नेपोलियनच्या वॉटर्लूतील पराभवानंतर त्याच्या इम्पिरियल आर्मीतील बेकार झालेले अनेक सनिक लाहोरच्या महाराजा रणजीतसिंग यांच्याकडे सन्यदलात नोकरीस आले. त्या युरोपियन लोकांचा चांगला अनुभव आल्यामुळे राज्याच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही महाराजांनी युरोपियन आणि अमेरिकन लोकांची नियुक्ती केली. अशा परकीय कर्मचाऱ्यांची संख्या शंभराहून अधिक झाली. त्यापकी सन्यदलातील ३२ लोक फ्रेंच, इटालियन, अमेरिकन होते.

या सर्व परकीय लोकांपकी क्लाऊड कोर्टची (फ्रेंच उच्चार क्लोद कूर)तंत्रज्ञानातील गती पाहून महाराजांनी त्याच्याकडून अद्ययावत तोफदलाची उभारणी करून त्याला जनरल पदावर बढती दिली. पुढे हरहुन्नरी क्लाऊडने महाराजांच्या प्रोत्साहनाने लोखंडी तोफा बनवण्यासाठी लोखंडाचे ओतकाम करण्याची फाऊंड्री सुरू करून संपूर्ण तोफांचे उत्पादन सुरू केले.

या कामाबद्दल महाराजांनी त्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यापाठोपाठ क्लाऊडने लाहोरात तोफगोळ्यांचे उत्पादन सुरू केले. तोफ आणि तोफगोळ्यांच्या पहिल्या यशस्वी चाचणीनंतर महाराजांनी क्लाऊडला पाच हजारांचे बक्षीस देऊन त्याचे वेतन २५०० रु. केले आणि त्याला जहागिरी दिली! तसेच फौज-ए-खालसाच्या ऑर्डनन्स ऑफिसर या पदावर कायम केले.

क्लाऊड कोर्टला लाहोरला आल्यानंतर दक्षिण आशियातील प्राचीन नाणी जमा करण्याचा नवा छंद लागला. पेशावरच्या परिसरात डोंगराळ प्रदेशात अज्ञात असलेले बौद्ध स्तूप, बुद्ध मूर्ती आणि काही अवशेष शोधून काढण्यात क्लाऊडचा मोठा वाटा होता. क्लाऊडकडे जमलेला मोठा नाणेसंग्रह पुढे त्याच्या मुलाला आणि मुलाने ब्रिटिश सरकारला दिला. सध्या हा संग्रह लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

महाराजा रणजीतसिंग यांच्या मृत्यूनंतरही क्लाऊड फौज-ए-खासमध्ये राहिला; परंतु पुढे महाराजा शेरसिंग याचा खून झाल्यावर तो फिरोजपूर येथे जाऊन ब्रिटिशांकडे फौजेत सामील झाला. क्लाऊड कोर्टने सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्यातली एक तोफ ब्रिटिशांनी अभ्यासासाठी कलकत्त्यास नेली होती!

क्लाऊडने एका पंजाबी स्त्रीशी विवाह केला. त्यांना चार मुलेही होती. या निष्ठावंत फ्रेंच सनिकाचा मृत्यू १८८० मध्ये पॅरिस येथे झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com