– डॉ. अजित वर्तक
अमेरिकेतली स्मिथसनाइट इन्स्टिट्यूट ही जगातल्या नावाजलेल्या संशोधन संस्थांपैकी एक आहे. पण एका खनिजवैज्ञानिकाच्या मृत्युपत्राद्वारे आलेल्या संपत्तीतून ही संस्था उभी राहिली, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. ते संशोधक म्हणजे जेम्स स्मिथसन. खनिजविज्ञानाच्या जोडीने त्यांना रसायनविज्ञानातही गोडी होती. काही रसायनांच्या औषधी गुणधर्मांवर त्यांनी संशोधन केले होते.
फार पूर्वीपासून युरोपात कॅलॅमाइन नावाच्या खनिजापासून केलेले मलम आणि द्रावण त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी वापरत. पूर्वी कॅलॅमाइनचे रासायनिक संघटन झिंक कार्बोनेटचे आहे, असे समजले जात असे; परंतु पुढे असे लक्षात आले, की कॅलॅमाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिजात झिंक कार्बोनेट आणि झिंक सिलिकेट असे रासायनिक संघटन असणारी दोन भिन्न खनिजे एकत्रित सापडतात. जेम्स स्मिथसन यांनी या अनुमानावर शिक्कामोर्तब केले. झिंक सिलिकेट हे रासायनिक संघटन असणाऱ्या खनिजाला हेमिमॉर्फाइट असे नाव दिले गेले; तर झिंक कार्बोनेट हे रासायनिक संघटन असणाऱ्या खनिजाला जेम्स स्मिथसन यांच्या सन्मानार्थ स्मिथसनाइट असे नाव देण्यात आले.
स्मिथसनाइट इन्स्टिट्यूटमध्ये भूविज्ञान या विषयाच्या कक्षात खनिजांचे सुमारे सहा लाख, तर जीवाश्मांचे जवळजवळ सव्वाचार कोटी नमुने आहेत. वोल्फगांग मोझार्ट हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेले जगप्रसिद्ध संगीतकार होत. त्यांचा मृत्यू ५ डिसेंबर, १७९१ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूला १९९१ मधे २०० वर्षे पूर्ण झाली. त्याच वर्षी इटलीच्या लिग्यूरिया प्रांतातल्या स्पेत्सिया विभागात एक नवे खनिज सापडले. मँगेनीजयुक्त रूपांतरित खडकांमध्ये ते आढळले. त्या खनिजाचे रासायनिक संघटन मँगेनीज आणि कॅल्शियम यांचे जलयुक्त (हायड्रेटेड) सिलिकेट आहे. त्या खनिजाला मोझार्ट यांच्या स्मरणार्थ मोझार्टाइट असे नाव दिले गेले. कालांतराने ते दक्षिण आफ्रिकेतही मिळाले.
लोहाची अनेक खनिजे आहेत. ती लोखंडाच्या उत्पादनासाठी वापरणे फायदेशीर असतेच असे नाही. ज्या खनिजांतून लोखंड जास्त प्रमाणात मिळेल, अशी मोजकीच खनिजे लोखंड तयार करण्यासाठी वापरली जातात. जी खनिजे धातूंच्या उत्पादनासाठी वापरली जातात, अशा खनिजांना धातुके (ओअर्स) म्हणतात. धातुकांशिवाय ज्यात लोखंडाचा अंश आहे, अशी बाकीची अनेक खनिजे आहेत, त्यातल्या एका खनिजाचे नाव आहे गटेआइट. प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ते जोहान गटे यांच्या सन्मानार्थ हे नाव त्या खनिजाला दिले गेले आहे. गटेआइट हे खनिज अनेक खडकांत आढळते. कोकणात अनेक ठिकाणी जांभा खडक आढळतो. त्यात हे खनिज सापडते.
– डॉ. अजित वर्तक
मराठी विज्ञान परिषद
office@mavipa.org