१९४६ साली इटालीत प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले. रोम ही इटालीची राजधानी. प्रशासकीय व्यवस्थेसाठी इटालीची विभागणी कम्युन्समध्ये केलेली असून रोम हे त्यापकी एक कम्युन आहे. इटालियन पार्लमेंटची दोन सभागृहे चेंबर ऑफ डेप्युटीज आणि सिनेट रोममधील पलाझो माँटेसिटेरिओ आणि पलाझो मादामा या इमारतीत भरतात. १३०० चौ.कि.मी. क्षेत्र व्यापलेल्या बृहन् रोम शहराची लोकसंख्या २०१४ साली २९ लाख होती, तर रोमच्या उपनगरीय क्षेत्राची लोकसंख्या ४३ लाख असून त्याचे क्षेत्रफळ ५४०० चौ.कि.मी. आहे. प्रशासकीय व्यवस्थेसाठी रोम शहराची विभागणी १५ म्युनिसीपीमध्ये केलेली आहे. प्रत्येक म्युनिसीपीसाठी एक अध्यक्ष आणि चार जणांचे निर्वाचित सल्लागार मंडळ असते. रोम कम्युनचा प्रमुख, मेयर आणि सिटी कौन्सिल आहे. मेयरचे मुख्यालय पलाझो सिनेटोरियो म्युनिसीपी या इमारतीत आहे. रोम शहराच्या बऱ्याच मोठय़ा भागामध्ये ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष जतन करून ठेवले असून या भागात वस्ती तुरळक आहे. या ऐतिहासिक अवशेषांच्या प्रशासनासाठी या भागाचे वर्गीकरण २२ ‘रिनोनी’मध्ये केलेले आहे. रोम शहरांतर्गत व्हॅटिकन सिटी हे कॅथोलिक ख्रिश्चनांचे प्रमुख धर्मपीठ आहे. सध्या रोम शहरात ९०% कॅथोलिक ख्रिश्चनांची वस्ती असून एकूण ९०० लहान-मोठी चच्रेस आहेत. रोमन सम्राटाने चवथ्या शतकात कॅथोलिक ख्रिश्चन हा राष्ट्रीय धर्म घोषित केला होता. परंतु विसाव्या शतकाच्या मध्यापासून, इटालियन प्रजासत्ताक घोषित झाल्यापासून रोमचे सरकार निधर्मी घोषित झाले. उत्तर आफ्रिका खंडातून आणि मध्यपूर्वेतील काही देशांमधून गेल्या दहा वर्षांमध्ये मुस्लीम स्थलांतरितांचे प्रमाण रोममध्ये बरेच वाढले असून शहरात त्यांची मशीदही बांधलेली आहे. रोम शहरातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये बससेवेचा वापर अधिक केला जातो. मेट्रो रेल्वेसेवेचे फक्त तीन मार्ग असून मेट्रोचे ६० कि.मी. लांबीचे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. हवाई वाहतुकीसाठी फ्युमिसिनो आणि सियाम्पीनो हे दोन विमानतळ आहेत.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
अर्जुन
महाभारतातील अर्जुनाने आपल्या अचूक तीरांनी महत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे मानवी शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणारा हा वृक्ष म्हणूनच याला ‘अर्जुन’ किंवा ‘अर्जुनसादडा’ असे म्हणतात. कुंभक मुरुथू, अशश्तिर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाचे लॅटीन नाव टर्मिनलिया अर्जुना असे आहे.
मुख्यत्वे भारतभर आणि श्रीलंका येथे आढळणारा हा पानझडी वृक्ष असून याच्या खोडाची साल अतिशय जाड गुळगुळीत हिरवट पांढरी असते. तर काही झाडांची साल लालसरही असते. खोडावर आडव्या पसरलेल्या फांद्या असतात. त्यामुळे त्यांचा विस्तार मोठा असतो. त्याची पाने साधी, दीर्घाकृती, चिवट, गुळगुळीत असून पाने टोकाकडे हिरवी तर देठाकडे लालसर असतात. देठावर पाल्याच्या तळाशी दोन ग्रंथी असतात. एप्रिल, मे महिन्यात पानाच्या कक्षेत खोडाच्या टोकाशी फुले येतात. फुलापासून एकबीजी, िपगट, शुष्क, लंबगोलाकार पाचपंखांची फळे येतात. ही फळे सुवासिक हिरवी असतात. वाळल्यावर गडद तपकिरी होतात. वाऱ्याच्या साहाय्याने स्थलांतर होते. त्याचे लाकूड अत्यंत शोभिवंत असून घरबांधणी, बलगाडय़ा, शेतीचे अवजारे, होडय़ा, ब्रश बनवण्यास, कातडी कमवण्यास व रंगविण्यास वापरतात. या वृक्षाचे निरनिराळे भाग औषधी म्हणून वापरले जातात. मुख्यत्वे हृदयविकाराच्या विविध प्रकारांमध्ये याचा उपयोग होतो, म्हणून याला ‘गॉस गाíडयन ऑफ हार्ट’ म्हणतात. उच्च रक्तदाब, छातीत दुखणे रक्ताभिसरणातील अडथळे, हृदयविकार, हृदयाचे कमजोर स्नायू यावर उपचार म्हणून उपयुक्त आहे. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर हृदयाचे स्नायू बळकट करणे, वाईट कोलेस्टेरॉलचे थर कमी करणे, रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल तोडून वेगळे करणे यासाठी अर्जुन वापरतात. खोडाची पावडर हृदय विकारावर तसेच सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरले जाते. फळांची पेस्ट जखमा भरून काढण्यासाठी वापरतात. मुखाचे आरोग्य, हिरडय़ांचे विकार, तोंडातील अल्सर आणि जंतूसंसर्ग यावरही अर्जुनाची साल वापरतात. रक्ती आव, अंतर्गत रक्तस्राव, जुनाट ताप यावर अर्जुनपाक उपयोगी आहे. कानदुखी सफेदकुष्ठ, मूत्रविकार यावरही अर्जुन उपयुक्त आहे. कॅन्सरवरील उपचारासंदर्भात संशोधन चालू आहे. अशा या भारतीय वृक्षाची ओळख प्रत्येक भारतीयाला असणे गरजेचे आहे.

मृणालिनी साठे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

Story img Loader