ईस्ट इंडिया कंपनीत अगदी सामान्य पदावर नियुक्ती झालेला एल्फिन्स्टन १७९६ साली कोलकात्यात रुजू झाला. त्याआधी काही महिने सवाई माधवरावांचा मृत्यू होऊन दुसऱ्या बाजीरावाकडे मराठी राज्याची सूत्रे आली आणि मराठी राज्याचा ऱ्हास सुरू झाला. हा एक विचित्र योगायोग म्हणता येईल. पुढे एल्फिन्स्टन मराठी राज्याच्या इतिश्रीस जसा कारणीभूत झाला तसाच महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीस एल्फिन्स्टनने मोलाचा हातभार लावला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात एल्फिन्स्टन एकूण ३२ वर्ष राहिला. १८०१ साली एल्फिन्स्टन पुण्याला आला तेव्हा मराठेशाहीच्या विघटनास सुरुवात झाली होती. पेशवा दुसरा बाजीराव याला भेटून ब्रिटिशांची तनाती फौज मराठय़ांकडे ठेवण्यास त्याला पटविण्याची अवघड कामगिरी एल्फिन्स्टनवर सोपवली गेली आणि ते काम वसईचा तह करून एल्फिन्स्टनने शिताफीने केले. या काळात त्याने अहमदनगर, आशिरगढ वगरे लढायांमध्येही भाग घेतला. गव्हर्नर जनरल वेलस्लीने त्याची नेमणूक पुढे नागपूरचा प्रभारी रेसिडेंट म्हणून केली. तिथेही नागपूरकर भोसल्यांना तनाती फौजेच्या कक्षेत आणण्याची अवघड कामगिरी त्याने यशस्वी केल्यावर एल्फिन्स्टनची बदली ग्वाल्हेर आणि परत पुण्यास झाली. पुण्याचा रेसिडेंट म्हणून. पेशव्यांची सत्ता खच्ची करून मराठी मुलूख गिळंकृत करण्याची मोठी कामगिरी एल्फिन्स्टनवर सोपविली गेली होती.

एल्फिन्स्टनने हे करताना ज्या कौशल्याने आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने एक एक प्रकरण हाताळले, त्याला कंपनी सरकारच्या इतिहासात तोड नाही. त्यामध्ये पेशवे-जहागीरदार संघर्षांतला पंढरपूरचा तह, कोल्हापूरकरांचा बंदोबस्त करून मालवण, सिंधुदुर्गाचा ताबा मिळवणे, खडकीच्या लढाईत पेशव्यांना पराभूत करून शनिवारवाडय़ावर इंग्रजांचा ध्वज लावणे, दुसऱ्या बाजीराव पेशव्याला अटक करून विठूरला पाठवणे, सातारच्या छत्रपतींचे मराठा साम्राज्य संकुचित करून त्याचे रूपांतर ब्रिटिशांच्या वर्चस्वाखालच्या एका छोटय़ा राज्यात करून त्यावर तत्कालीन छत्रपती प्रतापसिंह यांची नेमणूक राजा म्हणून करणे यांचा समावेश आहे.१० फेब्रुवारी १८१८ रोजी साताऱ्याचा किल्ला हाती पडल्यावर दुसऱ्या दिवशी एल्फिन्स्टनने काढलेला जाहीरनामा हा एल्फिन्स्टनच्या मुत्सद्देगिरीचा आणि चातुर्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणता येईल.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mountstuart elphinstone
Show comments