डॉ. यश वेलणकर
व्यवहारात खूप यशस्वी आणि मोठय़ा पदावर असलेल्या व्यक्तींनी साक्षीध्यान, माइंडफुलनेस शिकून घेणे अतिशय आवश्यक आहे. ही माणसे अनेकांना प्रेरणा देणारी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीत आत्मविश्वास असतो. त्यामुळेच ते यशस्वी झालेले असतात, उच्च पदावर पोहोचलेले असतात. काही जणांच्या स्वत:च्या कंपन्या असतात, व्यवसाय असतो. व्यवसायवृद्धीसाठी सतत सकारात्मक मानसिकता ठेवणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अनुभवलेले असते. असे असले तरी, माणसाचा मेंदू नकारात्मकतेकडे झुकलेला असल्याने त्यांच्या मनातही अपयश-अपमानाच्या काही आठवणी असतात. मनाला असंख्य जखमा झालेल्या असतात. माणूस कितीही श्रीमंत, यशस्वी, उच्चपदस्थ असला, तरी आंघोळ करताना तो सारे कपडे काढून शरीर स्वच्छ करतो. एखादी छोटी पुळी असेल तर तिला औषध लावतो. मात्र हे शरीरासाठी करायला हवे तसेच मनासाठीही करायला हवे, याचे भान या माणसांना नसते.
चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे स्मित असले, तरी मनात अनेक जखमा सांभाळत ही माणसे वावरत असतात. त्यांच्या मनात कधी भीतीचे, उदासीचे विचार येतच नाहीत अशी प्रतिमा त्यांनी इतरांसाठी केलेली असली, तरी ही प्रतिमा खरीच आहे असे त्यांनाही वाटू लागते. त्यामुळे अशा विचारांना नाकारणे, त्यांचे दमन करणे आपल्याला शक्य झाले आहे, असे ते समजू लागतात. पण मनाच्या साऱ्या जखमा दुर्लक्ष करून बऱ्या होत नाहीत. सुप्तावस्थेत त्या साठून राहतात आणि मायग्रेन, हायपरटेन्शन असे शारीरिक व्याधी वा चिडचिडेपणा, सिगरेट, अल्कोहोल यांचे व्यसन, बेभान वागणे अशा मार्गाने कधीना कधी त्रास देतात.
मनातील या जखमा दुसऱ्यासमोर उघडय़ा करणे अशा व्यक्तींच्या प्रतिमेला धक्का देणारे असते. त्यामुळे ही माणसे समुपदेशकाची मदतही घेत नाहीत. तो त्यांना त्यांचा दुबळेपणा वाटतो. अशा परिस्थितीत माइंडफुलनेसचा सराव खूप उपयुक्त आहे. यात मनात येणाऱ्या विचारांना नाकारायचे नसते. त्यांना प्रतिक्रिया न करता, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या शरीरातील संवेदना स्वीकारायचा सराव केला की मनाची आंघोळ होते. यात मनातील विचार दुसऱ्या व्यक्तीला सांगणे आवश्यक नसल्याने ‘प्रेरणादायी व्यक्ती’ या त्यांच्या प्रतिमेलादेखील धक्का बसत नाही. मनाची अशी स्वच्छता रोज करणे सर्वागीण स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे.
yashwel@gmail.com