डॉ. राजीव चिटणीस
चंद्र व सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजण्याचे पूर्वीचे प्रयत्न हे पराशयाच्या संकल्पनेवर आधारलेले होते. एखादी वस्तू वेगवेगळ्या ठिकाणांहून निरखली तर तिचे स्थान बदललेले दिसते. या बदलास पराशय म्हणतात. वस्तू जितकी जवळ तितका तिचा पराशय अधिक. ग्रीक खगोलज्ञ हिप्पार्कसने चंद्राचे अंतर मोजण्यासाठी पराशयाचाच आधार घेतला. इ.स.पूर्व १८९ मध्ये दिसलेले सूर्यग्रहण हे आजच्या तुर्कस्तानाच्या किनाऱ्यावरील हेलिस्पॉन्ट येथे खग्रास स्वरूपाचे दिसत होते, तर दक्षिणेकडील अलेक्झांड्रिया येथे ते पराशयामुळे खंडग्रास स्वरूपाचे दिसत होते. अलेक्झांड्रा येथून सूर्यिबबाचा चार-पंचमांश भाग झाकलेला दिसत होता. सूर्यबिंबाच्या दिसणाऱ्या भागाचा अंशात्मक आकार आणि हेलिस्पॉन्ट-अलेक्झांड्रिया अंतर, यावरून हिप्पार्कसने भूमितीच्या साहाय्याने चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर काढले. ते पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे नव्वदपट भरले. इ.स.नंतर दुसऱ्या शतकात टॉलेमीने चंद्राचा, ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील पराशय मोजून चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर काढले. ते पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे साठपट म्हणजे जवळपास प्रत्यक्ष अंतराइतके आले.
सूर्याच्या बाबतीत पार्श्वभूमीवरील तारे दिसत नसल्याने, पराशर मोजून त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजता येत नाही. इ.स. १६७२ मध्ये इटलीचा खगोलज्ञ जिओव्हानी कॅसिनी याने ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील मंगळाचा पराशय मोजला व त्यावरून केपलरच्या नियमांचा वापर करून सूर्याचे पृथ्वीपासूनच्या अंतराचे गणित मांडले. इ.स. १७१७मध्ये इंग्लंडच्या एडमंड हॅली याने सूर्याचे अंतर काढण्यासाठी शुक्राच्या अधिक्रमणावर आधारलेली एक पद्धत सुचवली. शुक्राच्या अधिक्रमणात, शुक्र हा सूर्याभोवती फिरताना सूर्य-पृथ्वी यांच्या दरम्यान येतो व सूर्यिबबावर शुक्राचे बिंब सरकताना दिसते. या अधिक्रमणाचा कालावधी हा पराशयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. इ.स. १७६१ आणि १७६९च्या शुक्राच्या अधिक्रमणांत हा कालावधी वेगवेगळ्या ठिकाणांहून मोजण्यात आला. या कालावधीवरून हॅलीने सुचवलेल्या पद्धतीनुसार शुक्राचे पृथ्वीपासूनचे अंतर व त्यावरून केपलरच्या नियमांद्वारे सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर काढणे शक्य झाले. घन पृष्ठभाग असलेल्या ग्रहांचे पृथ्वीपासून अंतर काढण्यासाठी आताच्या काळात रडारद्वारे सोडलेल्या रेडिओलहरींचा वापर केला जातो.
या रेडिओलहरी त्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पृथ्वीवर पुन्हा पोहोचण्यास लागलेला कालावधी मोजला जातो. यावरून त्या ग्रहाचे आणि त्यानंतर केपलरचा नियम वापरून सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर काढता येते. हे सूर्य-पृथ्वी अंतर सुमारे पंधरा कोटी किलोमीटर भरते.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org