिके’चे संपादक म्हणूनही याच काळात त्यांनी काम केले. महानुभाव पंथ व त्यांचे वाङ्मय हा त्यांचा विशेष अभ्यासविषय. महानुभाव कवी डिंभमुनी कृष्णदास यांचे चार ग्रंथ व दामोदर पंडितांची ‘चौपद्या’ यांसह प्राचीन मराठी काव्यग्रंथांच्या संहितांचे संपादन त्यांनी केले
१९३२ > विनोबा भावे यांची ‘गीता प्रवचने’ धुळय़ाच्या तुरुंगात दर रविवारी सुरू झाली. पुढे ही १८ प्रवचने ग्रंथरूप झाली. १९ जूनपर्यंत दर रविवारी ही प्रवचने सुरू होती.
– संजय वझरेकर