माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची नियुक्ती पुण्याचा ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट ऑफिसर म्हणून झाली तेव्हा मराठेशाहीची परिस्थिती नाजूक आणि स्फोटक होती. अनेक समस्या उभ्या होत्या. एल्फिन्स्टनने या साऱ्या समस्या मोठय़ा कौशल्याने हाताळून एक मुत्सद्दी नेता म्हणून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशव्यांकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशाची नीट व्यवस्था लावल्यानंतर कंपनीने एल्फिन्स्टनकडे मुंबई प्रांताच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवली. गव्हर्नर या नात्याने त्याने प्रजाहितकारी कामे करून महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे कल्याण साधण्यासाठी त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविणे आवश्यक आहे असे त्याचे धोरण होते. शिक्षणाचा उद्देश केवळ कारकुनांचा पुरवठा करणे एवढाच मर्यादित नसून ज्ञानाचा प्रसार समाजातील सर्व स्तरांत करणे असा त्याचा हेतू होता.

एल्फिन्स्टन स्वत विशेष शिकलेला नसूनही त्याचा वाचनाचा व्यासंग दांडगा होता. ग्रीक, लॅटीन, फारसी, इंग्रजी या भाषा त्याला येतच होत्या पण पुणे, मुंबईत आल्यावर तो मराठी, संस्कृतचाही जाणकार झाला. स्वारीवर असतानाही तो खेचरावर पुस्तके लादून घेऊन जात असे. मराठेशाहीत वाटल्या जाणाऱ्या श्रावण मासातल्या दक्षिणेच्या प्रथेचा त्याने सदुपयोग केला. या दक्षिणेचा एक सार्वजनिक निधी बनवून त्यातून १८२१ साली पुण्याच्या विश्रामबाग वाडय़ात एल्फिन्स्टनने संस्कृत पाठशाळा सुरू केली. या पाठशाळेत संस्कृत आणि मराठी भाषेच्या व्याकरणाव्यतिरिक्त न्यायशास्त्र, ज्योतिष, वेद वैद्यकशास्त्र, धर्मशास्त्र हे विषय शिकवले जात. गरीब घरच्या मुलांपकी शंभर विद्यार्थ्यांना ५ रु. दरमहा अशी शिष्यवृत्तीही इथे सुरू करण्यात आली. पाठशाळेचा हा प्रयोग कंपनी सरकारच्या अनेक अधिकाऱ्याना पसंत नसूनही एल्फिन्स्टनने ही पाठशाळा चालूच ठेवली. भारतीय लोक ज्ञानी झाले तर आपल्या हातातली या देशावरची सत्ता जाईल अशी भीती अनेक इंग्रजांच्या मनात होती आणि त्यामुळे एल्फिन्स्टनच्या शिक्षण प्रसाराच्या योजनांना त्यांचा सतत विरोध होत असे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mountstuart elphinstone
Show comments