वितळ कताई प्रक्रिया नायलॉन तंतूंच्या वेळी प्रथमच वापरली गेली. ग्रीन वॉल्ट या संशोधकाने ती विकसित केली. या कताई पद्धतीचे वैशिष्टय़ म्हणजे या कताईसाठी फक्त तंतूचा वितळलेला द्राव वापरला जातो.  इतर कोणत्याही रसायनांची गरज नसते आणि या कताई पद्धतीमध्ये कोणतेही उपपदार्थ बाहेर पडत नाहीत, त्यामुळे प्रदूषणाचा धोका असत नाही. या पद्धतीमध्ये नायलॉन तंतूचा वितळलेला द्राव चांगल्या प्रकारे घुसळून एकजिनसी केला जातो. नंतर हा द्राव तनित्राच्या सूक्ष्म अशा छिद्रांमधून पंपाच्या साहाय्याने मोठय़ा दाबाने बाहेर धारांच्या स्वरूपात बाहेर काढला जातो. या वितळ द्रवधारांच्या रूपातील तंतूंवर थंड हवा सोडून तंतूंचे घनीकरण केले जाते. नंतर आवश्यकतेनुसार या तंतूंना खेच दिली जाते. आणि थोडय़ा प्रमाणात पीळ दिला जातो. या नंतर हे तंतू बॉबिनवर गुंडाळले जातात.
नायलॉन तंतूचे अनेक प्रकार विकसित झाले. उदा. नायलॉन ६,६ , नायलॉन ६, नायलॉन ६,९, नायलॉन ६,१०, नायलॉन ६,१२  नायलॉन ११, नायलॉन १२, नायलॉन आणि नायलॉन ४,६. नायलॉन ६.९चे उत्पादन करताना नोना मिथिलीन डाय-अमाइन आणि अ‍ॅपिडिक आम्ल याचा वापर केला जातो तर नायलॉन ६.१०चे उत्पादन करताना डेका मिथिलीन डाय-अमाइन आणि अ‍ॅपिडिक आम्ल याचा वापर केला जातो. यावरून आपल्या लक्षात येईल की अ‍ॅपिडिक आम्लाचा वापर सामायिक आहे तर डाय-अमाइन मात्र वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात. डाय-अमाइनमधील कार्बन रेणू संख्येनुसार त्या नायलॉनचे नामकरण केले जाते. अर्थात यांपकी नेहमीच्या वापरासाठी नायलॉन ६,६ आणि नायलॉन ६ हे तंतू अधिक प्रचलित आहेत.
नायलॉन ६,१० हा तंतू सामान्यपणे जाड एकेरी तंतूच्या रूपात (मोनो फिलामेंट) बनविला जातो व त्यामुळे विविध प्रकारच्या ब्रशचे केस (ब्रिस्टल्स) बनविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. या तंतूची जलशोषकक्षमता इतर प्रकारच्या नायलॉन तंतूंपेक्षा कमी असते आणि त्यामुळे ओले झाले असता त्यांची ताकद फारशी कमी होत नाही. नायलॉनच्या विविध गुणधर्मामुळे त्याचा वापर अंगावर घालण्याच्या वस्त्रापासून औद्योगिक वापरापर्यंत सर्वत्र केला जातो.
 
संस्थानांची बखर: पतियाळा राज्य स्थापना
दक्षिण पंजाबातील पतियाळा हे स्वातंत्र्यपूर्व काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. अठराव्या शतकात मोगल सत्तेच्या अस्ताला सुरुवात झाल्यावर पंजाबमध्ये काही प्रमाणात प्रशासकीय पोकळी निर्माण झाली. ही पोकळी काही अंशी शीख मिसलदारांनी भरून काढली. मोगल अत्याचाऱ्यांना तोंड देण्यासाठी चार-सहा गावांतील तरुणांचा एक सशस्त्र गट केला जाई. हे लोक गावांमधील इतर समस्यांकडेही लक्ष पुरवीत. अशा गटांना मिसल असे नाव होते तर त्यांच्या प्रमुखाला मिसलदार. पतियाळा येथे यापूर्वी जैसलमेरच्या राज्याचा संस्थापक जैसल याच्या तिसऱ्या पुत्राने आपसातील दुफळीमुळे जैसलमेर सोडून पतियाळा येथे राज्य स्थापन केले होते. पुढे हे राज्य नष्ट झाल्यावर बाबा अलासिंग या शीख मिसलदाराने पतियाळात आपली तीस खेडी अंतर्भूत करून आपले छोटे राज्य स्थापन केले. पुढे त्याच्या वारसांच्या कारकीर्दीत पतियाळा हे एक वैभवशाली, विशाल राज्य म्हणून ओळखले गेले.
अठराव्या शतकाच्या मध्यात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अफगाण, मराठा व मोगल यांच्या आक्रमणांना तोंड देत बाबा अलासिंगने धर्याने तोंड देत पतियाळाचे राज्य विकसित केले. अलासिंगने बांधलेल्या किला मुबारक या किल्ल्याच्या सभोवती गाव वसले, ते आजचे पतियाळा शहर. पतियाळाचे मूळ नाव होते ‘पट-आला’. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर अहमदशाह अब्दालीचे पंजाबवर वर्चस्व होते, दरारा होता, त्यामुळे अलासिंगने त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. अब्दालीने अलासिंगला महाराजा हा किताब देऊन त्याला स्वत:चा वेगळा ध्वज तसेच काही प्रसंगी नगारे वाजविण्याची परवानगी दिली. त्याचा पुढील वारस अमरसिंग यानेही अब्दालीशी चांगले संबंध ठेवले. अब्दाली त्याच्या पुढच्या आक्रमणानंतर परतताना आपल्याबरोबर ३०० तरुण मुली व मुले बंदी बनवून घेऊन जात होता. अमरसिंगने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करून, त्यासाठी दोन लाख रुपये अब्दालीस दिले. त्या मुला-मुलींना सोडवून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचते केले, त्यामुळे अमरसिंगास ‘बंदी छोड’ ही उपाधी लोकांनी लावली.       
 सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader