फ्लोरेन्समधील प्रबोधन पर्वातील एक अद्वितीय शिल्पकार, वास्तुविशारद, चित्रकार म्हणून मायकेल अॅन्जेलोची (इ.स.१४७५ ते १५६४) ख्याती आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी तो दाखल झाला. डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यात मायकेलने विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढय़ आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले. लॉरेन्झ याचा वरदहस्त इ.स.१४८९ ते १४९२ या काळात लाभल्यामुळे मायकेलचा संबंध विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. ‘बॅटल ऑफ लॅपीत्झ’ हे मायकेल अॅन्जेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प. मायकेलने आपल्या आयुष्यात असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापकी व्हॅटिकनमधील ‘पिएटा’, ‘डेव्हिड’, ‘टुम्ब ऑफ लॉरेन्झी डी मेदिची’, ‘डे अॅण्ड नाइट’, ‘डस्क ऑफ डॉन’ ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. मायकेल अॅन्जेलोच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे. १५३४ साली मायकेल रोममध्ये वास्तव्यास आल्यावर वास्तुशिल्पकलेतील त्याची श्रेष्ठता सिद्ध झाली. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे पोप पॉल तिसऱ्याच्या आग्रहाखातर मायकेल अॅन्जेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. या चर्चवरील प्रसिद्ध घुमटाचा आराखडा मायकेलने फ्लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथ्रेडलचा अभ्यास करून केला. या चर्चमधील सिस्टाईन चॅपेलच्या छतावरील अजरामर चित्रकृतींमुळे तर मायकेल दन्तकथाच बनलाय! या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने रंगविलेल्या या ३०० मानवाकृती केवळ अद्भुतच! या छताशिवाय मायकेलच्या ‘द लास्ट जजमेंट’, ‘क्रुसीफिकेशन ऑफ सेंट पीटर्स’ आणि ‘कन्हर्शन ऑफ सेंट पॉल’ या चित्रकृती अजरामर ठरल्या.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
राष्ट्रीय पुष्प : कमळ
राष्ट्रीय पुष्पे ही त्या देशाची मानचिन्हे किंवा प्रतीके असतात. त्यांची निवड करताना पौराणिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक पाश्र्वभूमी असू शकते. तसेच त्यामागे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या काही परंपराही असू शकतात. काही इतर कारणे त्या देशाशी निगडित असतात. अमुक एका कारणाने त्या मानचिन्हाची निवड केली जाते, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. कित्येक वेळा एकच पुष्प अनेक राष्ट्रांचे मानचिन्ह असू शकते. गुलाब हे इंग्लंड आणि अमेरिकेप्रमाणेच इतर अनेक राष्ट्रांचे राष्ट्रीय फूल आहे. आपल्या देशाचे राष्ट्रीय पुष्प कमळ आहे. कमळ निवडताना त्याचे कला संस्कृती आणि प्राचीन भारतीय पुराणातील स्थान, त्याच्याभोवती असलेले पावित्र्याचे वलय, शिवाय त्याची औषधी उपयुक्तता यांचाही विचार केला गेला असावा. भारताप्रमाणेच व्हिएतनाम या देशाचेही ते राष्ट्रीय फूल आहे. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. मात्र तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.
साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती १-१.५ मी. उंच आणि समस्तरीय ३ मी.पर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते म्हणून त्याला मूलक्षोड म्हणतात. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. मुख्यत: गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कमळ आपल्याकडे आढळतात. कमळाचे खोड, पान आणि बी यांचा वापर खाण्यासाठी करतात. रीबोफ्लविन, नियसिन ही ‘ब’ जीवनसत्त्वे, ‘क’ आणि ‘इ’ जीवनसत्त्वे कमळात असतात. फुले स्तंभक असून पटकी व अतिसारावर गुणकारी आहेत. मुळांची भुकटी मूळव्याध, अमांश, अग्निमांध्य इत्यादींवर गुणकारी असून नायटासारख्या त्वचा रोगावर लेप म्हणून लावतात.
डॉ. किशोर कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org