जपानी कृषितज्ज्ञ मसानोबु फुकुओका यांनी जपानमधील आपल्या स्वत:च्या शेतातले तण आटोक्यात आणण्याची एक विशेष कृषिपद्धती शोधून काढली, पण ती नीट समजून न घेता, ‘फुकुओका म्हणतात की शेतात खुरपण करू नका’ अशा प्रकारचा अपप्रचार करून भारतात त्यांचे शिष्य म्हणविणारे काही लोक शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत.
फुकुओका हे उन्हाळ्यात भाताचे पीक घेत. भाताचे पीक पाण्याने भरलेल्या खाचरातच लावले पाहिजे, असा काही नियम नाही. फुकुओका हे खाचरातच भात लावीत, पण ते पाण्याने न भरता त्याला फक्त जमीन ओली राहील एवढेच पाणी देत. त्यात तण उगवले की तण लहान असतानाच ते खाचर पाण्याने भरीत, जेणेकरून त्यातले तण पाण्याखाली दबून मरून जाईल. तण मरून गेले की ते खाचरात भरलेले पाणी सोडून देत. या युक्तीमुळे हातात खुरपे घेऊन भातातले तण काढणे ही क्रिया त्यांना टाळता येई. भातानंतर ते गहू किंवा बार्लीचे पीक घेत. यासाठी शेतात भात उभे असताना त्याच्या कापणीपूर्वीच ते त्यात गहू किंवा बार्लीचे बी टाकीत.
आपण पीक म्हणून लावीत असलेल्या वनस्पतींचे बी दुसऱ्या वनस्पतींच्या सावलीत किंवा पूर्ण अंधारातही रुजून येते, पण तणाचे बी मात्र अन्य वनस्पतींच्या सावलीत किंवा अंधारात रुजून येत नाही. त्यामुळे पूर्ण वाढलेल्या भाताच्या उभ्या पिकात टाकलेले गहू किंवा बार्लीचे बी रुजून त्याची रोपे लगेच वाढूही लागतात, पण जोपर्यंत भात उभे आहे तोपर्यंत त्यात तण वाढत नाही. भाताची कापणी केल्यानंतर एरव्ही या शेतात तण उगवून आले असते, पण आता तिथे गहू किंवा बार्लीची रोपे आधीच उभी असल्याने त्यांच्या सावलीत तणाचे बी कमी प्रमाणात उगवते आणि शिवाय तोपर्यंत चांगली थंडी पडू लागल्याने मागाहून रुजून येणारे तण गहू-बार्लीशी स्पर्धाही करू शकत नाही.
तणांचा बंदोबस्त करण्याची ही पद्धती केवळ जपानसारख्या वातावरणात आणि तांदूळ-गहू या पीकक्रमातच उपयोगाची आहे. महाराष्ट्रातल्या पिकांमध्ये ही पद्धती उपयोगाची नाही.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा