मूळ रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मिलानसहित इटलीच्या बऱ्याच प्रदेशांवर युरोपातील हूण, व्हिसगोथ वगरे टोळ्यांचा धुमाकूळ चालला. त्यात शेवटी लोंगोबार्ड्स जमातीने इ.स. ५६९ ते ७७४ अशी दोन शतके मिलान आणि आसपासच्या प्रदेशांवर राज्य केले. लोंगोबार्ड्स जमातीवरूनच या प्रदेशाला लोम्बार्डी हे नाव पडले. याच काळात इटली आणि युरोपातील अनेक राज्यांनी ‘पवित्र रोमन साम्राज्य’ हा वेगळा समूह स्थापन केला होता. या समूहातील फ्रँक राजा शार्लमेन याने ७७४ साली लोम्बार्डी आणि मिलानवर आपला ताबा बसवला. दक्षिण आल्प्स पर्वतरांगा आणि पो नदीच्या खोऱ्यामधील पठारावर मिलान वसल्यामुळे तिथल्या व्यापार आणि उद्योगधंदे विस्ताराला नसíगक मदत मिळाली. त्यामुळे मिलानची उद्योजकता आजतागायत टिकून आहे. बाराव्या शतकाच्या मध्यावर जर्मन सम्राट आणि इटालियन लोम्बार्ड लीग यांच्यात संघर्ष होऊन इटालियन विजयी झाले. मिलानमध्ये व्यापार आणि इतर व्यवसायांच्या गिल्ड्स तयार झाल्या. गिल्ड्सच्या लोकांनी १२५९ साली मार्टनिो टोरे याला मिलानचे नेतृत्व देऊन सर्व कारभार त्याच्यावर सोपविला. मार्टनिोने मिलानवर आपली पकड बसवून स्वत:ला हुकूमशहा घोषित केले. त्याने अनेक चांगली कामे केली. या काळात शस्त्रास्त्रे आणि लोकर यांच्या उत्पादनावर आणि व्यापारावर मिलान संपन्न झाले; परंतु पुढे मार्टनिोच्या धोरणांमुळे राज्याची आíथक घसरण होऊन यादवी सुरू झाली. या गोंधळावर उपाय म्हणून पोपने मार्टनिोला पदच्युत करून ओटोन विसकोंती याच्याकडे मिलानचे नेतृत्व सोपविले. इ.स. १२७७ ते १४५० या काळात मिलान आणि लोम्बार्डी प्रांतावर विसकोंती घराण्याची सत्ता होती. या काळात फ्लोरेन्स आणि व्हेनिस या व्यापारी राज्यांबरोबर शस्त्रास्त्रे, लोकर आणि रेशीम यांच्या व्यापाराबाबत जशी मिलानची स्पर्धा चालत असे तशीच स्पर्धा त्यांच्याबरोबर कलेच्या क्षेत्रातही चालत असे. विशेषत: दागिने आणि उंची वस्त्रे यांच्या व्यापारात मिलानने फ्लोरेन्स आणि व्हेनिसवर बाजी मारली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com 

 

 

खाजण परिसंस्थेचे महत्त्व

खाजण परिसंस्थांचे महत्त्व दोन प्रकारचे आहे.

१. स्थानिकांसाठी २. भौगोलिक क्षेत्रासाठी, विशेषत: पर्यावरणीय कारणास्तव.

१. खाजणक्षेत्रात वृक्षराजी दाटीने वाढते. सदाहरित झाडांच्या सावलीत उन्हाचा त्रास होत नाही आणि पृथ्वीच्या उबदार पट्टय़ात थंडीचा प्रश्नच नसतो. खाडी आणि नदीच्या पाण्याचे क्षारमूल्य सागराच्या पाण्यापेक्षा कमी असते. मुळाच्या दाटीमुळे पाऊस-पाण्याबरोबर येणारा आणि वननिर्मित सेंद्रिय कचरा समुद्राकडे न वाहता तेथेच अडकून राहतो, कुजतो. विघटनामुळे प्राण्यांसाठी भरपूर अन्ननिर्मिती होते. या अन्नावर कृमी, िशपले, कालवे, कोलंबी, खेकडे असे अनेक प्राणी जगतात. ऊन आणि सागरी लाटांपासून संरक्षित क्षेत्रात सागरी माशांची पिले येथे जन्मतात आणि वाढतात. मोठी अन्नसाखळी निर्माण होते. एक अत्यंत समृद्ध अशी परिसंस्था अस्तित्वात येते. या परिसंस्थेमुळे स्थानिक मनुष्यवस्तीला उत्तम प्रथिनयुक्त अन्न मिळते आणि आíथक फायदा होतो. याशिवाय तिवर-कांदळ अशा झाडांपासून जळणासाठी लाकूड-फाटा, गुरांसाठी पालवी-अन्न, औषधे, मध, सालीपासून टॅनिन इत्यादी उत्पादने मिळतात. बांधकामासाठी तिवर, कांदळ, चिर्पी यांचे खांब उपयोगी पडतात.

२. खाजण वनांमुळे सागरावरून येणाऱ्या वाऱ्या-वादळापासून किनाऱ्यावरील खेडय़ांचे आणि शहरांचे संरक्षण होते. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या मते ओडिशाच्या किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीपासून रक्षण होण्यास भितर्कर्णिका खाजणक्षेत्राचे योगदान मोठे ठरले. किनारी प्रदेशातील शेतीला खाजण वनाची संरक्षक िभत महत्त्वाची असते.

पावसा-पाण्यामुळे जमिनीची धूप होते. खाजण वने माती आणि कचरा खाडीत जाऊ देत नाहीत. खाडी दळणवळणासाठी सुरक्षित राहते. कधी-कधी खाजणात सतत साचल्या गेलेल्या गाळामुळे जमिनीचे क्षेत्र वाढते. ताज्या आकडेवारीप्रमाणे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यात १४.९६ चौ. किलोमीटर जमिनीची भर पडली आहे.

नवीन कायद्याप्रमाणे खाजण वने संरक्षित आहेत. कायद्याचे पालन केल्याने अवनत झालेली खाजण वने सुधारली आहेत. माहीम-वांद्रे येथील १ ते १.५ मीटर उंच खुरटी तिवरे गेल्या वीस वर्षांत ७-८ मीटर उंच झालेली दिसतात ते त्यांना संरक्षण मिळाल्यामुळे. रत्नागिरी-आचरा येथील कांदळ १०-१५ मीटर उंच आहेत. अंदमानच्या चिडियाटापू येथील झाडे तर २५ मीटर उंच आहेत. संरक्षण मिळाले तर सर्व खाजण वने सर्व दृष्टीने फायदेशीर ठरतील.

– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org 

 

 

 

Story img Loader