डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपले मन नेहमी विचारात भरकटत असते, त्याला अधूनमधून वर्तमान क्षणात आणणे आवश्यक असते. त्याक्षणी ऐकू येणाऱ्या आवाजावर किंवा शरीराला जाणवणाऱ्या स्पर्शावर ‘ध्यान’ दिले, की मन वर्तमान क्षणात येते. ज्ञानेंद्रिये नेहमी त्या क्षणात जे काही घडते आहे, त्याची माहिती देत असतात. आपले ध्यान त्यावर आणणे, हा ‘माइंडफुलनेस’चा पहिला व्यायाम असतो.

माइंडफुलनेस म्हणजे सजगता. इंग्रजीत ‘टु माइंड’ हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ ‘लक्ष देणे’ असा आहे. लोकलमधून प्रवास करणारे सारेजण प्रत्येक स्थानकावर ‘माइंड दी गॅप’ ही उद्घोषणा ऐकतात; त्यामध्ये हे क्रियापद वापरलेले आहे. त्याचा उद्देश गाडीत चढताना आणि उतरताना माणसांना सजग करण्याचाच आहे.

माणूस सजग असतो, त्या वेळी त्याला परिसराचे भान असते. संमोहित अवस्थेत असे भान कमी झालेले असते. त्या दृष्टीने संमोहन आणि सजगता या जागृतीच्या ‘स्पेक्ट्रम’च्या दोन टोकांच्या अवस्था आहेत, असे म्हणता येईल. मात्र या दोन्ही अवस्था येण्यासाठी आणि अधिक काळ राहण्यासाठी मेंदूला सराव द्यावा लागतो. या सरावाला ध्यानाचा अभ्यास म्हणता येईल. एकाग्रता ध्यानाची परिणिती ‘ट्रान्स’सदृश भारित स्थितीत होते. सजगता वाढवण्यासाठी मात्र समग्रता विकसित करणारे ‘साक्षी ध्यान’ आवश्यक असते.

या साक्षी ध्यानाचा पहिला टप्पा म्हणजे लक्ष पुनपुन्हा वर्तमान क्षणात आणायचे. आपण काही काम करीत असू, तर त्यावर लक्ष आणायचे. अन्यथा परिसरावर, समोरील दृश्यावर, आवाजावर, स्पर्शावर लक्ष आणायचे. असे लक्ष आणले तरी ते फार वेळ वर्तमान क्षणात राहत नाही. मनात विचार येऊ लागतात. असे विचार येणे स्वाभाविक आहे; विचारांची निर्मिती हेच मेंदूचे एक महत्त्वाचे काम आहे. मात्र, आत्ता आपले लक्ष वर्तमान क्षणात नाही हे लक्षात येणे हेदेखील मेंदूतील ‘डोर्सोलॅटरल प्री-फ्रण्टल’ या भागाचे काम आहे. आपले लक्ष विचलित झाले आहे याचे भान येते, त्या वेळी हे केंद्र सक्रिय झालेले असते. म्हणूनच या भागाला ‘अटेन्शन सेंटर’ म्हणतात.

लक्ष वर्तमान क्षणात नाही, मन विचारात भरकटले आहे याचे भान येईल त्या वेळी ध्यान पुन्हा वर्तमान क्षणात आणायचे. असा सराव पुनपुन्हा केल्यास मेंदूतील हे केंद्र विकसित होते आणि ‘अटेन्शन’ सुधारते, असे संशोधनातून दिसत आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mindfulness alertness and brain zws