मध्ययुगीन भारतातील सर्वात प्रसिद्ध गणिती म्हणजे भास्कराचार्य (द्वितीय) होय. त्यांचा ‘सिद्धांत शिरोमणी’ हा ग्रंथ, विशेषत: त्यातील ‘लीलावती’ हा पहिला विभाग, आजही जगभर प्रख्यात आहे. आपल्या जन्मशकाविषयी भास्कराचार्यानी ‘रस-गुण-पूर्ण-मही’ अशी शब्दरचना केली आहे, ज्यातून त्यांचा जन्म शक १०३६ (इ.स. १११४/१५) असल्याचे समजते. ‘विज्जलवीड’ हे त्यांचे जन्मगाव नेमके कोणते यावर आजही वाद असले तरी ते महाराष्ट्रातील ‘पाटण’ हेच असावे यावर आता अनेकांचे एकमत झाले आहे. आपले वडील महेश्वर यांच्याकडूनच आपण विद्या शिकलो हे भास्कराचार्यानी नमूद केले आहे. ‘लीलावती’ नावावरूनही बराच वाद आहे. लीलावती ही त्यांची मुलगी, विद्यार्थिनी अथवा प्रेयसी असावी असे मत अनेकांनी मांडले आहे; मात्र त्याबाबत कोणताही खात्रीलायक पुरावा नाही. ‘लीलावती’ आजही आपल्या नावामागील गूढ बाळगून आहे.

लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय असे सिद्धांत शिरोमणी ग्रंथाचे विभाग आहेत. यांतील पहिले दोन गणिताशी तर शेवटचे दोन खगोलशास्त्राशी निगडित आहेत. अंकांची स्थानपरत्वे किंमत, संख्यांचे वर्ग-घन-वर्गमूळ-घनमूळ काढायच्या पद्धती, शून्यावरील क्रिया, त्रराशिक, पंचराशिक, श्रेढी गणित, एकरेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, एकघाती व द्विघाती अनिश्चित समीकरणे, भौमितिक आकारांच्या क्षेत्रफळ-घनफळांची सूत्रे, त्रिकोणमिती इत्यादींचा त्यांनी ऊहापोह केला आहे. बीजगणितातील काही श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याना अनंत या संकल्पनेचा अंदाज होता जिला त्यांनी ‘खहर’ राशी असे संबोधले. ग्रहांचा अभ्यास करताना त्यांची तात्कालिक गती काढण्यासाठी त्यांनी सीमा (लिमिट) या आधुनिक गणिती संकल्पनेचा आधार घेतलेला दिसतो, मात्र तिचा विस्तार त्यांनी केला नाही.

Lucknow Pact
UPSC-MPSC : काँग्रेसचे लखनौ अधिवेशन का ऐतिहासिक ठरले? लखनौ करार नेमका काय होता?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
after nalganga dam overflowed water entered in malkapur and near villages houses damaged
नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले
How are the three Padma Awards different from each other
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री: तिन्ही पद्म पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…
सी. एस. शेषाद्री
अलेक्झांडर किनगहॅम (१)
यूपीएससी : आधुनिक भारताचा इतिहास
Shivdi Nhava Sheva Sea Route
शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग नेमका कसा आहे?

खगोलशास्त्रावर लिहिताना भास्कराचार्यानी कालमापन, नक्षत्र आणि सौरदिन यातील भेद, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर, चंद्राचे आकारमान, विविध ग्रहांचा भ्रमणकाळ अशा अनेक गोष्टी मांडल्या. त्यांनी ग्रहणांचा शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास केला होता. पृथ्वीची छाया चंद्रावर पडल्यामुळे चंद्र काही काळ दिसेनासा होतो याचे त्यांना ज्ञान होते. खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी निश्चित करण्यासाठी त्यांनी गणित विकसित केले होते. खगोल-निरीक्षणात उपयोगी ठरणाऱ्या नऊ यंत्रांचेही (गोलयंत्र, नाडीवलय, यष्टी, शंकू, इत्यादी) वर्णन त्यांनी यंत्राध्याय प्रकरणात केलेले आहे. सुमारे ५०० वर्षे भारतात वापरले गेलेले लीलावती हे अद्वितीय गणिती पाठय़पुस्तक उत्तम छंदोबद्ध काव्यात रचलेले आहे. भास्कराचार्याची ही बहुआयामी प्रतिभा ग्रंथ वाचताना प्रकर्षांने जाणवते. त्यांच्या मृत्यूनंतर (अंदाजे इ.स.११८५) २०० वर्षांनी केरळात गणितींची एक मोठी परंपरा निर्माण झाली, तरी, दुर्दैवाने, भारताच्या अन्य भागातली गणिती परंपरा खंडित झाली होती.

– प्रा. सलिल सावकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

Story img Loader