या यंत्रामध्ये कापसावर केली जाणारी प्रक्रिया ही सौम्य असते. यासाठी या यंत्रामध्ये दोन रुळांच्या भरवणी यंत्रणेचा उपयोग केला जातो. सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये वापरण्यात येणारा आघातक हा पोकळ व कमी वजनाचा असून त्यावरील दांडेसुद्धा पोकळ असून संख्येने कमी असतात. आघातकाची फिरण्याची गतीसुद्धा कमी असते (सुमारे ४०० ते ६०० फेरे प्रति मिनिट).
सौम्य उकलकाची प्रक्रिया फारशी तीव्र नसल्यामुळे या यंत्रात कापूस फार मोठय़ा प्रमाणावर सुटा किंवा मोकळा केला जात नसला तरी कापसातील कचरा मात्र फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो.
एखाद्या यंत्रास पुरविलेल्या कापसामध्ये जो कचरा असतो त्यापकी किती टक्के कचरा ते यंत्र काढून टाकते त्यास त्या यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता असे म्हणतात. सौम्य स्वच्छक यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता सुमारे २५% ते ३५% इतकी असते. खरे म्हणजे कापसात जो कचरा असतो तो, कापसाचे गठ्ठे किंवा पुंजके सल किंवा मोकळे केल्याशिवाय, सुटा होत नाही. परंतु कापसातील कचऱ्यापकी काही कचरा हा माती, वाळू, दगड, कापसाच्या बिया अशा स्वरूपात असतो. अशा प्रकारचा कचरा कापसाच्या तंतूंबरोबर गुंतत नाही. त्यामुळे कापूस थोडासा सल करून तो जोराने हलविल्यास अशा प्रकारचा कचरा खाली पडतो. हीच प्रक्रिया सौम्य स्वच्छकाच्या बाबतीत घडते आणि कचरा फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो. कापसापासून वेगळा केला गेलेला कचरा बाजूला करण्यासाठी आघातकाच्या खालील बाजूस आघातकाच्या परिघाशी समांतर अशी दांडय़ाची जाळी बसविलेली असते. त्यामधून सुटा झालेला कचरा खाली पडतो. या यंत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा खाली पडत असल्यामुळे त्या कचऱ्याला पुरेशी जागा देण्यासाठी दांडय़ाच्या जाळीचे आकारमानही मोठे असते. आघातकाच्या परिघाच्या सुमारे ६०% ते ७०% जागा ही दांडय़ाच्या जाळीने व्यापलेली असते. काही सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये दोन किंवा अधिक आघातक वापरण्यात येतात. यामुळे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा मिळते. काही स्वच्छक यंत्रात वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे कापूस आघातकाच्या सभोवार दोन ते तीन वेळा फेरे घेतो. साहजिकच तो दांडय़ाच्या जाळीवरून तितक्याच वेळा जातो. याप्रमाणे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा व अवधी मिळतो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा