– डॉ. अजित वर्तक
माणसाला माहिती असणाऱ्या खनिजांची संख्या सुमारे साडेपाच हजारांवर आहे. तथापि ही सर्वच खनिजे आपल्यासाठी उपयुक्त असतीलच असे नाही. काही खनिजे धातूंच्या उत्पादनासाठी वापरली जातात अशा खनिजांना धातुके (ओअर्स) म्हणतात.
जी खनिजे औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची आहेत, परंतु कोणत्याही धातूच्या उत्पादनासाठी वापरली जात नाहीत त्यांना अधातू खनिजे म्हणतात. दगडी कोळसा, अॅसबेस्टॉस, चुनखडी, जिप्सम, सैंधव (रॉक सॉल्ट) ही आणि अशी अनेक खनिजे अधातू खनिजांची उदाहरणे म्हणून सांगता येतील.
अधातू खनिजांपैकी एक महत्त्वाच्या खनिजांचा गट म्हणजे अभ्रक गट (मायका ग्रुप). अनेक विद्युत उपकरणांमध्ये चांगली गुणवत्ता असणाऱ्या अभ्रकाचा उपयोग केलेला असतो. अभ्रक गटातल्या एका खनिजाचे नाव आहे बायोटाइट. बॅप्टिस्ट बायोट (१७७४झ्र१८६४) नावाचे एक विख्यात फ्रेंच वैज्ञानिक होऊन गेले. गणित, भौतिकी, खगोलविज्ञान या विषयांमध्ये तर त्यांना गती होतीच; पण खनिजांच्या प्रकाशीय गुणधर्मांच्या अभ्यासातही त्यांना विशेष रुची होती. त्यांच्या सन्मानार्थ योहान हाउसमान यांनी १८४७ मध्ये या खनिजाला बायोटाइट असे नाव दिले.
डॉ. बंगलोर पुट्टय्या राधाकृष्ण (१९१८झ्र२०१२) हे विख्यात भारतीय भूवैज्ञानिक होते. त्यांच्या नावावरून एका खनिजाला ‘राधाकृष्णाइट’ असे नाव देण्यात आले आहे. कर्नाटकातल्या कोलारच्या सोन्याच्या खाणीतल्या खडकांवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या एका गटाला या खनिजाचा शोध १९८५ मध्ये लागला. नुकतेच, म्हणजे २०१२ मध्ये हे खनिज रशियामध्येही आढळले. शिसे आणि टेल्युरियम या दोन धातूंचे ते संयुक्त क्लोराइड आणि सल्फाइड आहे.
महाराष्ट्रात जे काळ्या कातळांचे थर सापडतात, ते ज्वालामुखीजन्य खडक आहेत. लाव्हारस थंड होऊन ते निर्माण झाले तेव्हा त्यातून बुडबुडे बाहेर पडले आणि तिथे पोकळ्या तयार झाल्या. कालांतराने त्या पोकळ्यांमध्ये अन्य भूवैज्ञानिक प्रक्रियांनी दुय्यम खनिजे निर्माण झाली. त्यातल्या एक खनिजाचे नाव आहे ह्यूलँडाइट. सुमारे २०० वर्षांपूर्वी जॉन हेन्री ह्यूलँड नावाचे खनिजांच्या नमुन्यांचे एक संग्राहक युरोपात होऊन गेले. त्यांच्या सन्मानार्थ हे नाव त्या खनिजाला देण्यात आले आहे. काळ्या कातळांच्या पोकळ्यांमध्ये हे खनिज खूप मोठ्या प्रमाणात सापडते.
आता मात्र आंतरराष्ट्रीय खनिजवैज्ञानिक संघटनेने (इंटरनॅशनल मिनरॉलॉजिकल असोसिएशन) निर्धारित केलेल्या संकेताप्रमाणे खनिजाला व्यक्तीचे नाव देताना ती व्यक्ती खनिजविज्ञानाशी किंवा खनिजविज्ञानाशी निगडित दुसऱ्या एखाद्या विज्ञानशाखेशी संबंधित असली पाहिजे असे बंधन आहे. इतर क्षेत्रातील व्यक्तीचे नाव खनिजाला देण्याची मुभा नाही.
– डॉ. अजित वर्तक
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org