डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारुण्य हा प्राण्याच्या आयुष्याचा सुवर्णकाळ आहे. जैविकदृष्टय़ा याच वेळी तो सर्वात सामथ्र्यशाली असतो. त्याच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली असते आणि वंशसातत्य कायम ठेवणे हे आता त्याचे ध्येय असते. सर्व प्राण्यांत लैंगिक क्रीडांची इच्छा याच वयात होते. त्यासाठी ते जोडीदार शोधतात. पक्षी विविध आवाज काढतात; कुत्रे, बैल एकमेकांशी झुंजतात. अन्य सारे प्राणी भूक लागते त्याच वेळी खातात. त्याचप्रमाणे  त्यांचा जोडीदार शोधण्याचा काल ठरलेला असतो. शरीरातील रसायनानुसार तो ठरतो. माणसाचे मात्र तसे नाही. उत्क्रांतीमध्ये त्याचा मेंदू अमूर्त विचार करू लागला त्यामुळे तो कल्पना करू शकतो.  त्यामुळेच तो केवळ भुकेसाठी खात नाही,चवीच्या सुखासाठीही खातो. वंशसातत्य ठेवायचे नसतानाही जोडीदार शोधतो. कल्पनाशक्ती असल्याने माणूस अनेक प्रयोग करतो, वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबसंस्था ही अशीच एक कल्पना आहे. वंशसातत्य कायम ठेवायचे असेल तर तान्ह्या बाळाचे कुणी तरी संरक्षण करावे लागते. त्यासाठी कुटुंब आवश्यक असते. त्यामध्ये तो खायला मिळवतो, ती बाळाची काळजी घेते. असे अनेक वर्षे चालले. पण वंशसातत्य ठेवायचेच नसेल तर कुटुंब कशाला हवे, एकच व्यक्ती आयुष्यभराची जोडीदार म्हणून तिच्याविषयी काहीच माहिती नसताना कशासाठी ठरवायची, या विचारातून लिव्ह इन रिलेशनशिप हा वेगळा प्रयोग माणूस करू लागला. काही ठिकाणी कम्यून्सचे प्रयोगही झाले, अजूनही होताहेत. कायमचा जोडीदार नको पण वंशसातत्य हवे म्हणून सिंगल पेरेन्टिंगचे प्रयोगही काहीजण करतात. समागम वंशसातत्य ठेवण्यासाठी नाही तर केवळ सुखासाठी असेल आणि हे सुख समलिंगी व्यक्तीसोबत अधिक मिळत असेल तर तशीही कुटुंबे आता होत आहेत. त्यांना कायदेशीर मान्यताही अनेक देशांत मिळत आहे. अन्य प्राण्यांच्या व्यवस्था- म्हणजे माकडांच्या किंवा हत्तीच्या टोळ्या, सुगरणीचे घरटे आणि कुटुंब, मधमाश्यांचे पोळे- हे हजारो वर्षांपूर्वी जसे होते तसेच राहते. माणूस मात्र व्यवस्था बदलतो. कारण अन्य प्राणी त्यांच्या आयुष्याचा अर्थ वगैरे विचार करीत नाहीत. माणूस मात्र विचार करतो, स्वत:ची मूल्ये निश्चित करतो, त्यानुसार निर्णय घेतो. माणसाला त्याच्या मूल्यांचा विचार करायला प्रेरित करणे हा आधुनिक मानसोपचारातील एक महत्त्वाचा भाग आहे.